शेतकऱ्यांच्या समस्येवर शासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा–आम आदमी पार्टी ची मागणी

17

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(,दि.12ऑगस्ट):-बाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिककर्ज देण्यास बँकाची टाळाटाळ, खतांची उपलब्धता, बोगस बियाणामुळे उद्भवलेले दुबार पेरणीचे गंभीर संकट व शेतकऱ्यांच्या झालेल्या अपरिमित नुकसानाबाबत शासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा यासाठी प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी चिमूर विधानसभा तर्फे मागणी करण्यात आली आहे.

यावर्षी, पावसाने दमदार व वेळेवर सुरूवात केल्यामुळे बळीराजाच्या यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित झाल्या होत्या, तथापि कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच खरिप हंगामाची सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरातील कापूस व तत्सम माल विकला गेला नसल्यामुळे खरिपासाठी बियाणे, खते व औषधे खरेदीसाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. कोरोनामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला असून भाजीपाला किंवा फळ पिकांना भाव नाहीत. कोरोनाच्या नावाखाली व्यापारी व दलाल यांनी शेतकरी पिळून काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे बजेट कोसळले आहे.

मागील १०-१२ वर्षात झालेल्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना आजवर लाभ मिळालेला नाही. कॉंग्रेस, युती आणि आता महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना या तिन्ही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, काही शेतकरी जुने कर्जदार आहेत तर काही शेतकरी २ लाखाच्या वरील कर्जदार आहेत, त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही. दुसरीकडे कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यासंदर्भातील जमाखर्च न झाल्यामुळे शेतकरी नविन पिककर्ज शेतकऱ्यांना मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

यावर्षी कर्जमागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज करावयाचे असून अग्रणी बँकमार्फत संबंधित बँकाकडे जाणार असल्यामुळे सततच्या नेटवर्क व सर्व्हरवर इत्यादी च्या प्रश्नामुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांची पिककर्ज मिळत नाही, अशी तक्रार येता कामा नये, अशा शासनाच्या सुचना आहेत तसेच पिककर्ज न देणाऱ्या बँकावर फौजदारी गुन्हे दाखल होतील असे गृहमंत्र्यानी सांगितले आहे तरीही राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपाबाबत अजिबात गंभीर नाहीत.

पिककर्ज वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांना खाजगी सावकारकडे गेल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सरकारने खरिप हंगामासाठी तात्काळ पिक कर्ज देणे आवश्यक आहे. विशेष बाब अशी की, शेतकऱ्यांनी जे बियाणे नामांकित कंपन्यांकडून खरेदी करून पेरले ते रूजलेच नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागले. अश्यातच आता कृषी केंद्रांवर रासायनिक खताचा विशेष करून युरिया चा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आला आहे.

शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झाले आहे. त्यांनाही देण्यात येणारी मदत अपुरी आहे किंवा ज्यांचे नुकसान झाले त्यांना अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. जुने कर्ज असलेल्या आणि २ लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आज पर्यंत एकदाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्यांना तातडीने कर्जमाफी द्यावी. सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत तथा सहकारी बँकांना आदेश द्यावेत, ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत त्या बँकावर कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना सुचना देऊन पिककर्ज न देणार्या बँकावर त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. बाजारात मुबलक प्रमाणात युरिया सह इतर खतांची उपलब्धता करावी, टंचाई दाखवून जास्ती भावाने खत विक्रेत्यांवर कार्यवाही करावी.

बदुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. निकृष्ठ बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. या करिता निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली या प्रसंगी आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे, तालुका अध्यक्ष मंगेश शेंडे, सुरेशजी कोल्हे, आदित्य पिसे, मंगेश वांढरे, त्रिलोक बघमारे, विशाल इंदोरकर, नरेश बुटके, संजय बहादुरे, सुशांत इंदोरकर, विशाल बारस्कर व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.