अन्यथा साखर कारखाने बंद पडतील – ऊस क्षेत्रातील तज्ज्ञ भानुदास सालगुडे – पाटील

29

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.9जानेवारी):-गुजरात राज्यात फक्त साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांना डिस्टिलरी आणि को-जनसुद्धा नाही तरी गुजरातमध्ये तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला जात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील साखर सम्राटांनी याचा विचार करावा. काळाबरोबर व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे आहे; अन्यथा कारखाने दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नाही, असे परखड मत ऊस क्षेत्रातील तज्ज्ञ भानुदास सालगुडे – पाटील यांनी व्यक्त केले. माळीनगर साखर कारखान्याचे राजेंद्र गिरमे यांनी केंद्र सरकारने साखरेचा दर 35 रुपये केला तर कारखान्याला फायदा होईल; अन्यथा साखर कारखाने बंद पडतील, असे “सकाळ’मध्ये आपले मत मांडले आहे. त्यावर भानुदास सालगुडे – पाटील यांनी परखडपणे आपले मत मांडले.

ते म्हणाले, जगात साखरेचा दर 24 रुपये किलो आहे, केंद्र सरकारने नवीन धोरण व साखर कारखाने वाचविण्यासाठी नवीन योजना घोषित केलेल्या आहेत. याचा लाभ सहकारी आणि खासगी कारखान्यांनी घेणे गरजेचे आहे. 2019-2020 साठी 100 किलो साखर निर्माणासाठी एक हजार रुपये अनुदान दिले. 2020-2021 या वर्षासाठी निर्यातीसाठी साखरेला 600 रुपये अनुदान जाहीर केले आहे. तीन हजार 500 कोटी अनुदान केंद्र सरकार देणार आहे. साखरेच्या रसापासून हेवी मोलॅसिस, मळीपासून इथेनॉल बनवणे आणि कंपनीला विकण्यासाठी दरवाढ केलेली आहे. भारत सरकारने जे साखर कारखाने इथेनॉल बनविण्यासाठी जो खर्च होणार आहे त्यांना बॅंकेचे 60 टक्के व्याजाचे कर्ज केंद्र सरकार भरणार आहे. त्यासाठी योजना दिलेली आहे. पेट्रोलियम मंत्रालय आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि आईल कंपन्या यांना प्रेस मडपासून बायो सीएनजी व सीएनजी तयार करण्यासाठी साखर कारखान्याला जास्तीत जास्त 50 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी योजना केलेली आहे.

या कर्जासाठी सिक्‍युरिटीची गरज नाही. चालू वर्षी महाराष्ट्र शासनाने 32 साखर कारखान्यांना 511 कोटींची थकहमी दिली. त्यामुळे 32 कारखाने चालू झाले आहेत. साखर कारखान्यांनी काटकसरीचे मॅनेजमेंट करावे. उत्पादन खर्च कमीत कमी करणे, ज्यादा कामगार व इतर खर्च करू नये, एक पोते साखर म्हणजे 100 किलो; चांगले मॅनेजमेंट व उत्कृष्ट चालणाऱ्या कारखान्यात 1000 रुपये पोत्याला खर्च येतो, परंतु महाराष्ट्रात 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साखर कारखान्यांचा 100 किलो साखर उत्पादनाचा खर्च 1700 ते 2000 रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे या साखर कारखान्यांचे नक्त मूल्य निगेटिव्ह होत आहे व बॅलन्स शीटमध्ये तोटा वाढतच आहे.

सोमेश्वर सहकारी, माळेगाव सहकारी, पांडुरंग, सोनहिरा व कोल्हापूर विभागातील बरेच साखर कारखाने चांगले चालले आहेत. काही खासगी साखर कारखाने यामध्ये नॅचरल शुगर (उस्मानाबाद), जकराया (मंगळवेढा), अंबालिका (शुगर), दौंड शुगर, बारामती ऍग्रो, दत्त इंडिया साखरवाडी व श्रीरामचा भाडे तत्त्वावरचा कारखाना हे कारखाने सुद्धा प्रोफेशनल मॅनेजमेंटनुसार चालवतात. हे कारखाने या वर्षीसुद्धा 2600 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दर शेतकऱ्यांना देत आहेत. त्यांचे बॅलन्स शीट नफ्यात आहे. गुजरात राज्यात फक्त साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांना डिस्टिलरी आणि को-जनसुद्धा नाही तरी गुजरातमध्ये तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला जात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील साखर सम्राटांनी याचा विचार करावा.

आपला उत्पादन खर्च 1000 ते 1200 रुपयांवर कसा येईल याची दक्षता घ्यावी आणि हा बदल घडल्याशिवाय सहकारी साखर कारखाना, खासगी साखर कारखाना, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, राजारामबापू, सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील, औदुंबरअण्णा पाटील अशा अनेक धुरिणांनी शेतकरी समृद्ध करण्यासाठी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकाराचे मंदिर उभे केले आहे. ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रात जवळपास 200 सहकारी साखर कारखाने सुरू आहेत, त्यांच्या विचार व दूरदृष्टीचा बोध घ्यावा तरच शेतकरी व साखर कारखानदारी टिकणार आहे, असे परखडपणे मत श्री. सालगुडे- पाटील यांनी मांडले.