‘पालकमंत्र्यांची डिजीटल राहुटी’ उपक्रमाचा शुभारंभ जनतेला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी शासन बांधील- ना. बच्चू कडू

33

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.२६जानेवारी):- अकोला जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला ‘पालकमंत्र्यांची डिजीटल राहुटी’ हा एक अभिनव उपक्रम असून याद्वारे खेड्यापाड्यातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांना विविध सेवा देणे, त्यामाध्यमातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे सहज शक्य होणार आहे. याद्वारे जनतेला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी शासन बांधील असल्याची भुमिका राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अधोरेखित केली.

‘पालकमंत्र्यांची डिजीटल राहुटी’, या उपक्रमाचा आज पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याद्वारे आज ना. कडू व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील कळंबेश्वर व माझोड येथील नागरिकांशी दुरस्थ प्रणालीद्वारे थेट संवाद साधला. त्यांच्याशी वार्तालाप करुन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे मनोगतही जाणून घेतले.

यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी अधिकारी सहभागी झाले.

याप्रसंगी बोलतांना ना. कडू यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व नव्या तंत्रज्ञानाचा वापर हा उत्तम प्रशासनासाठी आणि लोकांच्या समस्या व प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याद्वारे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासू नये.

या उपक्रमासाठी परिश्रम घेणारे जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना यावेळी ना. कडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.