ओबीसी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी कृषी क्रांती योजना जाहीर करा

28

🔸जि.प.सदस्य संजय गजपुरे यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.28ऑक्टोबर);-निसर्गाच्या लहरीपणा मुळे आता शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होत चालले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धान, कापुस, सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतरही पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. पण सिंचनाच्या अपुऱ्या सोयींमुळे निसर्गावर अवलंबुन राहावे लागते. त्यातही काही शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन किंवा कर्ज काढून आपल्या शेतात विहीर बांधकाम व कुपनलिका खोदुन सिंचन करण्याचा प्रयत्न केला आहे.

काही शेतकऱ्यांच्या मागील २० ते २५ वर्षांपासून खोदलेल्या विहिरी व कुपनलिका खचल्याने दुरुस्तीसाठी आलेल्या आहेत. एकीकडे शेतीतुन उत्पन्न निघत नाही तर दुसरीकडे हातात आलेले पिक निसर्ग आपल्या लहरीपणामुळे हिरावून घेतो , अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी फसलेला आहे. मोठ्या प्रमाणावर गरीबी असल्याने आर्थिक विवंचनेमुळे शेतातील दुरुस्ती करणे अवघड झाले आहे. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती साठी विविध प्रकारच्या योजना घोषित केलेल्या आहेत.

अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तर अनुसूचित जाती तील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीर रु.२.५० लक्ष , जुनी विहीर दुरुस्ती रु. ५० हजार , ईनवेल बोअरिंग रु.२० हजार , पंपसंच रु.२० हजार , वीज जोडणी आकार रु.१० हजार , शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण रु. १ लक्ष , व सुक्ष्म सिंचन संच ( ठिबक सिंचन संच रु.५० हजार किंवा तुषार सिंचन संच रु. २५ हजार ) , पीव्हीसी पाईप रु. ३० हजार , परसबाग रु. ५०० या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.

पण ओबीसी शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अशा कुठल्याही प्रकारच्या योजना नसल्याने शेवटी सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे व कर्जबाजारी व्हावे लागत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी हे ओबीसी समाजातील असुनही त्यांच्यासाठी एकही शाश्वत योजना नसल्याने असंतोष निर्माण होत आहे . जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडे सुदैवाने बहुजन कल्याण विभाग ( ओबीसी ) मंत्रालयाची जबाबदारी आहे.

तरी ओबीसी शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न व सबलीकरण करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री मान . विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन अनु.जाती / जमाती तील शेतकऱ्यांच्या धर्तीवर ओबीसी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करावी अशी मागणी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे . निवेदनाच्या प्रती त्यांनी माजी पालकमंत्री मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार , खासदार अशोकभाऊ नेते , आमदार बंटीभाऊ भांगडिया , विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनाही पाठविल्या आहेत.