नंदकिशोर गायकवाड यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा – श्री प्रा.तुकाराम दरेकर

28

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून उभे असलेले श्री. नंदकिशोर गायकवाड यांना प्रथम पसंतीचे मत देऊन त्यांना विजयी करावे.

महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाने श्री. नंदकिशोर गायकवाड यांना पुणे शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी दि. ३० जुलै २०२० रोजी जाहीर केली असून, नंदकिशोर गायकवाड हे एक रयत सेवक आहेत. रयत सेवक मित्र मंडळाचे ते सरचिटणीस आहेत.

महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती ) अधिनियम १९७७ आणि नियमावली १९८१ नुसार नियम १२ परिशिष्ट “फ ” मधील तरतुदीप्रमाणे प्रशिक्षित पदवीधर या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ग्राह्य धरून त्यांचा समावेश सेवा जेष्ठतेच्या प्रवर्ग “क” मध्ये करण्यासाठी ते अनेक दिवसापासून चळवळ करीत आहेत.

नंदकिशोर गायकवाड यांच्या चळवळीला यश येऊन सेवाज्येष्ठता ठरविण्यासाठी वेतनश्रेणीचा विचार न करता प्रशिक्षित पदवीधर( बी. ए. बी.एड. आणि बी.ए. डी.एड.) ही पात्रता विचारात घेऊन त्यांना प्रवर्ग “क” मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने ३ मे २०१९ रोजी घेतलेला आहे व त्याप्रमाणे डी.एड. वेतनश्रेणीत काम करणाऱ्या बी.ए. डी.एड. तसेच बी.ए. बी.एड. या शिक्षकांचा समावेश सेवा जेष्ठतेच्या प्रवर्ग मध्ये “क” मध्ये करण्यासाठी प्रत्येक संस्थेत “क” प्रवर्गाच्या सेवा जेष्ठता याद्या अद्यावत करण्याचे काम चालू आहे. या शिक्षकांना आता जो काही न्याय मिळणार आहे, तो नंदकिशोर गायकवाड यांच्या धडपडी मुळे मिळणार आहे. त्यांच्या धडपडीला आम्हीही साथ देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अनेक शिक्षक आता प्रवर्ग “क” मध्ये दहा/ दहा वर्षांनी वरती सरकून सेवेने जेष्ठ ठरणार आहेत.

न्यायालयांच्या निर्णयाप्रमाणे आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व संस्थांनी सेवा जेष्ठतेचा प्रवर्ग “क ” अद्यावत करून घ्यावा म्हणून मी स्वतः यापूर्वी सविस्तर तीन पोस्ट लिहून सर्व ग्रुप वर पाठवलेल्या आहेत.

माझ्या तीन पोस्ट
१) दि. १९ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालय व शासकीय आदेशानुसार माध्यमिक शिक्षकांच्या सेवा जेष्ठता याद्या अद्यावत कराव्यात या आशयाची पोस्ट टाकून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलला विनंती केली होती.

२) दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी उच्च न्यायालय व शासकीय आदेशानुसार माध्यमिक शिक्षकांच्या सेवा जेष्ठता याद्या अद्ययावत करुन रयत शिक्षण संस्थेची बढती देण्याची प्रक्रिया सुरू. या आशयाची पोस्ट मी टाकलेली होती.

३) दि. ७ नोव्हेंबर २०२० रोजी शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेच्या न्यायालयीन लढ्याचा संपूर्ण इतिहास मी लिहिला होता.

या तिन्ही पोस्टवर मला सबंध महाराष्ट्रातून अनेक माध्यमिक शिक्षकांनी संपर्क करून आनंद व्यक्त केला आणि आपापल्या शंकाही विचारल्या. माझ्या ह्या तीनही पोस्ट सबंध महाराष्ट्रात फिरलेल्या आहेत.

शिक्षक आमदार शिक्षक चळवळीतील असावा.

मी स्वतः जून २००० मध्ये झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवलेली आहे. अलीकडे शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्ष आपले उमेदवार देतात आणि हे उमेदवार त्यांच्या पक्षाच्या दडपणाखाली राहतात. ते शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे धाडसही करीत नाहीत. म्हणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांनी शिक्षक चळवळीतील उमेदवारच निवडून देणे गरजेचे आहे.

दि. २८ जून २०१८ रोजी झालेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत अनेक शिक्षक मतदारांनी वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून एका पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिले. गेल्या अडीच वर्षात या शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केलेले दिसत नाहीत.

दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ ची जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. कारण आमदारकीची एक टर्म करून निवृत्त होणारांना ५ वर्षानंतर दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळते. निवृत्त आमदारांना पहिल्या टर्मला ५० हजार तर नंतरच्या प्रत्येक टर्मला १० हजार रुपये याप्रमाणे पेन्शन दिली जाते. आजही सात टर्म आमदारकी करणाऱ्या निवृत्त आमदाराला दरमहा १ लाख १० हजार रूपये पेन्शन मिळते. दरमहा १ लाख ६० हजार रुपये पेन्शन घेणारेही माजी आमदार आहेत.मग तीस ते पस्तीस वर्ष सेवा करणाऱ्या शिक्षकाला पेन्शन पासून वंचित का ठेवले जात आहे ?

शिक्षकांना पेन्शन देताना शासन पक्षपाती भूमिका का घेत आहे ? असे प्रश्न धसाला लावण्यासाठी शिक्षक चळवळीमधील शिक्षक आमदार झाला पाहिजे. अशी मतदारांनी भूमिका घ्यावी.
राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या आमिषाला बळी पडून नाशिक विभागातील शिक्षक मतदार जून २०१८ मध्ये फसलेला आहे.

आता पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिक्षक चळवळीतील उमेदवारालाच विजयी करावे.अशी माझी मतदार बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे.

सेवाजेष्ठतेच्या प्रश्नाप्रमाणेच सर्व शिक्षकांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम २९८२ प्रमाणे जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. म्हणून आपल्याला प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी विधान परिषदेमध्ये अभ्यासू आणि बोलका प्रतिनिधी आपल्याला पाठवायचा आहे.नंदकिशोर गायकवाड हे सर्व दृष्टीने शिक्षक प्रतिनिधी होण्यास पात्र आहेत. म्हणून दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या नावापुढे (1) एक नंबरचा पसंतीक्रम लिहून त्यांना विजयी करावे. अशी माझी आपणास कळकळीची नम्र विनंती आहे.

प्रा. तुकाराम दरेकर
मोबाईल 94 22 91 96 88