जि. प. उर्दू शाळेत ईद-ए-मिलादुन्नबी

32

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.30ऑक्टोबर):-जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा चिमूर येथे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधापिका कमरुन्निसा सय्यद होत्या व प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहम्मद समिम अन्सारी, मुस्तकीम पठाण, जैबुन्निसा शेख, शबाना बेगम आदी मान्यवर उपस्थित होते.

या शाळेच्या विद्यार्थिनी झरीन शेख नी सुरेह फातेहा व अरबीया शेख नी नात शरीफ करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मुख्याधापिका कमरुन्निसा सय्यद म्हणाल्या की, मोहम्मद पैगंबर यांची जन्मभूमी मक्का असून कर्मभूमी मदिना आहे. त्यांचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे होते. आपल्या आयुष्याचा त्याग करून त्यांनी संपूर्ण जग उजळविले. शांततेच्या या दूताचे विचार आजच्या काळातही मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत, त्यांची शिकवण सर्वासाठी उपयोगी आहे.

विद्यार्थ्यांनी मोहम्मद पैगंबर यांचे विचार आत्मसात करावे. त्यांचे शांतता, सलोखा व अहिंसेवरील विचार अत्यंत महत्त्वाचे असून आजच्या आधुनिक काळात तर त्यांचे विचार अधिकच वाढले आहे. सर्व धर्म एक आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, इसाई या सर्व धर्माचा अभ्यास केला असता सर्व धर्म एक आहे. सर्व धर्मातून मानवसेवा हाच खरा धर्म अशी शिकवण दिली आहे. त्याचाच आपण सर्वांनी स्वीकार करावा. बंधूभाव निर्माण होण्यासाठी अशा उदार व विशाल मनोवृत्तीची गरज आहे.
ईस्लाम म्हणजे स्वतःला अल्लाहबद्दल समर्पित करणे. तसेच यात कलिमा, नमाज, रोजा, हज व जकात हे पाच घटक महत्वाचे आहेत. मोहम्मद पैगंबर म्हणतात, या जगातील अनंत दुःखाचे कारण आहे. असमाधान, अतृप्ती, अहंकार, खोटा अभिमान, दुस-याचा द्वेष, मत्सर, हेवादावा यांना मनातून बाहेर काढा.

त्या ठिकाणी आपोआप आनंद निर्माण होईल व आपले जीवन सुखी, आनंददायी होईल.मंचावरील उपस्थित मान्यवरांनी ईद-ए-मिलादुन्नबी या विषयावर मार्गदर्शन केले. ईद-ए-मिलादुन्नबी पावनपर्व असल्यामुळे या कार्यक्रमात उत्साह व आनंद होता. यावेळी कोविड १९ मुळे मास्क व सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नगमा रफिक शेख यांनी तर आभार प्रदर्शन शहेनाज बेगम अन्सारी यांनी केले. शेवटी सर्वाना मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.