महात्मा फुले हायस्कूलचे पी. डी. पाटील यांना मिळाला उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार

26

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.10जानेवारी):- येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांना पत्रकार भवन पुणे येथे युवक मित्र परिवार आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलन, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवकमित्र परिवार, नंदूरबार या चळवळीमार्फत पुणे शहरात ‘राज्यस्तरीय युवा संमेलन’ यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवक व युवतीचा यावेळी ‘स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथील पी. डी. पाटील यांना देखील ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर हे होते. तर उदघाटक म्हणून महाएनजिओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून विश्व जनकल्याण समितीच्या अध्यक्षा छायाताई भगत, ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण बागुल, सामाजिक कार्यकर्त्या उज्वलाताई गायकवाड, राज्य युवा परिषदेचे समन्वयक प्रवीण प्रधान, युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, उदयकाळ फौंडेशनचे अध्यक्ष मयूर बागुल होते.
विचार मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते,लेखक युसूफ पठाण यांनी पत्रकार भवन येथे आयोजित ‘युवकमित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले.या समारंभाला महाराष्ट्रातील पत्रकार बांधव, उपक्रमशील शिक्षक, यांच्यासह राज्यातील युवक युवतींचे पालक – आई – वडील उपस्थित होते.या संमेलनाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अमर हजारे यांनी केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक मित्र परिवार महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण महाजन व संपुर्ण टीम ने परीश्रम घेतले.