आठ मार्च ते आठ जून समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविणार

29

🔹कागलमध्ये महिला स्वयंसहायता समूह उत्पादित वस्तूंच्या विक्री केंद्र इमारतीचे उद्घाटन उत्साहात

✒️कागल(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कागल(दि.1मार्च):-येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार आहे. महिला अबला नाहीत, त्या सबला आहेत. यापुढे त्यांना अजून सक्षम करण्याची गरज आहे.कागल पंचायत समितीच्या आवारात महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन माझ्या व खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले.समाजातील विकासाच्या महिलाही निम्म्या हक्कदार आहेत, या जाणिवेतूनच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रभावीपणे सुरू आहे.

खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागलचे विकासाचे विद्यापीठ म्हणून ओळख व्हावी, एवढे सुंदर चित्र निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक क्रांतिकारक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. ग्रामविकासाच्या विभागाच्या अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी हाती घेतलेली महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानही महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

चला भरारी घेऊया…….
सावर्डे बुद्रुक येथील महिला कार्यकर्त्या सौ. दीपाली पाटील म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांना व्यापक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यांच्यासारखा उमदा मावळा आपल्या पाठीशी असल्यामुळे ‘चला भरारी घेऊया आणि महिला भगिनींची सर्वांगीण प्रगती साधूया, असेही त्या म्हणाल्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्य वाटप व महिला बचत गटांना धनादेशाचे वाटप झाले.

यावेळी जिल्हा बॅंक संचालक भैया माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रवी शिवदास, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, उपसभापती सौ. अंजना सुतार, पंचायत समिती सदस्य रमेश तोडकर, विजय भोसले, जयदीप पोवार, गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर आदी उपस्थित होते. स्वागत गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी केले. प्रास्ताविक दयानंद पाटील यांनी केले. आभार विस्तार अधिकारी सौ. कासोटे यांनी मानले.