शिक्षण सेवक योजनेची शिफारस करणाऱ्या शासननिर्णयाचा शिक्षक भारतीने केला निषेध

118

चिमूर – २७ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक योजनेची शिफारस करणारा शासन निर्णय निर्गमित झाला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या होतकरू व हुशार शिक्षकांना २५०० ते ३५०० अशा अल्प मानधनात काम करून अपमानित व्हावे लागले. त्यामुळे २७ एप्रिल या दिवशी शिक्षण क्षेत्रात कंत्राटीकरणाचा पाया रचला गेला.त्याचा आघात हजारो शिक्षकांना सहन करून आर्थिक नुकसान सोसावे लागले.त्याचा निषेध म्हणून शिक्षक भारतीने हा दिवस निषेध दिन म्हणून पाळला. या दिवशी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शासन निर्णयाला सर्व स्टाफसमोर फाडून निषेध व्यक्त केला.

२७ एप्रिल २००० रोजी लागू करण्यात आलेल्या या योजनेत शिक्षण सेवक कालावधी ५ वर्ष ठरवण्यात आला. शिक्षकांना शिक्षण सेवक हे अपमानित करणारे बिरुद लावण्यात आले.सेवा कालावधी पूर्ण केल्यावरही सेवा सतात्याची हमी नव्हती. सेवा सातत्य हे पूर्णपणे संस्थेवर अवलंबून होते.सेवा कालावधीत केवळ पाच सीएल मंजूर होत्या. हा शिक्षण सेवक वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसाथी ग्राह्य धरला जात नव्हता. २५०० ते ३५०० अशा अल्प मानधनात काम करावे लागत होते. अशा एकापेक्षा एक जाचक व अवहेलना करणाऱ्या या शासन निर्णयावर सही करणारे तत्कालीन उपसचिवांना शिक्षक कधीही माफ करणार नाहीत.२७ एप्रिल हा दिवस निषेध दिन मानून शाळाशाळांमधून असंतोष व्यक्त करण्यात आला अशी माहिती शिक्षक भारतीचे नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्राथमिक विभाग अध्यक्ष सुरेश डांगे यांनी दिली आहे.

आमदार कपिल पाटील यांनी अशासकीय विधेयक (डिसेंबर २०१०) आणून शिक्षण सेवक कायदा रद्द करण्याची मागणी केली. या विधेयकानंतर शिक्षण सेवक शब्द हटवून सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (टीचर ऑन प्रोबेशन) केले. कालावधी तीन वर्ष झाला. मानधन दुप्पट केले.शिक्षण सेवक कालावधीत १२ किरकोळ रजा मंजूर झाल्या. या कालावधीत केलेली सेवा वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीला ग्राह्य धरण्यात आली.पेन्शनसाठी सेवा ग्राह्य धरण्यात आली. महिला शिक्षण सेविकांना सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळाली. त्यासाठी ज्यादाचे सहा महीने काम करण्याची आवश्यकता उरली नाही. शिक्षक भारती संघटनेने अपमान पुरून सन्मान मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष सर्व शिक्षकांना माहीत आहे. म्हणूनच मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.येणाऱ्या काळातही कंत्राटीकरणाला विरोध करून शिक्षकांना संपूर्ण सन्मान मिळवून देण्यासाठी शिक्षक भारती कटिबद्ध असेल,अशा विश्वास शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष तथा मुंबई शिक्षक मतदार संघाचे शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष किसन मोरे यांनी व्यक्त केला आहे.