✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.23फेब्रुवारी):-राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्यामार्फत रोजगार निर्मीतीकरिता कृषी महोत्सव चंद्रपूर येथे जनजागृती मेळावा व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २.०० वा. चांदा क्लब ग्राऊंड नागपूर रोड वरोरा नाका, चंद्रपूर येथे सुशिक्षीत बेरोजगारांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खादी व ग्रामोद्योग आयोग यांचे तज्ञांकडून मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मध्ये सेवा उद्योगाकरिता कमाल मर्यादा २० लाख रूपये व निर्माण उद्योगसाठी कमाल मर्यादा ५० लाख रूपयापर्यंत बॅंकेमार्फत कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी १५ टक्के ते ३५ टक्के सबसिडीची तरतूद आहे.
यामध्ये खनिज आधारित उद्योग, वन आधारित उद्योग, कृषी आधारित उद्योग, पॉलिमर व रसायन आधारित उद्योग, अभियांत्रिकी व अपारंपारिक उर्जेवर आधारित उद्योग, तसेच सेवा आधारित उद्योग या विषयावर खादी व ग्राम उद्योग आयोग येथील तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच बँकर्स कडून लोन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ तरूणांनी घ्यावा, असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.