बुलढाणा जिल्ह्याला मिळाले 85 ऑक्सिजन सिलेंडर

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी

बुलढाणा(दि.20एप्रिल):- कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे बुलडाणा जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजन सिलेंडर ची मागणी वाढत आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अश्यावेळी रुग्ण, त्यांचे नातेवाईक व सोबतच वैद्यकीय कर्मचारी देखील हतबल झाले आहेत. काल चिखली येथे एकही ऑक्सिजन सिलेंडर नसल्याची गंभीर बाब मला कळाली.ऑक्सिजन सिलेंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही, अश्यातच रुग्णांच्या जिवाला पण धोका होऊ शकतो हे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला कळविले.

ही माहिती मिळाल्यानंतर मी बीड, जालना व राज्यातील ईतर काही ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन प्लांटसोबत बोलणे केले. परंतु त्यांच्या जिल्ह्यातच ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांनी सिलेंडर देण्यास असमर्थता दर्शविली. पण बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी चिखली साठी 40 सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले. सोबतच उपजिल्हाधिकारी श्री.भुषण अहिरे साहेबांनी बुलडाणा शहरातसुद्धा ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा असल्याचे मला कळविले. त्यामुळे बुलडाणा शहरासाठी सुद्धा 45 ऑक्सिजन सिलेंडर मिळण्याची व्यवस्था केली.

राज्य शासनाच्या अपयशामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु राज्य सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवून आपला निष्क्रिय कारभार झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वतः ही काही करायचे नाही आणि इतरांनाही काही करु द्यायचे नाही हीच भूमिका राज्य सरकार घेत आहे. राज्य सरकार कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना न करता ईतर गोष्टींमध्ये लक्ष देत आहे आणि यातच सरकारचा वेळ जात आहे. परंतु सरकारच्या या सर्व निष्क्रिय कारभारामुळे मात्र जनतेच्या जिवाशी खेळ होत आहे. आरोग्य व्यवस्था सुधारणे हे राज्य सरकारचे महत्वाचे काम आहे. परंतु आज राज्यात दवाखान्यांत बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाहीत, कर्मचारी सुद्धा नाहीत. त्यामुळे सर्व आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. रूग्णांना तर प्राणवायू हवाच आहे पण सद्यस्थितीत असणाऱ्या व्यवस्थेतही प्राण फुंकण्याची गरज आहे.

बुलडाणा जिल्ह्याला मिळालेल्या 85 ऑक्सिजन सिलेंडरपैकी 45 सिलेंडर बुलढाणा येथे 18 एप्रिलला तर उर्वरित 40 सिलेंडर 19 एप्रिलच्या सकाळी चिखली येथे पोहचले आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्याला लागणारी मदत सातत्याने मिळवून देण्यासाठी यापुढेही माझा प्रयत्न असेल.