शोषीतातील निखारा प्रज्वलीत करणारी कविता : ‘ भूभरी ‘

92

विदर्भ हा महाराष्ट्रातील एक विभाग . पश्चिम विदर्भात अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमिळून तयार झालेल्या प्रांताला व-हाड मानल्या जात असून येथे व-हाडी बोली बोलल्या जाते . तर पुर्व विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, , भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमिळून तयार झालेल्या भागास झाडीपट्टी संबोधत असून तेथे झाडीबोली बोलल्या जाते . या भागातील बोलीचं संवर्धन व्हावं म्हणून डाँ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोली साहित्य मंडळ स्थापन करून अनेक नव्या-जुन्या कवी, कथाकार, लेखक या ” मंडळींना नवा विचारमंच निर्माण करून दिला . जेष्ठ कवी ना.गो.थुटे, हिरामन लांजे ,लखनसिंह कटरे, बंडोपंत बोढेकर , झाडीकन्या अंजनाबाई खुणे , डाॕ. धनराज खानोरकर आणि नवोदितांमध्ये दिलीप पाटील, प्रशांत भंडारे, संतोषकुमार ऊईके, राजेंद्र घोटकर, डाँ. चंद्रकांत लेनगुरे, कवयित्री कसुमताई आलाम, मालती सेलमे, सुनील बावणे, रामकृष्ण चनकापुरे इत्यादी कविसोबतच आणखी एका कवीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल . ते म्हणजे चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे वास्तव्यास असलेले झाडीबोली साहित्य मंडळाचे चंद्रपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शिक्षक व परिवर्तनशील विचाराचे कवी अरुण झगडकर . अरुण झगडकरांचा जन्म वैनगंगेच्या तिरावर असलेल्या पंधरा वीस घरांच्या एका लहानशा खेड्यात झाला आहे.

संवेदननशील मनाचे कवी अरुण यांनी आंग्लंभाषेसह तब्बल पाच विषयात पद्युत्तर शिक्षण , शिक्षणशास्त्रातील पदवीका आणि पदवी प्राप्त केली असून ते सद्या प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निसर्गरम्य परीसरात वाढलेले कवी अरुण यांना महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कविता लिहिण्याचा छंद जडला . आणि अलिकडेच त्यांचा ” भूभरी ” नावाचा पहीला कवितासंग्रह प्रकाशीत झाला . समीक्षा पब्लीकेशन, पंढरपूर यांनी प्रकाशीत केलेल्या पुस्तकाला प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे . पाठराखण डाँ.ज्योती कदम यांनी केली असून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे दोन शब्द आहेत . उत्कृष्ठ व बोलके मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी साकारले आहे . या संग्रहात विविध प्रकारातील एकूण ८६ काव्यरचना आहेत . ज्या झाडीपट्टीच्या कुशीत हा संवेदनशील व हळव्या मनाचा कवी जन्मला त्या ” झाडीचा महिमा ” आपल्या कवितेतून सांगताना कवी म्हणतो ..

” माझ्या झाडी मुलकात,रंग दंडकारन्याचे
लिळा, ग्रामगीतेमंदी, सब्द उमटे झाडीचे !

वैनगंगेच्या खो-यात, वानावानाचे पिकते
लाल, का-या जिमिनीत, धान लय-या मारते!( पृ. १६ )

झाडीपट्टी हा तसा आदिवासी जनसमुदायाचा अधिवास असलेला विभाग आहे . तेथे पुर्वी गोंडराजे होऊन गेले. आजही तेथे जुन्या किल्ल्यांच्या खाणाखुणा आढळतात . निसर्गरम्य परीसर म्हणूनही पर्यटकांना भुरळ पाडणारा प्राणी,पक्षी, झाडीने समृद्ध विभाग आहे . ऐतेहासीक वारसा लाभलेला हा परीसर धान, बिडी, रानमेवा, बांबू, झाडी रंगभूमी , बाबा आमटे परीवार आणि डाँ. अभय बंग व राणी बंग या दाम्पत्यांच्या कार्याने सर्वदूर परीचित आहे . अशा या नावलौकिकप्राप्त समृद्ध मातीतील हिरा कवी झगडकर आपल्या शब्दसामर्थ्यवान लेखणीने येथील मातीची सेवा करण्याची इच्छा बाळगून आहे .

” संगीतातील राग व्हावी लेखणी माझी
विद्रोहाची आग व्हावी लेखणी माझी

युद्धातील ढाल व्हावी लेखणी माझी
क्रांतीची मशाल व्हावी लेखणी माझी !” (पृ.१९)

आपल्या लेखणीने सदैव आपल्या लोकांच्या सेवेसाठी झटावे, त्यांचे दुःख मांडावे, व्यथा मांडावी, त्यांचा हूंकार व्हावी, प्रसंगी मशाल व्हावी, अटीतटीच्या प्रसंगी माझ्या लेखणीने शब्दरुपी वार झेलणारी ढालही व्हावे अशी अपेक्षा कवी करतांना दिसतात . दिल्ली- मुंबईपासून कोसो दूर असलेल्या व विकास साधनांचा अभाव असलेल्या परीसरात वस्ती करून राहणा-या वंचीत, शोषीत ,पिडीत , अशिक्षित , अज्ञानी लोकांना भौतीक सुखाने समृद्ध जिवन जगणे म्हणजे काय असतं ? ही बाब त्यांच्या मनाला कधीच शिवली नव्हती . परंतु या मातीतील माणसं मनाने समृद्ध आहेत , माणुसकी , जिव्हाळा, प्रेम , आपुलकी , त्याग , साधेपणा हाच त्यांच्या जगण्यातील स्थाईभाव आहे . नागरी जीवन म्हणजे काय असते ? हळूहळू ते आता कुठे या जिवनशैलीशी अवगत होत आहेत .असे कवी आपल्या कवितेत म्हणतात.

” जीवन कसे जगावे आताच कळत आहे
समजून जीवनाला माणूस वळत आहे ” (पृ. २२)
झगमगाटाच्या दुनीयेचा आता कुठे वस्ती वाड्यातील लोकांना हळूहळू परीचय होऊ लागला आहे . तो आता मुख्य प्रवाहात येवू लागला आहे . मितभाषी, मृदुभाषी , लाजरी बुजरी माणसं हळूहळू शिकू लागली आहेत . शहराशी जुडू लागली आहे . सभा, समारंभ, साहित्य, संस्कृती , शिक्षण ,आर्थीक व्यवहार या गोष्टीशी परिचित होऊ लागली आहेत . धन संपत्तीचा मोह नसलेली ही साधीभोळी माणसं आता आपल्या हक्कासाठी लढू लागली आहेत . दगाबाजी करणा-याशी भिडू लागली आहेत .एकिकडे समाज परिवर्तनशील विचारांची कास धरीत असताना दुसरीकडे मात्र काही लोक आजही जुन्या रूढी परंपरांना डोक्यावर घेऊन नाचताना कविला दिसतात . कवी पुस्तकात रममान होऊन माणूस शोधायला निघाला असता पुस्तकातील अक्षरेही माणसासारखीच आकार-विकार, शब्द बदलताना दिसतात. तेव्हा तो पुस्तके सोडून थेट माणसेच वाचायला लागतो . पण तेथेही त्याचा भ्रमनिराश होताना दिसतो . कवी जेव्हा आपल्या भोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेतो तेव्हा त्याला समाजातील माणसांचं वागणं हे पुस्तकातील कथा, कादंबरी, नाटकातील पात्रांप्रमाणे भूमीका बदलणारंच दिसतं .

” आता मी पुस्तकेच वाचणे बंद केले आहे
माणसेच वाचत बसतो अधूनमधून
डोळे उघडून, कधी डोळे मिटून
पण तीही मला पुस्तकांसारखीच वाटतात
कथा, कहाण्या, नाटकांतील पात्रांसारखी !”(पृ. २३ )

कविला आलटून पालटून काही पुस्तके आणि माणसं सारखीच वाटतात . बरीच माणसे बहुरूपी वाटतात . जेथे बघाव तेथे काही माणसं माणुसकीची वस्त्र त्यागून वागताना दिसतात . तेव्हा कवि उद्विग्न होऊन मला “काही बोलायचे आहे ” असं सुचवितो .

” माझ्या मनाच्या उद्रेकाचा, टाहो मला फोडायचा आहे
शब्दांच्या अर्थानेच मला काही बोलायचे आहे

घेतात रोज वचने सारेच आम्ही बांधव
घडतात रोज येथे मरणाचेच तांडव
पुस्तकातील प्रतिज्ञेचा,अर्थ अजून कळायचा आहे
घटनेच्या प्रस्तावनेवर मला काही बोलायचे आहे ! ” ( पृ. ३७ )

कविची कविता समाजीक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकते आहे . तिला येथील माणसांना संवैधानीक मूल्यांनुसार एका विचाराने जोडायचे आहे, येथील जुनाट विचारांची व्यवस्था बदलायची आहे, वंशभेद मिटवून मुला-मुलीत समानता आणायची आहे, मुलींना जपून स्त्रीच्या मातृत्वाला न्याय मिळवून द्यायचा आहे. विविध जाती,धर्म, पंथांतील कर्मकांडाच्या चिखलात रुतलेल्या भावी पिढीला बाहेर काढून मानवतेचा धर्म शिकवायचा आहे . लोकशिक्षणातून लोकांना विज्ञानवाद पटवून देऊन अंधश्रद्धामुक्त करायचे आहे. राज्यघटनेची प्रास्ताविका आम्ही सर्व म्हणतो पण तसे वर्तन मात्र आम्ही करीत नसल्याची खंत कवि व्यक्त करताना दिसतात . या बाबासाहेबांच्या वैचारीक अधिष्ठानाचा धागा पुढे नेत कवि सर्व बहुजनांना उद्देशून एक कळकळीची विनंती करताना ” या देशाचे राजे व्हा ” या कवितेत म्हणतो ….

” संविधानकर्त्यांनी आम्हा नवी ओळख दिली
वर्णव्यवस्थाच सारी नष्ट केली
पुसून टाकला खालचा वर्ण नवा जन्म दिला
तेव्हापासून ओबीसी म्हणून अभिमान वाटू लागला !
जाणून स्वःच्या अस्मितेला ओबीसींनो जागे व्हा !
बलाढ्य समुदायाचा नेता म्हणून या देशाचे राजे व्हा ! ” (पृ. ५६ )
भारतीय संविधानानुसार सर्व जाती-धर्माचे लोक कायद्यापुढे समान आहेत. प्रत्येकाला कायद्यानुसार समान अधिकार व हक्क बहाल केलेले आहे . असे असतानाही बहुसंख्य असलेले बहुजन लोक या देशाचे चालक,मालक का होत नाहीत ? असा प्रश्न करून आता सर्वांनी एक होऊन या देशातील सत्तास्थाने काबीज केली पाहिजे . असे कविला वाटने स्वाभाविक आहे .
अनादी काळापासून स्त्रीला चुल आणि मुल यात गुरफटून ठेवून तिचेवर सातत्याने अन्यायच झाला आहे . तत्कालीन व्यवस्थेने तिला विविधप्रकारच्या आभूषणाने नटवून सौंदर्यमूर्ती म्हणून चार भिंतीच्या आतच तिचं जग होतं . पण महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी तिच्यातील कौशल्य, बुद्धी , हेरून शिक्षणाची दारे खुली करून दिली आणि त्याचाच परीपाक आज तिने प्रत्येक क्षेत्रात तिच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला दिसतो . म्हणूनच स्त्री ही कविला भूभरीसारखी भासते . याविषयी त्यांची ” भूभरी ” नावाची कविता बोलकी आहे .

” कितीही मिटवा, ओता पाणी
विझणार नाही वाती ,
लखलखणा-या निव्यावरती टाका ओली माती !
मारा फुंकर,चेतवा पुन्हा
उडतील तेज अंगारे राखेच्या आत दबलेले
साध्या फुंकरानेच उमटतील आगडोंबाचे ठसे
कोसळू द्या अंगावर कितीही
वादळी वा-याच्या सरी
राखेच्या ढिगा-यातून प्रज्वेल पुन्हा
अस्तित्वशून्य निखा-यातील भूभरी ! ” (पृ.४४)

भूभरी म्हणजे मातीआड दडवून ठेवलेले विस्तवाचे निखारे . झाडीपट्टीतील शेतामध्ये शेतकरी ज्याप्रमाणे विस्तवाचे काही निखारे उद्याही प्रज्वलीत करता यावे यासाठी जमीनीत मातीखाली सुरक्षीत दाबून ठेवतो व दुस-या दिवशी तेच निखारे पुन्हा मातीवेगळे करून थोडीशी फुंकर मारून त्यातून अग्नी प्रज्वलीत करतो . त्याचप्रमाणे परिवर्तनशील विचारसरणीच्या विचारवंतांनी अनादी काळापासून दाबून ठेवलेल्या स्त्रीमधील कौशल्यरुपी निखा-यांना शिक्षणाची थोडीशी फुंकर मारून पुनर्जिवीत केले आहे . आणि आज तिने शिक्षणाच्या भरवश्यावर प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून गगनचुंबी प्रगती साधल्याची उदाहरणे आपणास बघावयास मिळते आहे . आपल्या कर्तव्याची चुनूक दाखवित जगाच्या विकासात हातभार लावू शकते. हेच या कवितेतून कविला सांगायचे असावे .
प्रत्येक माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजेच माणुसकी होय. परंतु प्रत्येक माणूस जन्मा आल्यानंतर नकळत स्वार्थाच्या चक्रव्यूहात घेरला जावून माझं-माझं , मी-मी या स्वच्या वृत्तीमुळे तो परोपकार ,त्याग, सहकार्य ,उदारता ,माणुसकी वगैरे विसरूनच गेला . हळूहळू तो विचाराने सोकत चाललेला आहे . पण त्याला जगण्याची व ख-या सुखाची परीभाषा कळली पाहिजे म्हणून कवी ” प्राणज्योत ” कवितेत म्हणतो …

” मावळेल जेव्हा प्राणज्योत काळ गेलेला असेल
निरुपयोगी शरीरही पंचतत्वात मिटेल
सत्कार्याच्या स्मृतीवरती फुले तुला वाहील
जाणून घे मानवा जीवन सार्थक होईल !” (पृष्ठ ६४)

कविची प्रत्येक कविता ही प्रश्नकर्ती आहे , मार्गदर्शक आहे .त्याचबरोबर परिस्थितीनुसार पर्यायी उत्तरे शोधणारीही आहे .ऐतिहासीक, सामाजीक, सांस्कृतीक, साहित्यिक , शैक्षणिक, राजकीय मूल्ये मांडणारी आहे . मानवीजीवनमूल्यांचा सहसंबंध नैसर्गीक बाबींशी जोडणारी आहे. माणूस म्हणून जन्मा आल्यानंतर आपण कसे वर्तन केले पाहिजे ? कशाला सुख मानलं पाहिजे ? कोणत्या बाबींना किती महत्व दिले पाहिजे? याचाही उकल कविता वाचकांसमोर मांडते . शेवटी प्रत्येकाची जगण्याची परीभाषा वेगवेगळी असू शकते . पण माणूस या जगात येतांना वस्त्रविहीन येतो व जातोही . त्याला येथील कपडाही सोबत नेता येत नाही . मग तरीही मानव संपत्तीचा हव्यास का बाळगतो ? राग-लोभ, मोह, माया, द्वेश, मत्सर, ही वासनाच मानवाला दुःखाच्या मार्गावर घेऊन जाते . दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर प्रज्ञा, शील , करुणा, क्षमा, शांती, सत्य, त्याग, मैत्री, ही जीवनमूल्ये अंगीकारून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय मार्गावर मार्गक्रमन केले तर या भूतलावावर किमान तो नावारुपाने तरी उरेल . अशी कविची भूमीका आहे.

कवि झगडकर आपल्या कवितेतून एकिकडे समाजातील अनिष्ठ चालीरीती, रूढी परंपरा व जातीव्यवस्थेवर धारदार शब्दांनी प्रहार करतात तर दुसरीकडे आद्यस्त्रीशिक्षीका सावित्रीमाई फुले , क्रांतिकारक लहुजी साळवे, डाँ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा , राजा रावण , कवयित्री बहिणाबाई चौधरी , इत्यादी समाजसुधारकांच्या जीवनकार्याचा गौरवही करतात. तद्वतच देश ,राज्य, गाव, लोकशाही , माती, माणसे, बोली, हलगी ,आणि ऐतिहासीक बाबींची महतीही मांडायला विसरत नाही . तसेच आपणास विनामूल्य मिळालेल्या पाणी, झाडे, गवत, पानं-फुले, कापूस, शेती-माती, प्राणी, पक्षी, महापूर, पाऊस, थंडी, ऋतू या निसर्गसमृद्धीला आणि पोशींदा, संत , सनवार, महिने, उत्सव, संस्कृती , विविध प्रकारची नाती , या प्रतिकांना व प्रतिमांनाही आपल्या शब्द सामर्थ्याने कवितेत न्यायोचित स्थान देतो . थोडक्यात अरुण झगडकरांची कविता म्हणजे अनादी काळापासून शोषीकतेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या समाजातील विविध घटकांना बाहेर काढण्यासाठी धडपडणारी कविता आहे . तसेच वंचिताच्या मनात अज्ञानाच्या राखेआड शाबूत असलेला निखारा हेरून त्यावर परिवर्तनशील वैचारीकतेची हलकिशी फुंकर मारून त्यातील अग्नी प्रज्वलीत करण्यात भूभरीच्या माध्यमातून कविला मिळो , हीच सदिच्छा.

✒️लेखक:-अरुण ह. विघ्ने
भ्रमणध्वनी ९८५०३२०३१६