नागपुर समाचार : मित्रांच्या पार्टीने बनवला नागपूरचा नाईक तलाव परिसर हॉटस्पॉट

11

 

नाईक तलाब प्रतिबंधित इलाका

👉 नागपूर समाचार : नाईक तलाव परिसर कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट ठरला आहे. केवळ 4 दिवसात या परिसरातून 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याला कारणीभूत या परिसरात झालेली एक पार्टी असल्याचे सांगितले जात आहे. या पार्टीतील आयोजकांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील 16 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. पार्टीतील एका मित्राच्या 13 तर दुसर्‍या मित्राच्या कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 4 शेजार्‍यांचाही समावेश आहे. दरम्यान, एका व्यक्तीमुळे 75 जणांना ही लागण झाली असून, महापालिकेच्या वतीने संपर्कातील 700 वर नागिरकांना क्वारंटाईन केले आहे.

👉 नाईक तलाव परिसरात काही मित्रांनी मिळून एक पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत चार ते 5 जण सहभागी होते. पार्टीच्या आयोजकाने मोमीनपुरा येथून सामानाची खरेदी केली होती. पार्टी संपल्यानंतर आयोजकाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी करण्यात आलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाली. मागील चार दिवसात या परिसरातून एकूण 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेकडून हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला होता. या परिसरातील मार्ग तात्काळ प्रभावाने आवागमनासाठी बंद करण्यात आला आहे.