घरोघरीचा रेडिओ गेला : हातोहाती मोबाईल आला

82

(विश्व आकाशवाणी दिन)

रेडिओ म्हटलं की काय आठवतं हो तुम्हाला? हेच ना.., “नमस्कार, आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे… ये आकाशवाणी केंद्र है और आप सून रहे है, आप की फर्माईशऽऽ..! इयम् आकाशवाणी, सम्प्रति वार्ता: श्रूयन्ताम्…” आणि बरच काही. लहानपणी विविध भारतीवर गीतमाला व आता विविध एफ.एम.स्टेशन्सद्वारे मनोरंजन करणारा एकमेवाद्वितीय म्हणजे आपला लाडका रेडिओ! जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. युनेस्कोने २०११मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे २०१२पासून या दिवसाला सुरुवात झाली. भारतात सन १९२७मध्ये त्याचे प्रसारण सुरू झाले. त्यात टाइम्स ऑफ इण्डिया व टपाल खात्याच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट १९२१मध्ये टाइम्सच्या मुंबईतील इमारतीतून गाण्याचा एक विशेष कार्यक्रम प्रसारित झाल्याची नोंद आहे.

आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. सकाळी ५-३० वा.नागपूर केंद्रावर ‘वन्दे मातरम्ऽऽ.. सुजलाम, सुफलाम्ऽऽऽ…’ हे राष्ट्रगान ऐकून लोक उठत. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती? बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई.. उशीर झाला. अजून भाजी पोळी व्हायची आहे, असे आवाज स्वयंपाकघरातून यायचे. मी तर बैठक वा वऱ्हांड्यात मोक्याच्या जागी खुंटीला रेडिओ टांगून खड्या आवाजात ऐकायचो. कोणी शेतावर किंवा परगावी जातांना चालू रेडिओ खाकेत अडकवून गाणे वाजवत नेत असत. संध्याकाळी बातम्यांच्या रूक्ष आवाजाच्या साथीने चहाचा आस्वाद घ्यायचा अन् रात्री ‘आपली आवड’च्या संगतीने डोळे मिटायचे. जरा जास्त शौकीन असलेला माणूस त्यावर सिलोन, सिबाका गीतमाला, विविध भारती वगैरे सापडतंय का? हे तो खुंट्या-कळा पिळून फिरवू बघत असे.

क्रिकेटची कॉमेंट्री अर्थात धावते समालोचन ऐकण्यासाठी तर क्रिकेटप्रेमींचे कान दिवसभर रेडिओला चिकटलेले असायचे किंवा त्यांचा घोळका त्याच्या भोवती कान टवकारून बसत असे. तेव्हाचे रेडिओही आवाजापेक्षा खरखराट करणारेच असायचे, ते स्पष्ट आवाजापेक्षा खरखराट करणारेच बनविले जात की काय? कोण जाणे? पण तरीही तो ऐकायचा. तो असह्य वाटायचा नाही, कारण रेडिओवरून टाईमही कळत होता. तेव्हा विरंगुळ्याचे प्रभावी व सुंदर साधन फक्त तेच होते. त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घड्याळासारखा जास्त व्हायचा.मग दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला. समोर चित्रं पहायला मिळत असताना नुसताच आवाज कोण ऐकणार, नाही का? यानंतर मोबाईल आणि सोशल मीडियामुळे हा अधिकच दुर्लक्षित होत गेला. परंतु आता एफ.एम.च्या आगमनानंतर त्याला चांगलाच शुद्ध प्राणवायू मिळाला आहे म्हणायला काही हरकत नाही.

रेडिओचा शोध सन १८८५साली इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोनी याने लावल्याचे म्हटले जाते. मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. तुम्हाला माहिती असेलच ना? इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व ते प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले. सन १९३६ साली त्याला ऑल इंडिया रेडिओ नाव मिळाले. त्यास ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम.व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारतीने त्यावरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. सन १९८२साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व तो मागे पडला. रेडिओतल्या बदलाबरोबरच त्याच्या संचातही अनेक बदल झाले.

दि.१३ फेब्रुवारी १९४६मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती. यूनेस्कोच्या महासंचालकांनी तिचा प्रस्ताव मांडला होता. हा दिवस साजरा करायचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओसारख्या प्रभावी प्रसार माध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे व त्यामार्फत माहितीचा साठा उपलब्ध करून प्रदान करणे, तसेच ब्रॉडकास्टर्स नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे, हे आहे. सद्या मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे. मोबाईलचा रेडिओ तरी सर्वांनी ऐकत गेले पाहिजे. कमालीची गोष्ट म्हणजे युट्यूब, ट्विटर, फेसबुकच्या जमान्यात पण त्याने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. सांप्रत भारतातल्या ७२ शहरांमध्ये खाजगी एफ.एम.वाहिन्या कार्यरत आहेत. आजही रेडिओ हेच प्रभावी माध्यम समजले जाते. चला तर मग, श्रोतेहो! आजच्या या दिवसाचे निमित्त साधून जुन्या आठवणींना नवे रंगढंग देऊ. नव्याने सदाबहार रेडिओ ऐकण्यात स्वतःच स्वतःचे भान हरपून जाऊ!

✒️संकलक व लेखक -श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(मराठी व हिंदी साहित्यिक तथा इतिहास अभ्यासक)
मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली (४४२६०५).
भ्रमणध्वनी – ९४२३७१४८८३.
email – Krishnadas.nirankari@gmail.com