सत्यशोधक समाजाचे १० मार्चला नायगांव येथे पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशन !…

115

🔸खान्देशातून जास्तीत – जास्त सत्यशोधक बंधू-भगिनी या अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी डी पाटील [ जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.4मार्च):-भारतातील थोर समाज सुधारक सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी शुद्र आणि अतिशूद्र यांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त रविवार दि.१० मार्च रोजी सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगाव, तालुका खंडाळा येथे होणार आहे.

या अधिवेशनाच्या प्रमुख उद्घाटक रूपालीताई चाकणकर (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य महिला आयोग ) प्रमुख वक्त्या स्मिताताई पानसरे, अँड.वैशालीताई डोळस, सुजाताताई गुरव, दर्शनाताई पवार, अँड.वासंती नलावडे, झेबूनिरसा शेख उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनाला सकाळी ह भ प विजय महाराज भोईरकर यांचे सत्यशोधकीय कीर्तन होणार आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ९ मार्च ला “मी सावित्री बोलतेय ” हा एकपात्री प्रयोग वैशाली धाकूलकर करणार आहेत. यानंतर “सावित्रीमाई फुले महिलांसाठी दीपस्तंभ ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.

खान्देशातून जास्तीत जास्त सत्यशोधक बंधू-भगिनींनी सहकुटुंब – सहपरिवार या नायगाव येथील ऐतिहासिक महिला अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे जळगांव जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी केले आहे.