दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी; पोलिसांकडून मुलांना चोप

281

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2मार्च):-शहरातील चंपावती महाविद्यालयात दहावीचा पेपर सुरू असताना कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहायला मिळाली. एवढेच नाही तर भिंतीवरून, खिडकिवरून कॉपी पुरवण्यासाठीचां खटाटोप सुरु होता. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

याच टवाळखोर कॉपी पुरवनाऱ्यांमुळे खिडकीजवळ नंबर आलेल्या, अभ्यासू विद्यार्थ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त कमी असल्याने हा गोंधळ सुरू असल्याचं दिसत आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन प्रयत्न करत असतानाच काही अतिउत्साही टवाळखोर याला खीळ घालत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला काल पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 156 केंद्रांवर 652 शाळांचे एकूण 42 हजार 644 विद्यार्थी या परिक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी 15 परिरक्षक कार्यालय निश्चित केले असून परीक्षा व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र तरीदेखील शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे. नंदूरबारच्या धडगाव शहारातून देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 10वी बोर्डाच्या पहिल्या पेपराला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडीओ समोर आलाय. यात कुठलीच भीती न बाळगता विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जात असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा सगळा प्रकार सुरु असल्याचा आरोप आहे.