ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरण्यासाठी पाच दिवस

29

🔹सुट्टी असल्याने तीन दिवस बंद

🔸इच्छुकांची धावपळ

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.22डिसेंबर):- तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून २३ ते ३० डिसेंबर नामांकन दाखल करण्यात येणार आहे. मात्र यादरम्यान २५,२६,२७ असे सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे इच्छुकांना केवळ पाच दिवस नामांकन अर्ज भरण्यासाठी मिळणार आहेत.बिलोली तालुक्यातील ७३ पैकी ६४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ आधीच संपला होता; मात्र कोरोनामुळे सर्वत्र लाँकडाऊन असल्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली.

त्यानंतर डिसेंबर महिन्यात निवडणूक जाहीर करण्यात आली असून २३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. यादरम्यानच २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसची,तर शनिवार व रविवार असे तीन दिवस सलग सुट्टी आली आहे. या तीन दिवसात उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता केवळ पाचच दिवस मिळणार आहेत. २७ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार आहे. तसेच १ ते ४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.१५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे,तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरू आहे. सध्या उमेदवार निश्चिती होत आहे. गावात विविध पॅनल व आघाडी स्थापन करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षांपेक्षा उमेदवार व गावातील त्या पँनललाच जास्त पसंती दिल्या जाते. त्यामुळे सध्या विविध पॅनल उमेदवारांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.

◆ जातवैधता प्रमाणपत्रासाठी धावाधाव
निवडणुकीकरिता जातवैधता प्रमाणपत्र द्यावे लागते.२३ डिसेंबर पासून निवडणुकीसाठी अर्ज दिले जाणार आहेत. तत्पूर्वी उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी समाजकल्याण विभागात एकच गर्दी करीत आहे.१ जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावती मिळाल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करता येतो, पुढे वर्षभरात हे प्रमाणपत्र निवडणूक विभागाला सादर करायचे आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी इच्छुकांची आतापासूनच धावाधाव होत आहे.

◆२५,२६ व २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. राज्य निवडणूक आयोगाचे तसे आदेश आहेत अशी माहिती बिलोली तहसीलचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहाण यांनी दैनिक सामना शी बोलताना दिली.