फक्त लढ म्हणा..

37

संकटे येतात आणि जातात. संकटांत खंबीर असणे महत्त्वाचे. अचानक येणाऱ्या संकटाने, दुःखाने प्रत्येक माणूसच सुरुवातीला थोडासा चळतो, ढळतो. हे अगदी सहाजिकच आहे. निसर्गनियम आहे. अशा परिस्थितीत खऱ्याअर्थाने त्याला मानसिक आधाराची गरज असते. भावनिक खंबीरतेची आवश्यकता असते. यासाठी माणूस आपुलकीच्या चार शब्दांची वाट पाहत असतो. खंबीर बनवणाऱ्या माणसाचा शोध घेत असतो. मोकळे होण्यासाठी मनमोकळे बोलण्याची गरज असते. त्यासाठी कुणाच्यातरी हृदयात स्वतःची जागा हवी असते.

मानसिक, भावनिक बळ प्रेमाच्या चार शब्दांनी मिळते. आपुलकीचे चार शब्द खूप मोठी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. संकटाला सामना करण्यासाठी ‘उभं’ करतात. अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य देतात. दुःख पचवण्याची शक्ती देतात. आपले आधारस्तंभ कोण असतील हे आपले अंतर्मन ठरवत असते. आपले आदर्श आणि जवळचे हेच आधारस्तंभ असतात. ही कविता सगळ्यांनाच आठवत असेल

 

खिशाकडे हात जाताच

हसत हसत उठला

पैसे नको सर मला

जरा एकटेपणा वाटला

 

मोडून पडला संसार सारा

तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवूनी

नुसतं लढ म्हणा…

 

आपल्या आदर्श असणाऱ्या, भावनिक आधार देणाऱ्या गुरुजीने पाठीवर हात ठेवून लढ म्हटल्यावर कोणत्याही तुफानाला सामोरे जाण्याची ताकद आमच्यामध्ये येते. ती याच आपुलकीच्या शब्दाने. कौतुक करणाऱ्या, धैर्य देणाऱ्या दोन वाक्यांनी माणूस उभा राहतो. माणसे आयुष्यभर आधार शोधत राहतात. खरोखर यशस्वी जीवन जगण्यासाठी मानसिक ताकद देणारे चार शब्द हवेच असतात.

आजच्या कोरोना आणीबाणी काळात हेच आपुलकीचे चार शब्द फार महत्त्वाचे आहेत. संकट आपल्यापर्यंत येईस्तोवर आपण खंबीर असतो. एकदा का संकट आले; की एका क्षणात कोलमडून पडतो. हे आज पाहायला मिळते. चांगली चांगली खंबीर माणसे डगमगत आहेत. धडपडत आहेत. कोसळत आहेत. वेळ आल्यावर प्रत्येकालाच भीती वाटते. माणसे जेवढी कोरोनाने खचत नाहीत. त्यापेक्षा जास्त त्याच्या भीतीने गर्भगळीत होत आहेत. अनेकांना या ताणतणावांचे समायोजन करता येत नाही. अनेक जण याचे बळी होत आहेत. अक्षरश: भीतीने थरकाप होऊन बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आल्याचे ऐकायला मिळत आहे. इथे गरज आहे भावनिक, मानसिक भक्कमपणाची. संकटाला तोंड देणाऱ्या खंबीर मनाची, भरभक्कम हृदयाची…!

आज कोणत्याच कारणामुळे कुणाचेही उणेदुणे काढू नका. कुणा सोबत वैर भावना ठेवू नका. कुणाचा हेवा करु नका. कुणाचा द्वेष करू नका. असूया बाळगू नका. याउलट जेवढा लावता येईल तेवढा जीव लावा. एकमेकांचा जेवढा आधार बनता येईल तेवढा बना. एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने वागा. गर्व, अहंकार काढून टाका. शेवटी जान है तो, जहान है…. सांगता येत नाही कोणती वेळ कशी येईल…? कोणावर येईल…? कधी येईल…? आत्ताच सावध व्हा.. आता नाही तर, कधीच नाही.

हीच वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याची. परस्परांचा आधार होण्याचे. सुरक्षित सामाजिक आंतर ठेवायचे असले; तरी मानसिक दुरावा मात्र कमी करायचा आहे. काही समज, गैरसमज दूर करायचे आहेत. मनातून स्वच्छ, नितळ, निर्मळ व्हायचे आहे. नाविण्यासाठी, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी

चांगले बोलण्यासाठी, चांगले बघण्यासाठी मनातला अहंकार गर्व कमी करायचा आहे. दुसऱ्याची विनाकारण टिंगल-टवाळी निंदानालस्ती पूर्णतः बंद करायची आहे. आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द चांगलाच असला पाहिजे.. यासाठी मनोमन प्रयत्न करायचे आहेत. येताना रिकाम्या हातांनी येतो; जाताना रिकाम्या हाताने जातो. मधल्या काळात आयुष्यभर अनेकांची मने जिंकायची आहेत. अनेकांच्या हृदयात जिव्हाळ्याचे, आपुलकीचे अढळ स्थान निर्माण करायचे आहे. आयुष्यात काय कमावले…? यापेक्षा किती माणसे जमवले…? याला फार महत्व आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे.

स्तुती, कौतुक, प्रोत्साहन कुणालाही हवेहवेसे वाटते. मानसिक बळ देते. पुढील कार्यास ताकद मिळते. आणखी जोमाने, धडपडीने माणूस कामाला लागतो. जेवढे करतोय ; त्यापेक्षा जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करतो. आपल्यातील सर्व क्षमतांचा, बुद्धीचा आणि कौशल्यांचा पुरेपूर वापर करण्याची धडपड सुरू होते. आपल्या चांगल्या कामाची दखल घेतलेली, कुणालाही भावते. प्रेरणा मिळून माणूस खऱ्या अर्थाने जागृत होतो. एकंदरीतच कौतुकाने, प्रशंसा केल्याने माणूस घडत जातो.

खरे पाहता कौतुक करण्यासाठी, प्रशंसा करण्यासाठी, दुसऱ्याला चांगले म्हणण्यासाठी माणसाचे मन खूप मोठे असावा लागते. अंतःकरणात उदारता असावी लागते. दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता असावी लागते. आपल्या स्वतःच्या भावना आणि संवेदना जाग्या असाव्या लागतात. त्यासोबतच आपल्यातला ‘मी’पणा, अहंकार नष्ट नाही तर नाही ; पण किमान कमी व्हावा लागतो. तरच निखळ कौतुक शक्य असते. दुसऱ्याला वाईट बोलणे, निंदानालस्ती करणे, कमी लेखणे सहज शक्य असते. चुका काढणे; हा तर माणसाचा स्थायीभाव असतो. खरेतर कौतुक करणे आणि चुका सुधारणे हा स्वभाव बनायला पाहिजे.

चांगल्या गोष्टींचे, चांगल्या कामाचेच कौतुक झाले पाहिजे. चांगले विचार वाखाणलेच पाहिजेत. तरच अशा विचारांना उभारी मिळेल. चांगल्या कार्याला बळ मिळेल. चांगल्या प्रवृत्तीला धार येईल. मना मनात विचारांची चळवळ सुरू होईल. आपले चांगले शब्द चांगल्या गोष्टीसाठीच असले तरच ते कौतुक ठरतात. नाहीतर त्यावर मतलब ची मळभ साचते. स्वार्थ डोकवायला लागतो. विनाकारणच्या स्तुती मागे कुठला न कुठला हेतू दडलेला असतो. म्हणूनच विनाकारण केलेली स्तुती घातक असते. तीच खऱ्या फसवणुकीची सुरुवात असते. खरेतर लहान मुले आपला आरसा असतात. जोपर्यंत निरागस आहेत ; तोपर्यंत ते सगळे खरे-खोटे सहज सांगून जातात. जेव्हा हा अल्लडपणा, निरागसपणा निघून जातो; त्यावेळी खरे-खोटे यामध्ये मतलब येतो. आपल्या हिताच्या, फायद्याच्या दृष्टीने खरे-खोटे, चांगले-वाईट उलगडू लागते.

याउलट कारण असताना, चांगले घडलेले असताना, चांगले असताना चांगले न म्हणणे यामागेही धूर्तपणा दिसतो. द्वेष जाणवतो. आपल्यातील अहंकार डोकावतो. आपल्यापेक्षा जग सुंदर आहे; ही भावनाच नकोशी वाटते. आपल्यापेक्षा इतर लोक उत्कृष्ट काम करत आहेत. हे खरेखुरे वास्तव स्विकारायला आपण तयार नसतो. आपण आपल्या ‘स्व’विश्वातून बाहेर यायला तयार नसतो. स्वाभिमानाच्या पलीकडे गेलेला दुराभिमान झटकायला तयार नसतो. आपल्यापेक्षा दुसरे कोणी अधिक चांगले करूच शकत नाही हा विनाकारणचा अहंकार बळावत जातो. याचमुळे दुसऱ्यांची योग्य कारणामुळे ही स्तुती करणे, प्रशंसा करणे, प्रोत्साहन देणे सहज शक्य होत नाही. यासाठी मनाची उदारता आणि विचाराची परिपूर्णता यावी लागते. अंतःकरणाची थोरतेकडे वाटचाल व्हावी लागते.

दुसर्‍याच्या चुका काढताना, वाईट बोलताना, दोष देताना आपण बेंबीच्या देठापासून बोलतो. सगळी खदखद बाहेर काढतो. संपूर्ण शब्दसामर्थ्य पणाला लावतो. अशावेळी अबोल स्वभाव असणाराही बोलका होतो. याउलट चांगल्याचे कौतुक करताना, चांगल्याबद्दल बोलताना आपण आडखळतो. चार चांगले शब्द बोलत नाही, लिहित नाही. आपल्याला शब्द सुचत नाहीत. प्रशंसा करण्याची भावना ओथंबून येत नाही. खरे तर आपले कौतुकचे दोन तोडकेमोडके शब्दही समोरच्याला आभाळाएवढे बळ देत असतात. याची जाण असूनही आपण तसे करत नाही…. पण का करत नाही…? याचा निश्चितच प्रत्येकाने विचार करायला पाहिजे.

चांगल्याला चांगले म्हणायची सवय लागली. उत्तम कार्याची प्रशंसा होऊ लागली. मग सगळे जग आपल्याला आपले वाटते. कुणीही, काहीही चांगले केले तरी ते आपल्याला भावते. तोंड भरुन कौतुक करावे वाटते. उदात्ततेन मन भारावून जाते. उत्कृष्टतेचे कौतुक केल्याशिवाय मनाला स्वस्थता मिळत नाही. स्वतःबद्दलचा दुराभिमान, विनाकारण जोपासलेला अहंकार आपोआप विरघळू लागतो. ‘मी’पणा कुठल्या कुठे निघुन जातो. खऱ्या अर्थाने सुंदर असलेले जग अधिक सुंदर दिसायला लागते.

दुसऱ्याचे कौतुक करता करता आपणही मनाने कधी मोठे होतो…? हे आपल्यालाही कळत नाही. चांगले बोलता-बोलता, चांगले म्हणता-म्हणता, चांगले वागता-वागता मनाने, अंतकरणाने , विचाराने आपण आपणही चांगले होतो. विशेष म्हणजे चांगले बोलण्यासाठी, दुसऱ्याची स्तुती करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी मनाचा मोठेपणा सोडला तर दुसरे काहीच लागत नाही. एखाद्याबद्दल चांगलेच बोलायचे असेल तर त्याची फारशी माहिती नसली तरी चालते. त्याचा पूर्ण जीवनपट माहीत नसला ; तरी आपण खूप छान लिहू शकतो, बोलू शकतो.

खरेतर आजचा काळ असा आहे…. विचार कसे आहेत…? यापेक्षा विचार कोणाचे आहेत…? याला महत्त्व आहे. काम किती चांगला आहे..? किती तन्मयतेने केला आहे ? या पेक्षा ते कोणी केला आहे..? याला जास्त महत्त्व दिल्या जात आहे. गवगवा करणारे, आपली चांगली जाहिरात करू शकणारे, उत्तम ओळख-पाळख असणारे लोकच आज पुढे जाऊ शकत आहेत. गुणवत्ता हा निकषच उरलेला नाही. तुम्ही किती छान मांडता… तुमचे विचार किती उत्कृष्ट आहेत. यापेक्षा तुमच्या मागे लोकवलय किती आहे…? हेच पाहिल्या जाते… हीच प्रचंड मोठी शोकांतिका आहे. तुमचे विचार, तुमची शब्दरचना, तुमची मांडणी पाहण्यापेक्षा तुम्ही कोण आहात..? हेच पहिल्या जाते.

आपल्या जवळची, आपल्या ओळखीची माणसे आपले जेवढी स्तुती करत नाहीत, आपल्याबद्दल चांगले बोलत नाहीत. त्यापेक्षा जास्त अपरिचित अनोळखी माणसे आपले कौतुक करतात. आपल्याला चांगले म्हणतात. त्यावेळी माणसाचे मन भरून येते. खरेच काहीतरी चांगले केल्याचे समाधान मिळते. कौतुकाचे दोन शब्द माणसाच आयुष्य बदलून टाकतात. प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. चांगल्या मार्गावर चालण्यासाठी बळ देतात. मनातली आणखी चांगले करण्याची इच्छा वाढवतात. लढायला शिकवतात. म्हणूनच ‘फक्त लढ म्हणणारे’ गुरुजी दहा हत्तीचे बळ देतात…

✒️लेखक:-श्री.मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-9767733560,7972344128