शासकीय अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचे आयोजन

73

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर दि. 22 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजात मानाचे स्थन प्राप्त व्हावे, तसेच त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिने आदिवासी विभाग नियमित प्रयत्नशील असतो. त्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत या शैक्षणिक सत्रात 23 एप्रिल ते 22 मे 2024 या कालावधीत उन्हाळी शिबीर हा उपक्रम राबविला जात आहे. प्रकल्पात पहिल्यादांच अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे आयोजन शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा ता. जि. चंद्रपूर येथे करण्यात येत आहे.

उन्हाळी शिबिरात शासकीय /अनुदानित आश्रम शाळेतील एकूण 150 विदयार्थी (75 मुले व 75 मुली ) सहभागी होणार आहेत. या शिबिराकरीता विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात येणार आहे.

*शिबिरात घेण्यात येणारे उपक्रम :* 1. योगा प्रशिक्षण 2. आर्चरी प्रशिक्षण 3. गोंडी पेटींग प्रशिक्षण 4. तायक्वांडो प्रशिक्षण 5. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण 6. इंग्लिश स्पीकिंग कोर्स 7. संगीत कला प्रशिक्षण.

या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले असून या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टीत शिक्षणाची नाळ जुळून राहण्यास मदत होणार आहे. शिबिरात प्रशिक्षित प्रशिक्षकामार्फत वरील सर्व उपक्रमाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे, त्यामुळे भविष्यात स्वत: च्या पायावर उभे राहण्याकरीता सदर प्रशिक्षण हे उपयोगी पडणार आहे. प्रकल्पात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात असल्यामुळे सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत. शिबिरादरम्यान प्रकल्प कार्यालयातील विविध अधिकारी प्रशिक्षण स्थळी भेट देतील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.