चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे एक लाख अहवाल निगेटिव्ह

28

🔸प्रयोगशाळा उभारणी व ॲन्टीजन टेस्ट किट खरेदीसाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांचा पुढाकार

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27ऑक्टोबर):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची सुरवात 18 मार्च रोजी चार नमुने घेवून करण्यात आली होती. सदर दैनिक कोरोना चाचण्यांची संख्या आता हजारच्या घरात पोहचली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण एक लाख 16 हजार 762 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 167 नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीत नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी गत आठ-नऊ महिन्यांपासून राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस, समाजसेवी संस्था व नागरिक अहोरात्र झटत आहे. जिल्हा प्रशासन सुरवातीपासूनच कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फार कमी आहे.

जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण 2 मे 2020 रोजी आढळला होता. आज रोजीपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात सुरवातीपासून एकूण पॉझेटिव्ह झालेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 49 झाली आहे. यातील 12 हजार 48 जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे एकूण मृत्युंची संख्या 223 वर पोहचली आहे. त्यात जिल्ह्यातील 210 तर इतर जिल्ह्यातील 13 मृत्यूंचा समावेश आहे. जिल्ह्यातील मृत्युदर हा 1.41 टक्के आहे. जो राज्याच्या तुलनेत (2.63) बराच कमी आहे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.

सुरवातीला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-19 विषाणु तपासणीसाठी नमुने पाठविण्यात येत होते. परंतु रुग्णांची वाढती संख्या व अहवाल येण्यास होत असलेला उशीर लक्षात घेता कोरोना आपत्ती काळात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने व प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे येथील प्रयोगशाळेचा प्रश्न त्वरीत निकाली काढण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयात ‘विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा’ (व्हीआरडीएल) सुरू करण्यात आली आहे. याशिवाय जलदगतीने चाचण्या होण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी शासनाचा निधी तत्परतेने उपलब्ध करून दिला. यातून मोठ्या प्रमाणात ॲन्टीजन टेस्ट किट विकत घेता आल्या. त्यामुळे जास्तीत जास्त नमुन्यांची चाचणी होऊन नागरिकांना वेळीच उपचार मिळत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ‘आरटीपीसीआर’च्या 55 हजार 842 तर ‘अॅन्टीजन किट’द्वारे 60 हजार 920 असे एकूण एक लाख 16 हजार 762 नमुन्याची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यात एक लाख 167 चाचण्याचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 15 हजार 49 अहवाल कोरोना पॉझेटिव्ह असून 967 अहवाल प्रतिक्षेत व 579 नमुन्यांचा निर्णयक अहवाल प्राप्त झाला नाही.

जिल्ह्यात 24 फिवर क्लिनीक, 16 कोव्हीड केअर सेंटर, 12 कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 4 डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पीटल कार्यरत असून यात अधिक वाढ करण्यात येत आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 17 हजार 818 बांधीतांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्विकारला आहे. तसेच बाधीत रुग्णांना इतरत्र खाजगी रुग्णालयात उपचार करायचे असेल तर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.

नागरिकांनीही ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ओळखून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये, कोरोनापासून बचावासाठी सुरक्षित साधणांचा वापर करावा, बाहेर पडतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, हात वारंवार स्वच्छ धुवावे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.