डाॕ. लेनगुरे यांच्या गाव रामायण ह्या कथागीत संग्रहाचे आॕनलाईन प्रकाशन

35

🔸ग्रामशुध्दी करीता ” गाव रामायणाचे ” प्रयोग गावागावात व्हावे – बंडोपंत बोढेकर

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.16ऑगस्ट):- झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. चंद्रकांत लेनगुरे यांच्या गाव रामायण ह्या कथागीत संग्रहाचे नुकतेच आॕनलाईन पध्दतीने रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री तथा स्तंभलेखिका श्रीमती कुसूमताई अलाम, पत्रकार तथा वन्यजीव अभ्यासक मिलींद उमरे , ज्येष्ठ कवी विनायक धानोरकर , भोजराज कान्हेकर , वर्षा पडघन इ. मान्यवर उपस्थित होते . माझी झाडी माझी माणसं ह्या फेसबुक पेजच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांनी विचार प्रस्तुत केलेत. प्रास्तविक करतांना या पुस्तकाचे लेखक डाॕ. लेनगुरे म्हणाले की , ग्रामीण भागात नोकरीच्या काळात आरोग्य व स्वच्छता तज्ज्ञ म्हणून भूमिका पाळत असताना आलेले स्व – अनुभव कथागीत स्वरूपात शब्दबध्द केलेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने गावे गोदरीमुक्त व्हावे ,ही तळमळ या मागे होती. पत्रकार उमरे म्हणाले की , “गाव रामायण” चे लेखन लोकजीवनाजवळ जाणारे आहे. गोदरी सारखा जटील प्रश्न हसत खेळत लेखनशैलीत मांडून लोकजागृतीच्या दृष्टीने लोकांच्या हृदयांत जाण्यासाठी त्यांनी. प्रभावी मांडणी केलेली आहे. ज्येष्ठ कवयित्री अलाम म्हणाल्या , आदर्श गावाचे स्वप्न आपल्या संतानी पाहिले होते . स्वच्छ गावाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने केला गेलेला “गाव रामायण” लेखनाचा हा मोठा प्रयास आहे. ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले , गाव रामायणातून डाॕ. लेनगुरे यांनी गावाचे जणू जीवंत प्रतिबिंब अधोरेखित केलेले आहे. कोरोनाच्या काळात सर्वांनाच गावाची महती कळली. गावातील महिलांचा व तरूणांच्या उर्जेचा उपयोग ग्रामशुध्दीसाठी व्हावा.सार्वजनिक स्वास्थ्य उत्तम रहावे ह्या हेतूने ग्राम मानसिकता पुढे ठेवून सशक्तपणे मांडणी केली गेली आहे. ग्राम सक्षमीकरणच्या दृष्टीने गाव रामायणाचे प्रयोग गावोगावी व्हावे , अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन कवी संजय बोरकर यांनी केले तर आभार कमलेश झाडे यांनी मानले. शासनाच्या निर्देशाचे अनुपालन करत ह्या छोटेखानी खाजगी स्वरूपात हा आॕनलाईन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.