सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासावरच गदा

    177

    भारतीय रेल्वे ही भारतीयांची जीवनवाहिनी आहे. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे. एकट्या मुंबईत दररोज पाऊण कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. यावरून संपूर्ण देशात किती प्रवासी रेल्वेने प्रवास करतात याचा अंदाज लावता येईल. सर्वाधिक प्रवासी संख्या असल्याने सरकारला सर्वाधिक महसुल देखील रेल्वेच मिळवून देते. जवळचा प्रवास करण्यासाठी प्रवासी उपनगरी रेल्वे सेवेचा आधार घेतात तसाच लांबचा प्रवास करण्यासाठी प्रवासी दीर्घ पल्ल्याच्या रेल्वेचा आधार घेतात. रेल्वेचा प्रवास म्हणजे कमी पैशात सुखकर प्रवास. कितीही लांबचा प्रवास असेल तरी रेल्वेत थकवा किंवा शिन येत नाही कारण लांबच्या प्रवासाचे आरक्षण अधिच केलेले असते. आरक्षण मिळाले की प्रवासी निश्चीन्त असे. रेल्वे गाड्याही पुरेश्या असल्याने सर्वांना आरक्षण मिळतं, ज्यांना आरक्षण मिळत नाही ते जनरल डब्यातून प्रवास करत मात्र देशात कोरोना आला आणि हे सर्व चित्र बदलले. कोरोनामुळे लॉक डाऊन लागू झाले आणि दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना ब्रेक लागला. लॉक डाऊन उठल्यानंतर मात्र पूर्वीचे हे चित्र बदलले. रेल्वे प्रशासनाने काही दीर्घ पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले तर काही एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या. आता तर दीर्घ पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेत धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या धोरणानुसार आता मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट एक्सप्रेसमधून जनरल डबे पूर्णपणे हटवले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात केवळ या गाड्यांमध्ये वातानुकूलित कोचच असणार आहेत. याची सुरवातही रेल्वेने केली असून अनेक एक्सप्रेस गाड्यांचे स्लीपर कोच कमी केले असून काही गाड्यांचे जनरल डबे बंद केले आहेत. रेल्वेने स्लीपर कोच कमी केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी एका रेल्वेत १२ स्लीपर कोच तसेच चार जनरल डबे असायचे आता ही संख्या ५ ते ७ वर आल्याने गरिब तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे. स्लीपर कोच काढून त्या ऐवजी वातानुकूलित कोच वाढवल्याने स्लीपर कोचचे आरक्षण मिळत नाही त्यामुळे प्रवाशांना द्वितीय श्रेणीचे वातानुकूलित तिकीट काढावे लागत आहे हे तिकीट सर्वसामान्य तिकिटाच्या दरापेक्षा पाचपट अधिक आहे त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे. जनरल डबे कमी केल्याने जनरल डब्यात पाय ठेवायलाही जागा नसते. रेल्वेने डब्यांच्या रचनेत बदल करताना सर्वसामान्य, गरीब प्रवाशांचा विचारच केला नाही. सर्वच प्रवाशांना वातानुकूलित कोचचे तिकीट काढणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या प्रवासावरच रेल्वेने गदा आणली आहे. गरीब तसेच सर्वसामान्य प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करू नये असेच हे धोरण आहे. रेल्वेने हे नवीन धोरण बदलून पूर्वीप्रमाणे स्लीपर तसेच जनरल डब्यांची रचना ठेवून गरीब तसेच सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा. जर रेल्वेने हे नवीन धोरण बदलले नाही तर भविष्यात रेल्वेला प्रवाशांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल.

    श्याम ठाणेदार
    दौंड जिल्हा पुणे
    ९९२२५४६२९५