भट-पांड्याच्या कटकारस्थानी ग्रंथाचे ज्वालाग्राही चिकित्सक विश्लेषण – गुलामगिरी

34

✒️लेखक:-संदीप गायकवाड(मो:-९६३७३५७४००)

मानवीय समाजाच्या उन्नतीसाठी जगामध्ये अनेक क्रांत्या घडून आल्या.मानवीय समाजाला नैसर्गिक अधिकार मिळावे यासाठी मोठे आंदोलन झाले.पृथ्वीवरील जन्माला येणारा व्यक्ती बॉयलाजीकल डिफरन्सेश सोडले तर समान आहेत.भौगोलिक परिस्थितीनुसार शरीर रचनेत काही फरक दिसून येतात पण शरीराचे सर्व घटक समान असतात.तरी आजही समाजात मानवाला समान मानण्यात येत नाही.विज्ञानाचा सिध्दांत नाकारून विषमतेची अवैज्ञानिक पंरपंरा जगात व भारतात पाहायला मिळते.अमेरिकेमध्ये वंशवाद हा कळीचा मुद्दा असून आफ्रिका खंडातून गुलाम म्हणून आणलेल्या समाजाचे जीवन अंधकारमय होते . अमाणुषतेच्या अत्याचाराने त्रस्त असलेला निग्रो समाज अन्यायविरूद्ध बंड करतो.१८३३ मध्ये अमेरिकेत गुलाम प्रथा कायद्यान्वये समाप्त होते.

निग्रो समाज स्वतःच्या अस्तित्वासाठी झटतो व स्वतःच स्थान अमेरिकेत पक्क करतो.तिथे आज वंशवादाची ज्वाला भडकत आहे कारण गौरवर्णीय पोलीसाकडून कृष्णवर्णीय जार्ज फ्लायडी यांची नरडीवर मांडी ठेवून निर्घून हत्या करण्यात आली. अमेरिकेत कृष्णवर्णीय समाज अन्यायविरूद्ध बंड करत आहे आणि त्याला गौरवर्णीय सुध्दा पाठिंबा देत आहेत . आज विज्ञानाच्या प्रकाशावाटा प्रज्वलीत असतांना कोरोनाच्या महामारीत वंशवादाच्या ज्वालेत अमेरिका जळत आहे त्याला कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची विषमता नीती आहे.डोनाल्ड ट्रम्पनी जेव्हा सेनेला आव्हान केले तेव्हा सेना म्हणाली , “हम संविधान बचाने के लिए बने है; ट्रम्प के लिए नही”. ही स्वाभीमानता भारतीय सेना मध्ये सुध्दा आहे पण राजकारण्याच्या दबावाने ती निर्णय घेऊ शकत नाही.
भारतातही अशीच अदृश्य असमानतेची राजकिय,सामाजिक,व आर्थिक व्यवस्था निर्माण झाली असून वर्तमान राजकिय नेतृत्व जातीव्यवस्था ,धर्मव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्नात आहे.कोरोना महामारीत धर्मवाद,जातीवाद उफाळून येत असून हे वाद निर्माण करण्याचे षडयंत्र काही संघटना करीत आहेत.त्या संघटनांना राजकिय पाठबळ असल्याने भारत आज ज्वालेच्या उंबरठ्यावर उभा आहे.

भारत देशातील समाजव्यवस्था विषमतेने बरबटलेली होती.ही व्यवस्था भारतीय संविधानाने समाप्त करून भारताला नवे ऊर्जाबल दिले. पण मनुचे कपटी वंशज संविधानात्मक व्यवस्था नेस्तनाभूत करण्यासाठी मोठे षडयंत्र रचत आहेत म्हणून १४३ वर्षापुर्वी भारतीय बहुजन वर्गाला गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून ब्राम्हणी धर्मग्रंथाची मूल्यसापेक्ष चिकित्सक मांडणी केली होती.आजच्या परिप्रेश्यात हा ग्रंथ महत्वपूर्ण आहे यांची प्रच्युती हा ग्रंथ वाचल्यास आपल्याला कळून येईल.
गुलामगिरी हा ग्रंथ १ जून १८७३ रोजी प्रकाशित करण्यात आला असून जोतीराव फुले यांनी हा ग्रंथ”युनैटेड स्टेट्स मधील सदचारी लोकांनी गुलामास दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य निरपेक्षता व परोपकार बुध्दी दाखविली यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानशे पुस्तक यास परम प्रीतिने नजर करतो,आणि माझे देशबांधव त्यांच्या त्या स्तुत्य कृत्याचा कित्ता , आपले शुद्रबांधवांस ब्राम्हणीलोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामांत घेतील अशी आशा बाळगतो.”

अतिशय विद्रोहयुक्त अशी अर्पणपत्रिका परिवर्तशील विचाराची अग्नीज्वाला आहे.समाजधिष्टीत अव्यवस्थेला सुरूंग लावून मानव्याचे विहार बांधणारी विज्ञाननिष्ठ महाऊर्जा आहे.गुलामगिरी ह्या ग्रंथाच्या प्रारंभ होमरच्या सुप्रसिध्द वचनाने झाला आहे.ते लिहितात की,”The day that reduces a man to slavery takes
from him the half of his virtue, “
गुलामगिरी हा पद्यग्रंथ एकुण १६ भागात विभागला असून,यातील ११ भाग ब्राम्हणी ग्रंथाची कटकारस्थानीच्या अमानवीय समाजव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगवते तर ५ भाग ब्रिटीश शासनातील उच्चवर्णीय,नौकरशाही विषयी विचार प्रकट करतात.हा ग्रंथ संवाद स्वरूपात लिहला असून धोंडीबा या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना प्राचिन ग्रंथाची चिकित्सक समीक्षा करून हे ग्रंथ कसे बहुजन वर्गाला गुलामीच्या जंजीरात अडकवितात यांचे विवेचन केले आहे.
गुलामगिरीच्या प्रास्तावनेत ते डॉ.प्रिचर्ड या युरोपिय अभ्यासकाच्या संशोधनाचा हवाला देतात ,”आर्य हे मुळ भारतीय नव्हते ह्याबद्दल तिळमात्रही शंका नको.”गुलामगिरीतून त्यांनी भट-ब्राम्हणांची ,धार्मिकपणाचा डौल दाखवून खोटेपणाचा गोष्टीची पुराणे अज्ञानी शूद्रांस सांगून त्याला वेठबिगारी व गुलामगिरीच्या साखळीत करकचून बांधले हे वारंवार विविध दाखले देत स्पष्ट केले आहे.मराठा राजवटीच्या उत्तरार्धात ब्राम्हणी राजवटीच्या उदय काळात बहुजनांवरील अन्यायाचा जो कळस झाला होता.

त्याचे हृदय पिळवटून टाकणारे व चीड निर्माण करणारे वास्तव ते गुलामगिरीत उभे करतात.गुलामगिरी ही किती वाईट प्रथा आहे हे अमेरिकेतील निग्रो लोकांच्या अन्यायावरून दिसून येते ते प्रस्ताविकेत म्हणतात की,” अमेरिकेतील लोकांनी आज शेकडो वर्षापासून चालत आलेली ती दृष्ट चाल बंद करून गरीब अनाथ लोकांस त्या अतिक्रुर लोकांच्या गुलामापासून मुक्त करून त्यास सर्वस्वी सुखी केले .या गोष्टीचा शुद्राद्री अतिशुद्रास इतर लोकापेक्षा अधिक संतोष वाटत असेल कारण गुलामाच्या स्थितीत असता मनुष्यमांत्रास किती दुुःखे सोसावी लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्या वाचून अथवा वर सांगितलेल्या गुलामावाचून इतर लोकांस थोडाच असेल.”ही वास्तिकता समाजापुढे मांडली . जोतीरावांना जेव्हा समजले की ब्राम्हण समाज मानवी अधिकार देत नाही तेव्हा त्यांनी ‘ब्राम्हणाच्या कैदखाण्याच्या कुत्रिम कोटाच्या मुख्य ब्रम्हकपाट दरवाजाला लाथ मारून बाहेर पडलो असे जाहिर केले’.गुलामगिरी हा ग्रंथ लिहण्याचा उद्देश केवळ शूद्रांना त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराची जाणीव करून देणे इतपत नसून उच्चवर्णीयांच्या शिक्षणातून हीच व्यवस्था , संस्कृती शिकविली जाते , ह्याबद्दल सरकारचे डोळे उघडण्याचाही हेतू होता.

या ग्रंथाच्या पहिल्या भागात ब्रम्हा,उत्पती ,सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यावर विचार मांडले आहेत.ते लिहितात की,”मनुसंहितेत लिहले आहे की ब्रम्हदेवाने आपल्या मुखापासून ब्राम्हण तर ब्राम्हणाची सेवा चाकरी करण्याकरीता आपल्या पायापासून शुद्रांस उत्पन्न केले.हा सिध्दांत अवैज्ञानिक असून ब्राम्हणाचे श्रेष्ठ वाढवणारी असून शुद्रांना गुलाम करणारी आहे.’अगर ब्रम्हाच्या विशिष्ट अवयवापासून माणूस तयार झाला असेल तर गर्भधारण करणारा बम्हदेवानी गर्भाची वाढ आपल्या तोडांत कशी केली हा वैैज्ञानिक प्रश्न विचारून मनुसंहितेचे वाभाडे काढले आहेत.ब्रम्हा हा अनैतिक आचरणाचा असल्याने त्यांनी सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला त्यामुळे त्याचे आडनाव बेटीचोद पडले असे सत्यविवेचन केले आहे.ब्राम्हण हे लोक इराण देशातील मुळचे असून त्यांनी भारतात येऊन इतल्या लोकांना जिंकून घेतले असे मत व्यक्त केले आहे.

भाग दोन मध्ये मत्स आणि शंकासूर या विषयी विवेचन केले आहे.आर्य लोकांच्या टोळ्या किती आल्या आहेत हे सांगता येणार नाही.पण त्या जलमार्गाने आल्या आहेत.ब्राम्हण इतिहासकारांनी टोळीचा अधिकारी मत्स्यापासून जन्माला असे लिहले असून मनुष्य आणि मासा यांच्या अवयवात ,आहारात ,निद्रेत,मैथुनाथ किती अंतर आहे.हे आम्ही न समजणारे मुर्ख नाहीत म्हणून मत्स्याविषयची निर्मिती बनावट आहे हे सोदाहरण उदाहरणावरून समजावून दिले आहे.तसेच शंकासूर याचे वर्णन केले आहे.

भाग तीन मध्ये कच्छ,भूदेव अथवा भूपति,क्षत्रिय,व्दिज आणि कश्यप राजा यांविषयी चर्चा केली आहे.मासा आणि कासव यांच्या गोष्टीने ताडून पाहता त्यामधील अंतराचा वेध घेण्यात आला आहे.कच्छ हा कासवापासून जन्माला म्हणून भागवतात लिहला आहे .कच्छाने क्षेत्रांतून पिटाळून लाविलेले क्षत्रियाविषयी मत मांडले आहे.

भाग चार मध्ये वराह व हिरण्याक्ष यांविषयी विवेचन केले आहे.कच्छ मेल्यावर व्दिजाचा अधिकारी वराह झाला तो डूकरापासून जन्माला.जोतीराव म्हणतात की,”डूकर आणि मनुष्य यामध्ये भेद आहे.हा एक चमत्कारिकपणा आहे.भागवतात बनावट पोथ्यांची निर्मिती करून ब्राम्हणानी स्वतःच्या मुर्खपणाची साक्ष दिली आहे.” पद्मा डूकरीनीचे पती ब्रम्हा होते.यावरुन असे लक्षात येते की ब्रम्हा,नारद,आणि मनू ही नावे जनावराची आहेत.हे गप्पाड्या ग्रंथकारास कशी समजली असावी हा प्रश्न जोतीराव फुले उपस्थितीत करतात.हिरण्याक्षास कशाप्रकारे मारल्या गेले यांचे सटीक निष्कर्ष मांडले आहेत.

भाग पाच मध्ये नारसिंह,हिरण्यकश्यप ,प्रल्हाद,विप्र,विरोचन इत्यादीकांविषयी माहिती दिली आहे.नृसिंह कसा कपटी होता.हिरण्यकश्यपचा वध घरच्या खांबातून लपून कसा केला .प्रल्हादला कसा अघोरी काममार्गात तल्लीन ठेवायचा या धृर्त नितीचा जोतीराव फुले यांनी भंडाफोड केला आहे.विप्रानी स्वतःचे राज्य वाचविले.त्याचा पुत्र विरोचन , विरोचनचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी राजा निघाला त्यांनी क्षेत्रपतीवर आपले वर्चस्व बसविले .ही प्रगती वामनला सहन होईना म्हणून त्यांनी बळीचा काटा काढायचा विडाच उचलला .

भाग सहा मध्ये बळीराजा ,जोतीबा,मराठे,खंडोबा,महासुभा,,नऊ खंडाला न्यायी,भैरोबा,सात अश्रय,तळी भरणे,आदितवारास पवित्र मानणे,वामन,पक्ष घालणे,विध्यावली ,घट बसविणे , बळीराजाचे मरण,सती जाणे,आराधी लोक,शिलंगण,तांदूळाचा बळी, दुसरा बळी राजा येण्याविषयी भविष्य,बाणासूर,कुजागरी,वामनाचा मृत्यू,उपाध्ये ,होळी वीर काढणे,बळीप्रतिपदा,भाऊबीज इत्यादीकांविषयी विष्लेशण केले आहे.
बळी राजा हा शेतकरी होता.तो महान पराक्रमी राजा होता.तशी म्हण आजही प्रचलीत आहे.”बळी तो काम पिळी” त्या काळात ब्राम्हणेत्तराचे विविध पुजा करण्याच्या पध्दती होत्या आदितवारी आपल्या कुळ स्वामीची पुजा करत.बळीराज्याचा वामनाने कपटनीतीने पराभव केला.हे जेव्हा विध्यावलीला समजले तेव्हा ती सती गेली.त्यांनतर अनेक स्त्रीया सती गेल्या . बहुजन समाजातील बळी राजा हा मारला गेला तरी बळी राजा पुन्हा येईल यासाठी दर दिवाळीला “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो “अशी ईच्छा बहुजनांची आहे.बळी राज्याला मारण्याची तीन पाऊलाची गोष्ट ही खोटी असून ब्राम्हणानी स्वतःच्या फायद्यासाठी तयार केली आहे.भागवत हा बनवाबनवीचा ग्रंथ असून त्यापेक्षा इसापनिती कितीतरी बरी असे जोतीराव मांडतात.

भाग सात मध्ये ब्रम्हाच्या,ताडपत्रांवर लिहण्याची चाल ,जादूमंत्र,संस्कृताचे मूळ,अटक नदीचे पलीकडे जाण्याची बंदी,पूर्वी घोडी वैगरे ब्राम्हण लोक खात होते,भच,राक्षस,यज्ञ,बाणासूराचे मरण ,परवारी,सुताचे पाष्टीचे चिन्ह,बीजमंत्र,माहार,शुद्र,कुळकर्णी,कुळबी,कुळबीण,शूद्राचा द्वेष,सोवळे धर्मशास्त्र,मनु,भट,पंतोजी,शिक्षण,मोठा भयंकर परिणाम,प्रजापतीचे मरण,ब्राम्हण इत्यादीकांविषयी विवेचन केले आहे. विशिष्ट ग्रंथाच्या निर्मितीतून जादूमंत्राचे अतार्थीक विचार प्रकट झालेले आहेत.यज्ञामध्ये जनावराची आहुती देऊन मांसाहाराची पध्दत वाढली होती.शूद्रांना शिक्षणावर बंदी घातली होती.भटाचे सर्व ग्रंथ हे शूद्रांचा द्वेष करू लागले .सोवळे पाळू लागले .या ग्रंथानी शूद्रांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला . त्यापेक्षा इंग्रजांनी शूद्रांना स्वतःच्या जवळ केले.काही प्रमाणात अधिकार दिले.त्यामुळे इंग्रज सरकार हे आपले मायबाप आहेत तोपर्यंत तुम्ही शिक्षण घ्या असा सल्ला आपल्या बांधवाना जोतीराव फुले देतात.सार्वत्रिक शिक्षणाची जोरदार मागणी करताना ते म्हणतात की,” शूद्र लोक हेच ह्या देशाचे जीवन व शक्ती आहेत.आर्थिक , राजकीय संकटाच्या वेळी सरकारने त्यांच्यावरच अवलंबून असले पाहिजे ,ब्राम्हणांवर नव्हे.जर शूद्रांचे मन नि हृदय ह्यांत सुखसमाधान निर्माण केले ,तर भविष्यकालात त्यांच्या निष्ठेविषयी सरकारला साशंक राहावे लागणार नाही.”(पा.न.१४९ म.जोतीराव फुले ,धनंजय किर)

भाग आठ मध्ये परशुराम ,मातृवध,एकवीस स्वाऱ्या ,दैत्य ,खंडेरावाने रावणाचा आश्रय केला,नऊ खंडची जाणाई,साती आसरा,माहाराचे गळ्यांतील काळा दोरा ,अतिशुद्र,अंत्यज,मांग,चांडाळ,महारास जिवंतच पीयांमध्ये दडपणे,ब्राम्हणात पाट लावण्याची बंदी,क्षत्रिय अर्भकाचा वध,परभु,रामोशी,जिनगर वैगरे लोक , परशुरामाचा पराभव झाल्या मुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुराम यांस आमंत्रण इत्यादीकांविषयी माहिती दिली आहे.परशुराम हा अत्यंत वाईट निर्दयी मुर्ख अधम होता.आपल्या रेणूका आईचे शीर उडवीले .प्रजापती मरताच महाअरीनी परशुरामाशी एकवेळा लढाया लढल्या . त्यावेळी जेजूरीच्या खंडेरावाने रावणाचा आश्रय केला.परशुरामानी महाअरीना रणांगणी कैदी केलेल्या कंबरा बांधू नये म्हणून गळ्यांत काळ्या सुताचे दोऱ्याचे चिन्ह लावले . परशुरामाने महार लोकवर सूड उगवण्यासाठी माणसांना व स्त्रीयांना इमारतीच्या पायात दडपूण टाकले.परशुराम हा खरा की खोटा यासाठी जोतीरावाने एक पत्र लिहले आहे त्यात त्याचे सत्य व असत्य जनतेसमोर मांडले.

भाग नऊ मध्ये वेदमंत्र,जादूचे वजन,मुठ मारणे ,देव्हारे घुमविणे ,जप ,चार वेद ,ब्रम्ह्यघोळ,नारदशाई,नवीन ग्रंथ, शूद्रांस ज्ञान देण्याची बंदी ,भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा इत्यादीकांविषयी.विवेचन केले आहे.युध्दामध्ये ब्राम्हण शस्त्रावर मंत्रविधी करत होते .त्यालाच ते वेदमंत्र म्हणत ,तशीच जांदुमंत्राची विद्या वेदातूनच घेतली आहे.चार वेद खोटे आहे ते वेद अपौरूषीय आहेत हे मत युरोपिय ग्रंथकारानी खोडून ते माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी लिहले असे सिध्द् केले आहे.वेदामध्ये अनेक फेराफेर करून भाकड कथाचे मासल्याची कवने रचली आहेत .नारद हा कळ लावणारा असल्याने त्यांनी शूद्रांवर ब्राम्हण लोकांचे वर्चस्व स्थापण्यासाठी खोट्या खोट्या गोष्टीची निर्मिती केली .भागवतामध्ये अनेक पुरातन मनःकल्पित भाकड दंतकथा आढळतात त्यामुळे हा ग्रंथ विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरत नाही.

भाग दहा मध्ये दुसरे बळी,ब्राम्हण धर्माची फजिती ,शंकराचार्याचे कृत्रिम ,नास्तिक मत, निर्दयपणा ,प्राकृत ग्रंथकार ,कर्म आणि ज्ञानमार्ग ,बाजीराव ,मुसल मानाचा द्वेष आणि अमेरिकेन व स्काँच उपदेशकांनी ब्राम्हणांचा कृत्रिमरूपी कोटा फोडला इत्यादीकांविषयी.. विस्तृत विवेचन केले आहे.दीनाचा कैवारी सत्यवक्ता राजा याने आपल्या राज्यात सर्वांना गुण्यागोविंदाने वागवले . सर्वांना सत्यमय पवित्र ज्ञानाचा व अधिकाराचा उपभोग घेता येत होता.पण भटांनी कृत्रिम दृष्ट आणि मतलबी कृतीतून दीन व दुबळ्या आणि गांजलेल्या बांधवांचे कल्याण न करता देवाचे राज्य स्थापना केले.मिस्टर थॉमस पेनने मानवाच्या हक्काची सनद लिहली तर ब्राम्हनी ग्रंथ आपल्या स्वहक्काची
पोटोबासाठी झटत होते . तथागत गौतम बुध्दांनी कर्मकांड व यज्ञ यावर प्रहार करून समाजाला विज्ञानवाद,मानवतावाद यांची शिकवण दिली.म्हणून ब्राम्हणाचा धंदा बुडू लागला . बौध्द लोकांनी वेदासह सर्व ग्रंथाचा धिक्कार व पराभव केला होता.परंतू ब्राम्हण ग्रंथकारांनी गोमांस खाणे व दारू पिणे सोडले त्यामुळे त्यांनी स्वतःला पवित्र व इतरांना अपवित्र मानले.बुध्द लोकांचा पराभव करून पुनः त्याने त्या आपल्या असलेल्या जादूमंत्रविद्याचे आणि भागवतातील भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले . शंकराचार्य यांनी बौध्द धर्मातील भिख्यू आणि लोकांचे तेलाच्या घाण्यात पिळून मारले . उत्तम ग्रंथ जाळले .त्या काळात जे ग्रंथकार झाले मूकुंदराज,ज्ञानेश्वर , आणि रामदाससारखे अनेक “पायलीचे पंधरा आणि आधोलीचे सोळा”यांनी शूद्र लोकांच्या गळ्यांतील दास्यत्वाच्या पट्याला बोट सुध्दा लावून दाखविला नाही . स्वतःच्या ब्राम्हण धर्माच्या श्रेष्ठतेसाठी अहोरात्र रचना करीत होते.पण त्याचा फायदा सर्वसामान्याना झाला नाही.इंग्रजाच्या काळात ज्या सुधारणा झाल्या त्यामुळे बहुजन वर्गाला ब्राम्हण ग्रंथाची चलाखी समजून आली.पण ब्राम्हणांनी बहुजनात इंग्रज सरकारचा द्वेष पसरविण्याचा सपाटा लावला .

भाग अकरा मध्ये पुराण सांगणे,बंडे वैगरे परिणाम , शूद्र संस्थानिक ,कुळकर्णी,सरस्वतीची प्रार्थना ,जप ,अनुष्ठाने,देवस्थाने , दक्षिणा,मोठ्या आडनावाच्या सभा इत्यादीकांविषयी मत मांडले आहेत.ते म्हणतात की,भटानी चव्हाट्यावर मारूतीच्या देवळात धार्मिकतेचा डौल घालून वरकांती ज्ञान सांगण्याचा भाव दाखवून भागवतातील खोट्या गोष्टी मनी उतरवले त्यामुळे बळीच्या सोबत उभे राहू नये हा हेतू होता . शूद्र संस्थानिक शिंदे,होळकर हे प्रभावी राजकर्ते होते पण त्यांनी कुलकर्णीच्या साहाय्याने राजकारभार चालवला .कलमकसाई करून शूद्रादी अज्ञानी लोकांचे मोठे हाल केले.कुलकर्णी हा व्यक्ती स्वतःच्या समाजाचा फायदा करायचा.बहूजनांना वाचता येत नसतांना खोट्या फिर्यादी,खोटे वचनपत्र लिहून स्वतःचे घर भरले. सरकारच्या डोळ्यातील कुसळ अज्ञानी जनास दाखवून ते काढण्याविषयी त्यास भरीस घालू नये .”लंगडी ते लंगडी आणि गावखुरीही चरते”. याला म्हणावे तरी काय हा प्रश्न जोतीरावांनी विचारला आहे.अज्ञानी गांजलेल्या सर्व शूद्रांस कृत्रिम खोट्या दास्यापासून मुक्त करण्याचा अमेरिकव स्कॉच आणि इंग्लिशांनी मोठी मदत केली.

भाग बारा मध्ये वतनदार भट कुलकर्णी , युरोपियन लोकांचे वसाहतीची जरूरी ,विद्याखात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग, युरोपियन कामगारांची अक्कल गुंग कशी होते इत्यादीकांविषयी माहिती दिली आहे.या भागात जोतीराव फुले यांनी वतनदार भट कुलकर्णी कसे कलमकसाई असतात याचे अवलोकन केले आहे.सारे जात भाईच्या स्वार्थासाठी अज्ञानी शूद्रांना इंग्रजाविरूध्द वाईट वाईट सांगतात .कारण शूद्रांना वाचता न आल्याने ते इंग्रजाविरूध्द वापर करतात त्यामुळे सरकारने शध्दीवर येऊन खेड्यात एखादी इंग्लिश किंवा स्काँच गृहखात्याची नेमणूक करून कुलकर्णीच्या कामावर देखरेख ठेवावी.त्याचप्रमाणे विद्या शिकविण्यासाठी भट ब्राम्हणापेक्षा त्याच जातीतील चांगल्या मुलांची निवड करून विद्याशाखेत नौकरी द्यावी.कारण इंग्रजानी पैसा खर्च करूनही महार,मांग,व चांभार पैकी कोणी एक-एक शिकलेला कामगार आढळत नाही.”भट हे कडू कारले आहेत इंग्रजानी त्यांना तुपात तळून साखरीत घोळले तरी ते जातीस्वभाव न सोडता अखेरीस कडूची कडूच राहली”.शूद्र शिकलेला नसल्याने कुलकर्णी गहाणखाते दस्तऐवज लिहून घेतात व त्याची प्रतारणा करतात,”तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नःप्रचोदयात ” या बीजमंत्रास हरताळ लावून ” चिरी मिरी देव ,चिरी मिरी देव “या यवनी गायत्रीचा जपमाळ करतात .त्यातून स्वतःचा स्वार्थ करून घेतात.त्यामुळे सरकारने यावर बंधन घालावे असे विचार जोतीराव प्रकट करतात.

भाग तेरा मध्ये मामलेदार ,कलेक्टर,रेव्हिन्यू ,जज्ज आणि इंजिनियर खात्यातील भट कामगार इत्यादीकांविषयी यावर चिंतन मांडले आहे.मामलेदार वाईट आचरणामुळे गरीबगुरीब लोकांवर जुलूम करतात.भट ब्राम्हण कलेक्टर इतर सर्व कार्यालयात असल्याने त्यांनी स्वतःच्या जातभाईचाच फायदा केला असून सामान्याना अतिशय त्रास दिला . इंजिनियर खात्यातील भट कामगाराच्या लुच्चेगीरीचा वृतांत कत्राकदार सांगतात.

भाग चवदा यामध्ये युरोपियन कामगारांचा निरूपाय ,खोतांचे वर्चस्व,पेनशन घेऊन निर्वेध झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारांत गावोगावच्या हकिगती कळविण्याची जरूरी ,धर्म आणि जात्याभिमान इत्यादीकांविषयी.चर्चा केली आहे.युरोपियन सरकारने भट समाजांच्या संख्याप्रमाणे एकंदर सर्व खात्यात भट कामगार नेमू नये असे नाही पण सर्व जातीचे कामगार न मिळाल्यास युरोपियन कामगार नेमावेत म्हणजे अज्ञानी शूद्रांचे नुकसान होणार नाही. खोत -भटजीच हा सैतानासारखे अज्ञानी शूद्रांना छळतात म्हणून पेंशन कलेक्टरांना खेड्यामध्ये ठेवून भट कुलकर्णीवर बारीक नजर ठेवावी . पुढे जोतीराव फुले म्हणतात की,” आपण सर्व लोकांची एकी झाल्याशिवाय या लोकांस आपल्या देशातून हाकलून देण्याची ताकद आपल्यात येणार नाही.थॉमस पेन यांनी आपल्या ग्रंथातून दाखवून दिले आहे.इंग्रजानी शिक्षण दिले त्याचा उपयोग करून भटाच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून आपण मुक्त व्हावे.”

भाग पंधरा मध्ये सरकारी शाळाखाते ,म्युनिसिपालिटी ,दक्षणाप्राइज कमिटी व भट वर्तमान पत्रकर्ते यांची जूट आणि शूद्रांदि अतिशूद्रांच्या मुलांनी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादी . सरकारी शाळेमधला अभ्यासक्रम हा मानवीय समाजाला ज्ञान देणारा हवा पण भटांचे ग्रंथ ज्ञान न देता धर्माच्या नावाने शूद्रांना चूकिचे सांगतात,तसेच भटाचे लोक शूद्रांदी वर्गाच्या मुलांना योग्य शिक्षण देत नसल्याने शूद्रांच्या शाळेत शूद्रांचे शिक्षक नेमावे . म्युनिसिपालिटीच्या कमिटीत अतिशूद्रांचे सभासद घ्यायला हवे .जेणे करून तो अापल्या समाजावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडेल .कारण कमिटीत भट लोकांचा भरणा असल्याने ते आपले हित सादतात म्हणून इंग्रजाची ही निती चुकिची आहे यावर सडकून टिका केली आहे.

भाग सोळा मध्ये ब्रह्मराक्षसांच्यापीडेचा धिःकार ,पवाडा, अभंग यावर मत मांडले आहे.भटानी मोठा बंड करून मूळच्या क्षेत्रवासी पूर्वजांस युध्दप्रसंगी जिंकिल्यामुळे त्यास आपले दास केले .तसे धार्मिक ग्रंथ निर्माण करून शूद्राना खोट्या रूढीमध्ये गुंतवून अमाणूष अत्याचार केला.ज्या ग्रंथानी शूद्रांना गुलाम केले त्या सर्व ग्रंथाचा मी धिःकार करतो .या पत्रात ते म्हणतात माझ्या अज्ञानी गांजलेल्या शूद्र बांधवाना भटाच्या दास्यत्वापासून मुक्त होण्याची इच्छा झाल्याबरोबर मला फार आनंद होईल.
जोतीराव फुले यांनी पाठविलेल्या पत्राला लोककल्याणेच्छु या पत्रकाने छापले नाही.आमच्या पत्रात जागा मिळण्याचा संभव नाही असे लिहून पत्र वापस पाठविले.जोतीराव फुले यांना अभिप्रेत समाजव्यवस्था आज निर्माण करायची असेल तर ज्याप्रमाणे अमेरिकेत निग्रोनी आपल्या स्वातंत्र्यासाठी , हक्कासाठी संघर्ष केला तसा संघर्ष भट -बाम्हणाच्या ग्रंथाच्या गुलामी विरूध्द संघर्ष करून नवा मूल्यनिरपेक्ष समाज निर्माण करावा.

वर्तमान परिस्थितीत अमेरिका आणि भारत या देशामध्ये राष्ट्रवादी अंहकारी प्रवृत्तीचे राजकीय शासन असल्याने लोकशाही व्यवस्था कुचकामी होत आहे.अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व भारताचे प्रधानमंत्री हे स्वतःच्या एकचालकाप्रवृतीतून आपल्या विरोधकावर अन्याय करीत आहेत.वंशवाद आणि धर्म- जात यांचे जगात उधान आले असून लोकशाहीला दोन्ही देशानी आय. सी. यु. मध्ये बंदिस्त करून टाकले आहे.अमेरिकेतील शासनाने गौरवर्णीय यांना श्रेष्ठ मानले आहे.तर भारतात ब्राम्हण वर्गाला श्रेष्ठ मानले असल्याने दोन्ही देश अराजकतेच्या उंबरठ्यावर उभे आहेत.त्यामुळे साऱ्या बहुजनाला १४३ वर्षानी गुलामगिरी या ग्रंथाची आजही गरज आहे.जोतीराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथाने गुलाम करणाऱ्या भट-पांड्याच्या कटकारस्थानाचे ज्वालाग्राही चिकित्सक विश्लेषण केले आहे.शूद्र लोकांच्या डोळ्यातील ब्राम्हणी ग्रंथाच्या मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्याचे काम हा ग्रंथ करीत असून आजही या ग्रंथाची वास्तविकता अतिशय महत्वाची आहे.