✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.3सप्टेंबर):-ट्रॅक्टर चालक युवकाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना बुधवारी दुपारी आडस येथे घडली. या युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी ट्रॅक्टर मालकासोबत पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्यानंतर रागातून युवकानेआत्महत्या केली, असा आरोप केला.
याप्रकरणी गुन्हा दाखल करुन ट्रॅक्टर मालकास तात्काळ अटक करावी अशी मागणी करत संतप्त नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान आडस पोलीस चौकीसमोर ठेवला. यामुळे येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर स.पो.नि. सुरेखा धस यांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.राजेश बालासाहेब काळे (वय 21 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. राजेश गावातील गोविंद वाघमारे यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला होता. वर्षाचा करार करून वाघमारे यांनी त्यास उचल दिली होती. मात्र चालक राजेश हा ट्रॅक्टरवर कामास येण्यास उत्सुक नव्हता. उचल घेतलेली रक्कम आणि कामावर न येणे यातून वाघमारे आणि राजेश यांच्यात वाद झाला. यातून राजेश याने बुधवारी दि. 2 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास विषारी द्रव्ये प्राशन केले.

याची माहिती मिळताच नातेवाईकांनी राजेश यास उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती येथे दाखल केलं. येथे उपचारादरम्यान त्याचा रात्री 9 च्या सुमारास मृत्यू झाला.
तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ट्रॅक्टर मालकाने मारहाण केल्याचा राग सहन न झाल्याने राजेश काळे यानेआत्महत्याकेली असा आरोप केला. वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करत त्यांनी राजेशचा मृतदेह आडस येथील पोलीस चौकीसमोर ठेवून ठिय्या आंदोलन केले. यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटना समजताच धारुर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सुरेखा धस, कानिफनाथ पालवे, पो.उप नि. संतोष भालेराव आदी कर्मचारी आडस येथे दाखल झाले. तब्बल पाऊण तास मृतदेह चौकी समोर ठेवण्यात आला.उपसभापती ऋषिकेश आडसकर यांनी नातेवाईकांच्या भावना ऐकून घेतल्या तर स.पो.नि. सुरेखा धस यांनी तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांचे समाधान झाले. मृतदेह ताब्यात घेऊन दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित आरोपीच्या अटकेसाठी दोन पथके रवाना झाल्याची माहिती स.पो.नि. धस यांनी दिली आहे.

Breaking News, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED