रक्त व मांस मानवा-मानवाचे समान – संतश्रेष्ठ रविदासजी

29

[ गुरुदेव संत रविदास पुण्यतिथी सप्ताह विशेष ]

संपूर्ण भारतभर संतशिरोमणी गुरुवर्य रविदासजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र ते विविध प्रांतांमध्ये विविध नावांनी ओळखले जातात. यात बंगालीमध्ये रुईदास, रूयदास, राजस्थानीमध्ये रोहिदास, मराठीत रविदास, रोहिदास, रोहितदास तर पंजाबीमध्ये रैदास किंवा रेयीदास आणि हिंदीमध्ये रविदास व रैदास अशी त्यांची विविध नावे प्रचलित आहेत.गुरूदेव रविदासजी महाराजांची १९ फेब्रुवारी ही जयंती, तर तिथीनुसार माघ पौर्णिमा! ते १४ व्या व १५ व्या शतकात होऊन गेले. त्या काळात जन्मतारखांची नोंद ठेवली जात नव्हती. काहींच्या मते, त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला, तर काहींच्या मते माघ पौर्णिमेला १३७६ साली झाला. अशी मते-मतांतरे त्यांच्या जन्म व देहांताबाबतही दिसून येतात. मात्र माघ पोर्णिमा ही सर्वमान्य जयंती तर मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ही पुण्यतिथी निश्चित झालेली आहे. त्यांच्या जन्माच्या निश्चितीबाबत एक दोहा आवर्जून सांगिला जातो –

“चौदह से तैंतीस कि माघ सुदी पन्दरास ।
दुखियों के कल्याण हित प्रगटे श्री रविदास ।।”

संतश्रेष्ठ रविदासजींच्या वडिलांचे नाव बाबा संतोखदास आणि आईचे नाव माता कळसादेवी असे होते. त्यांचा जन्म काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु ते लहानपणापासूनच ईश्वरभक्तीकडे वळले होते. “वाममार्ग त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा. तोच खरा सन्मार्ग आहे !” असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत. जाती-पाती या माणसाला माणसापासून दूर ढकलून लावतात. जातीवरून मनुष्य उच्च किंवा नीच ठरविता येत नाही, जसे कर्म तशी योग्यता ! समस्त भेदाभेद विसरून आपण एकत्र आल्यास ‘मानव एकता’ साधू शकतो. किंबहुना जाती नष्ट होण्याची प्रतिक्षा करणे बेकार आहे. कारण जात नाही ती जातच कसली? सर्वांचे रक्त व मांस सारखेच असते –

“हिन्दु तुरक नहीं कछु भेदा, सभी मह इक रक्त और मासा ।
दोऊँ एकऊँ दुजा नाहीं, परखो इओं सोइ रैदासा ।।”

गुरुवर्य रविदासजी संतश्रेष्ठ कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंदजी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सन्मार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्याजोगा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले, त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे –

“पराधिनता पाप है, जान लेहु रे मीत ।
रविदास दास पराधीन, तो कौन करे है प्रीत ।।”

सामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. गुलाम राहणे हे महापाप आहे. अशी त्यांची शिकवण होती.संतशिरोमणी रविदासजींनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती.वइथे महाराष्ट्रातल्या कर्मयोगी संतांशी जसे संतश्रेष्ठ गोरोबाजी कुंभार, संतशिरोमणी सातोबाजी माळी, संतश्रेष्ठ चोखोबाजी मेळा, संतशिरोमणी संताजी जगनाडे आदींशी ते नाते जोडतात. आपले दैनंदिन कर्म हीच विठ्ठलभक्ती, असे समजत. कामात दंग राहून ते ईश्वरभक्तीत तल्लीन होत असत. एकदा गुरु रविदासजींना गंगेवर चलण्यास काही लोकांनी सांगितले. परंतु आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने आपण येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. यातून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. ‘मन चंगा तो कठोती में गंगा’ मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे. भक्ति महात्म्य ते असे वर्णन करतात –

“हरि सा हीरा छाँड के, करै आन की आस ।
ते नर जमपुर जाहिंगे, सत भाषै रैदास ।।”

त्यांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती. स्वतः चर्मकार जातीत जन्माला आले असले, तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणार्‍यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही, असा इशाराही ते देतात. सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार सुंदर शब्दात मांडले आहे –

“एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा !
रविदास व्यापै एकों घट भीतर, सभ को एकै घडै कुम्हारा !!”

सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा वा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो. त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात. समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद खालील ओळीतूनही दिसून येतो.

“ऐसा चाहो राज्य में, जहाँ मिले सबन को अन्न ।
छोट बडो सब सम, बसे रविदास रसे प्रसन्न ।।”

संतशिरोमणी रविदासजी महाराजांची पावन पुण्यतिथी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी आज दि.२१ डिसेंबर २०२० रोजी आली आहे. त्यानिमित्त त्यांच्या समाजोद्धारक कार्यास व पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !

✒️लेखक:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
(डि.शै.दै.रयतेचा वाली, जिल्हा प्रतिनिधी, मराठी साहित्यिक तथा संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,
रामनगर, गडचिरोली, जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
email – krishnadas.nirankari@gmail.com