हिंगणघाट पोलिसांनी अपमानीत केल्याने हॄदयरोगाचा धक्का येऊन हाजी मिर्झा यांचे निधन

32

🔺हिंगणघाटसह सर्वत्र तनावयुक्त वातावरण

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.७डिसेंबर):-काल दि.६ रोजी पोलिस गस्तीदरम्यान शहरातील केजीएन हॉल येथील लजीज रेस्टॉरेंटमधे पोलीस ठाणेदार पिदुरकर व एका फ़ारुकी नामक पोलिस कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादातुन रेस्टॉरेंट संचालक शादाब यास मारहाण करण्यात आली. यादरम्यान शादाब यांचे पिता तसेच बंधु हुमायु मिर्झा बेग तेथे पोचले असता हाजी मिर्झा परवेज़ बेग यांना पोलिसांनी अपमानीत केल्याने हॄदयरोगाचा धक्का येऊन तेथेच कोसळले. हाजी मिर्झा यांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सदर घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला व पुत्र शादाब यांनी ठाणेदार पिदुरकर तसेच सहकारी आरिफ फारूकी यांचेविरोधात पोलिस तक्रार नोंदविली. काल रात्री या घटनेनंतर हाजी मिर्झा यांचे समर्थकांनी ठाणेदार पिदुरकर व सहकारी फारूकी यांचे निलबंन व कारवाईची मागणी लावून धरली.घटनेची दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दखल घेऊन ठाणेदार पिदुरकर यांची उचलबांगड़ी करीत त्यांना पोलिस नियंत्रण कक्षात बोलविले तसेच त्यांचे ठिकाणी नुकतेच बदलून गेलेले पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांना तातपुरता पदभार दिला.

आज ७ रोजी सहायक पोलिस उपनिरीक्षक तसेच ट्रैफिक इन्चार्ज यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी दिली.
सविस्तर माहिती घेतली असता,ठाणेदार भानुदास पिदुरकर हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्री केजीएन हॉल येथील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या लजीज हॉटेलमधे गेले असता संचालक शादाब बेग व ठाणेदार पिदुरकर यांचेत वाद झाला यावेळी हॉटेल संचालक शादाब यांना शिविगाळ करीत मारहाण केल्याने त्यांनी आपले पिता हाजी मिर्झा बेग तसेच बंधु हुमायूं यास पाचारण केले.

जवळच असलेल्या निवासस्थानावरुन हाजी मिर्झा व त्यांचे पुत्र आल्याने पिदुरकर व सहकारी त्यांना अपमानित करुन शिविगाळ करू लागले. वयाने जेष्ठ नागरिक असलेल्या हाजी मिर्झा बेग यांना यामुळे धक्का लागल्याने ते तेथेच कोसळले.हे पाहताच पोलिस निरीक्षक पिदुरकर व सहकारी फारूकी तेथून निघुन गेले, त्यांचे मुलांनी मिर्झा बेग यांना डॉ कोठारी यांचे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले.हाजी यांचे समर्थक व पोलिसांत रात्री पोलिस ठाण्यात वादसुद्धा झाला.त्यावेळी पोलिसांना ज्यादा कुमक बोलवावी लागली.घटनेनंतर काल रात्रीपासूनच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी जाळपोळ केल्याची अफवासुद्धा शहरात पसरली.

काल रात्रीपासून पोलिस यंत्रणा शहरात विशेष दक्षता घेत असून वरिष्ठ पोलिस अधिकारी पियुष जगताप शहरात दाखल झालेले आहेत.आज दि.७ रोजी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात मृतकाचे पोस्टमार्टम दरम्यान हाजी मिर्जाबेग यांचे समर्थक संतप्त झाले होते.परंतु माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,रफीक पत्रकार,दौलत मिर्झाबेग,हुमायूं बेग यांचेमध्यस्थिमुळे पोलिसांना शांतता व सुव्यवस्था राखता आली. आज रात्रि मिर्झा परवेज बेग यांचा दफ़नविधि पार पडला.रात्री उशीरा ठाणेदार भानुदास पिदुरकर यांचा तातपुरता कार्यभार हिंगणघाट येथून नुकतेच बदलून गेलेले पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी स्वीकारला असून सदर प्रकरणी दोषी असलेले ठाणेदार पिदुरकर तसेच इतर दोषी पोलिसावर कारवाई करण्याची मागणी बामसेफ,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,बहुजन मुक्ति पार्टीतर्फे पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकड़े केली आहे.

सदर प्रकरणी वरिष्ठ स्तरावरुन दखल घेण्यात आली असून नागपुर विभागाचे डीआइजी चिरंजीवीकुमार हेसुद्धा भेट देऊन चौकशी करणार आहेत.सदर प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा माजी प्रा.आमदार राजु तिमांडे यांचेशी भ्रमन्ध्वनीद्वारे संपर्क साधुन माहिती जाणून घेतली .