चंद्रपूर जिल्‍हयासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधकामाकरिता 53 कोटी रू. निधी तातडीने उपलब्‍ध करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

15

🔸8 दिवसात निधी उपलब्‍ध करण्‍याचे सामाजिक न्‍याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे आश्‍वासन

 ✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.13ऑगस्ट):- जिल्‍हयात रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधकामाकरिता 53 कोटी रू. निधी तातडीने उपलब्‍ध करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाला केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी सामाजिक न्‍यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्‍याशी केलेल्‍या चर्चेदरम्‍यान येत्‍या 8 दिवसात हा निधी उपलब्‍ध करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.

यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री, सामाजिक न्‍यायमंत्री, सामाजिक न्‍याय विभागाचे प्रधान सचिव यांच्‍याशी सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्‍हयात सन 2016-17 ते सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्‍ये एकूण 11818 घरकुल बांधकामाचे उद्दिष्‍ट मंजूर आहे. त्‍यापैकी 4356 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असून उर्वरित 7462 घरकुलांचे कामे विविध स्‍तरावर अपूर्ण आहेत तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरीता 4094 लाभार्थींची निवड प्राप्‍त असून ऑनलाईन मान्‍यता देण्‍याची प्रक्रिया सुध्‍दा पूर्ण झाली आहे. मंजूर लाभार्थ्‍यांनी जुने घर मोडून बांधकामाचे साहीत्‍य गोळा केलेले आहे. परंतु राज्‍य व्‍यवस्‍थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग यांचे स्‍टेट नोडल अकाऊंट मध्‍ये सदर योजनेचा निधी नसल्‍याने लाभार्थींना निधी वितरीत करता येत नाही त्‍यामुळे 7462 घरकुलांची कामे खोळंबलेली आहे. यासाठी 53 कोटी 22 लक्ष 20 हजार रू. इतक्‍या निधीची आवश्‍यकता आहे. सदर निधी तातडीने उपलब्‍ध करून देण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक न्‍यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्‍याकडे केली आहे. येत्‍या 8 दिवसात हा निधी उपलब्‍ध करण्‍याचे आश्‍वासन ना. धनंजय मुंडे यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.