दिव्यांग सहायता उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ डिजिटल प्लॅटफॉर्म, 12 डिसेंबरला होणार लोकार्पण

63

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

मुंबई(दि.12डिसेंबर):-खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून येत्या 12 डिसेंबर रोजी याचे लोकार्पण करणार असल्याची माहिती श्री.मुंडे यांनी दिली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. मुंडे यांनी शुक्रवारी (दि. 11) पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते.

श्री.मुंडे म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तिप्रमाणे जीवन व्यथित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हील चेअर अशी दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही.

समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात, या गरजू दिव्यांग व्यक्तींची व दात्यांची सांगड घालून देण्याचे काम ‘महाशरद’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.

‘महाशरद’ प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ शुक्रवारी (दि.12) सुरू होत असून मार्च -2021 अखेरपर्यंत मोबाईल ॲप्लिकेशन स्वरूपात देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल.

‘महाशरद’चा ‘महाराष्ट्र स्टेट हेल्थ रिहॅबिलिटेशन अँड असिस्टंस फॉर दिव्यांग’ असा विस्तार असून खासदार श्री.पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याचे लोकार्पण करताना आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सुमारे 29 लाख दिव्यांग व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

‘महाशरद’ हे डिजिटल प्लॅटफॉर्म पोर्टल सुरू झाले असून ते अँड्रॉइड ॲप्लिकेशन च्या स्वरूपात प्ले-स्टोअर वर उपलब्ध करण्यात येणार आहे, विभागातील अधिकारी, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग वित्त महामंडळ यातील अधिकारी/कर्मचारी यांनी अत्यंत कमी वेळेत ‘महाशरद’ प्लॅटफॉर्म साकारला असून, याचे मोबाईल ॲप्लिकेशन मार्च 2021 पर्यंत प्ले-स्टोअर वर उपलब्ध होईल; श्री.मुंडे यांनी यासाठी त्यांचे कौतुक देखील केले.

12 डिसेंबर पासून गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छुक दात्यांना या पोर्टल वर नोंदणी करता येणार असून, कोणत्या प्रकारची मदत, सहाय्यक उपकरण किंवा अन्य साहाय्य आवश्यक आहे याबाबत दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार यावर सविस्तर वर्गीकरण देण्यात आले आहे.

गरजू दिव्यांग नागरिक व त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्या विविध सामाजिक घटकांना एकत्र करून मदत मिळवून देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

या पत्रकार परिषदेस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये उपस्थित होते.