कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय चरित्रातून सर्वगुणसंपन्न भारतीय घडतीलच अशी खात्री आहे !

41

19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले तर आईचे नाव जिजाऊ होते.पहिल्या संभाजी नंतर झालेले चारही अपत्य वारली होती,त्यानंतरचे हे सहावे अपत्य होय.त्याकाळात राजेशाही व्यवस्था होती. निजामशाही,आदिलशाही, कुतुबशाही यांचे राज्य होते.यांच्यासाठी लढणारे अनेक मराठे सरदार घराणे होते. यात भोसले, जाधव, मोरे,गायकवाड,घोरपडे असे घराणे होते.जे शूरवीर होते.या राजेशाहीत अनेकदा आपसांत युद्ध होत असे.यात अनेक सरदार यांना युद्धात कामी यावे लागत असे. किरकोळ कारणावरून माहेर ,सासरची आणि इतर नातेवाईक मंडळी मारली जात.यावर उपाय म्हणून स्वराज्य असावं असा विचार करून त्यादृष्टीचा विचार सत्यात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. इथे आजपर्यंत राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत असे,त्यालाच राजा होता येत असे.इथे मात्र रयतेच्या राज्यासाठी एका सरदारपुत्राला ‘राजा’ बनविण्याचा प्रयत्न होता.

1)बालपण:- मातीचे किल्ले बनवणे, लपंडाव,चेंडू भवरा उडविणे,घोडे हत्ती स्वार होणे असे खेल सवंगडीसह खेळत. कुस्ती , दांडपट्टा,तलवार चालविणे याचे शिक्षण घेत होते.बाल शिवबाने मराठी, हिंदी, उर्दू, फार्सी,संस्कृत,तेलगू या सहा भाषा शिकून घेतल्या.यातून आपण बोध घेऊ असा विश्वास वाटतो.
इ स 1642 ला शहाजी भोसले यांनी शिवबा, जिजाऊ आणि निवडक सरदार यांना पुणे जहागिरदारीची जबाबदारी सांभाळण्यासाठी बंगळुरूहुन पाठविले. शहाजी हे शूरवीर सरदार होते,त्यांना आदिलशाहीने ‘सरलष्कर’ हा किताब दिला होता.पुणे त्याकाळात आदिलशाही सरदार मुरारजगदेव याने शापितभूमी जाहीर करून पहार रोवून त्यावर फाटकी चप्पल,झाडू लटकविला होता. त्याच ठिकाणी माँसाहेब जिजाऊ आणि शिवबानी वस्ती करून लालमहाल बांधला. शापितभूमीला नंदनवन बनविले.शेतकऱ्यांना विश्वास देवून त्यांच्या सोयीसाठी, शेतीसाठी पुनवडी,आंबवडी हे धरणे बांधली,बियाणे सह इतर मदत केली. खेड,शिवापूर, पाषाण, जिजापूर या बाजारपेठ निर्माण केल्या.शिवबा मावळ खोऱ्यात सवंगड्यासह फिरत, त्यांच्या घरच्या सोबतच कांदा भाकरी खात.यातून शिवबांच्याबद्दल मावळात आपुलकी, विश्वास,जिव्हाळा, प्रेम रयतेच्या मनात निर्माण झाले.अशातच शिवबानं 1645 ला रायरेश्वराच्या देवालयात निवडक मावळ्यांसह स्वराज्य स्थापन करण्याची निर्धारपूर्वक शपथ घेतली.ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले.

2)मुरुंबदेवाचा डोंगर :-स्वराज्य निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले यात तोरणा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याला लागूनच मुरुंबदेवाचा डोंगर होता, त्याठिकाणी खोदकाम चालू केले होते. त्यावेळी तेथे खोदकाम करतांना सुवर्ण मुद्रांनी भरलेल्या घागरी सापडल्या आणि सोबतच काही सोन्याच्या देवी देवतांच्या मुर्त्या सापडल्या. त्यासर्व घागरी आणि मुर्त्या मजुरांनी प्रामाणिकपणे शिवबाकडे सुपूर्द केल्या. सुवर्ण मुद्रांचा तर वापर स्वराज्यासाठी करायचे ठरले पण देवी देवतांच्या मुर्त्याचे काय करावे?त्यावेळी रयतेची सेवा,त्यांनी सुखी करणे आणि रयतेचे राज्य उभे करणे अतिगरजेचे त्यामुळे त्या मुर्त्या वितळून त्यांचा विनियोग स्वराज्याच्या खजिन्यात करण्यात आला. तसेच सुरतेच्या छाप्यातील मौल्यवान वस्तू तसेच बोटभर कापड सुद्धा महाराजांनी स्वतः साठी घेतले नाही,ते राज्याच्या खजिन्यात जमा केले. ही बाब आज आम्हांला जिजाऊ शिवरायचरित्र, इतिहास यातून शिकण्यासारखी आहे.आज अनेक धार्मिक स्थळी करोडो रुपयाची संपत्ती पडून आहे, दरवाजे उघडले जाऊ शकत नाही आणि दुसरीकडे जिवंत माणसे,शेतकरी सोयी सुविधा पासून वंचित आहेत, कर्ज,उपासमार याने मृत्यू पावत आहेत.शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीने सांगितलेली सिंधूबंदी झुगारली. आरमारतळ उभारले.जलप्रवास करून जलदुर्ग बांधले.महाराजाकडे 300 जहाजे होती. पेण येथे जहाज बांधणी कारखाना, कुडाळ येथे मिठागर उभारले.तसेच बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर हे पुन्हा स्वधर्मात येण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी धाडस करून त्यांच्याशी सोयरीक करून त्यांना पुन्हा स्वधर्मात घेतले. त्यांना नातेवाईक बनविले.

3)निष्ठावंत मावळे :- स्वातंत्र्य,समता, बंधुता,न्याय यांवर आधारित रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी अठरापगड बहुजन समाजातील मावळे यांनी सर्वस्व अर्पण केले.शिवबानं सुद्धा कर्तृत्व पाहून शौर्य, योग्यतेनुसार जबाबदारी दिली.यात रायगडाचा पहिला किल्लेदार रायनाथ महार होता.याचबरोबर 12शूरवीर महार सैनिकांना सरदारकी दिली. रामोशी जातीतील बहिर्जी नाईक यांस गुप्तहेर खातेप्रमुख केले.तर कोळी जातीतील मायनाक भंडारी यांस आरमाराचे प्रमुख केले. मेहतर जातीतील मदारी यास आपला विश्वासू सेवक बनवले. लोहार जातीतील संभाजी कावजी कोंढाळकर,न्हावी जातीतील जिवाजी महाले,शिवा काशीद हे अंगरक्षकात होते.तर सरसेनापती नूरखान, तोफखानाप्रमुख इब्राहिम खान,वकील काझी हैदर याचं बरोबर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक,सूर्याजी पिसाळ, मुरारबाजी,फिरंगोजी नरसाळा,असे अनेक शूरवीर सरदार होते. यातून कोणतीही जात,धर्म असो, फक्त आणि फक्त विश्वसनियता,शूरवीरता यांवर जबाबदारी दिली जात असे.

याची आम्हाला जाणीव होते. ही बाब वर्तमानकालीन राजकारणात, प्रशासनात मार्गदर्शक आहेच. आग्राकैदेतून पसार होत असताना हिरोजी फर्जंद यांने शिवरायांचे सोंग घेतले आणि मदारी मेहतर यांनी सेवक म्हणून शिवरायांचे सोंग घेतलेल्या हिरोजीचे पाय चेपत बसला.जीव धोक्यात घालून हे केले.बातमी उघड झाल्यावर मृत्यूदंड माहीत होता.पन निष्ठा कायम ठेवून मृत्यू स्वीकारला. पन्हाळा येथून वेढ्यातून निसटून जातांना शिवा काशीद ने शिवरायांचे कपडे,टोप घालून विशाळगडच्या दुसऱ्या बाजूला पसार झाले. पाठलागावर आलेल्या सैनिकांनी पकडून मृत्यूदंड दिला.हसत हसत ‘रयतेच्या राजासाठी’ स्वीकार केला. तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आल्यावर, जिजाऊ -शिवबा चर्चा ऐकून ‘आधी लग्न कोंढान्याचे नंतर रायबाचे’ स्वतः जबाबदारी घेऊन लढताना किल्ला जिंकतात पन कामी येतात. आज घरचा, पाहुण्यांचा साधा एखादा छोटा कार्यक्रम असला तरी आम्ही बहानेबाजी करून नेमून दिलेले काम पुढे ढकलतो, टाळतो.विचार करून वर्तणूक करावी लागेलच.पुढे माँसाहेब स्वतः उमरठे गावी रायबाच्या लग्नाला हजर राहतात. कण्हेरगड युद्धात रामजी पांगेरा या शहीद सैनिकाचे वडिल नियमानुसार देय आर्थिक मदत स्वीकारत नाही.त्याऐवजी दुसरा मुलगा स्वराज्यासाठी सैनिक म्हणून घेऊन जा अशी अट घालतात.सर्वच सरदार, सैनिकांनी निष्ठेने राज्य वाढविले.मावळे म्हणून किंवा विचारांचे वारसदार म्हणून आम्ही शिवाजी महाराजांच्या नावाचा कर्तृत्ववाचा अंश आमच्यात आहे का नाही याचा विचार करून वागणे ठेवूया!

४)शेतकरीहिताचे धोरण:- राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले शिवरायांना कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक ही उपाधी देतात. शिवरायांनी राज्यातील पूर्वीचे 49 प्रकारचे विविध कर रद्द करून एकच कर ठेवला होता,तो पिकाच्या उत्पन्न आधारित कर.त्यासंदर्भात आपणांस 23ऑक्टोबर 1662 चे सर्जेराव जेधे ना पाठविलेले पत्र,19 मे 1673 चे पत्र यांतील नोंदी,सूचना दिल्या. त्यात १.राज्यात दारू,अंमली पदार्थ,नर्तकी यावर बंदी होती.काटेकोरपणे पालन करावे लागे.आज सरकारने बंदी घालून अंमली पदार्थ -गुटखा विक्री, खरेदी मोठ्या प्रमाणात चालू आहे.दारूच्या नशेत तरुण पिढी यातून बरबाद होत आहे.कॅन्सर, अटॅक,लिव्हर दोष सारखे आजार होत आहेत.२.सैनिकाना सक्त आदेश होते की, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला ही हात लावू नका,रोख देवून जिन्नस घेणे,उभ्या पिकांतून घोडे घालू नये. रात्रीच्या वेळी तेेलवाती विझून झोपा. आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला हमीभाव नाही, ठरविला तरी त्यानुसार खरेदी होत नाही,अडवणूक होते. उत्पादनखर्च ही निघत नाही.अनेकवेळा कुचेष्टा,आज शासक शिव्या देवून अपमानित केले जाते.कर्ज फिटत नसल्याने, पर्याय नसल्याने शेतकरी आत्महत्या होत आहे.३) सर्व शेतजमिनी मोजणी करून दिल्या.शेतकऱ्यांना बियाणे, बैलजोडी, पाण्याची सोय,म्हणून धरणे,तलाव बांधले. पाणी आडवा-पाणीसाठा वाढवा.रायगडावर असणारी शिवकालीन पाणी योजना त्याचा एक नमुना आहे.आज गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती,भांडण, सरकारी योजनांचे अंमल करण्यात आणि रयतेचे हाल बघून मन दुःखी होते.४) शिवरायांनी गरजेनुसार कर्जवाटप केले. तवानगी आली की वसुली करावी,तगादा करू नये.संत तुकाराम महाराज यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी करून खातेवाह्या इंद्रायणीत बुडविल्या होत्या. हा आदर्श ठेवून दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कर्जमुक्त केले.

५) महावृक्ष ,फळझाडे तोडू नयेत असा दंडक आणि झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले. ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अंमलबजावणी शिवाजी महाराज करत. आज आम्ही फक्त भजनात,कीर्तनात अभंग कानाने ऐकतो आणि सोडून देतो.त्यामुळे आमची ही अवस्था आहे,त्यासाठी ते अभंग आम्ही समजून तसे वागलो,जगलो पाहिजे.

५) व्यवस्थापन आणि प्रभावीअंमल:-

शिवरायांनी अन्यायकारक असणारी वतनदारी पध्दत बंद केली.तसेच पगारी सैनिक नेमले.त्यांचे वेतन हे योग्य आणि वेळेवर देण्याची चोख व्यवस्था केली.शहीद सैनिक वारस यांना आर्थिक मदत,तसेच यांना निवृत्तीवेतन देत. सैनिकांवर नजर ठेवण्यासाठी महाराज स्वतः अचानक छावण्याना भेटी देत.किल्ला जिंकला की त्याची चोख बंदोबस्त करून व्यवस्था करत.जवळपास 300 किल्ले होते.पन कोणत्याच किल्ला घेतला म्हणून अभिषेक,मुहूर्त, सत्यनारायण,वास्तूशांती
केली नाही.अनेक मोहिमा या अमावास्या रात्रीच केल्या. मुहूर्त न पाहता गनिमीकावा, युद्धनीतीने कार्यवाही केली. आम्ही तर वारस म्हणून घेणारे किल्यावर जात नाहीत. गेल्यावर नीट राहत नाही,तिथे स्वतः चे नाव टाकायचा प्रयत्न करतो. आज आम्ही चारधाम,इतर देवाला जातो हरकत नाही पन तसेच दरवर्षी किमान 5 किल्ले तरी सहकुटुंब उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांना एक ऊर्जा,प्रेरणा निश्चित मिळेल.त्या गडाच्या मातीचा गंध, सहवास आमच्यात संचारून त्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न होईल. प्रतापगडाच्या पराक्रमात नीती जी गनिमी कावा चा भाग होती. अफजलखान यांस केलेल्या पत्रव्यवहाराची भाषा,केलेली सैनिकी पूर्वतयारी,(मोडेन पण वाकणार नाही,अशी भूमिका न घेता वास्तव जाण) त्यासोबतच प्रत्यक्ष भेटीतील चपळाई यातून अफजलखान पराभूत केला.सोबतच सय्यद बंडा आणि कृष्णा कुलकर्णी यांनाही संपविले.

“होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी”ही म्हण रूढ झाली.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आदर्श समोर ठेवून, “लाख ब्रह्महत्या न असे पातक पाहता मुख एक विठोबाचे’!
कृष्णा कुलकर्णी याने केलेला घाव जो शिवरायांच्या डोक्यावर झालेला एकमेव घाव होता.कारण वकीली सोडून घाव करील असे वाटले नव्हते,असो. अफजलखानाच्या मृतदेहाच योग्य त्या इतमामात दफन केले. थडगे, त्यावर मुजावर आणि 2 मन तेल याची सोय केली.

(६)सहिष्णू धार्मिक धोरण:-
स्वराज्यात सर्व धर्माचा आदर केला जात असे. त्यामुळे कुराणची सापडलेली प्रत असो,किंवा रायगडावर असलेली मस्जिद असो.तसेच गडावर असणारे मंदिर असो. त्याबाबत समता होती. राज्यातील भिक्षुकी करणाऱ्या पुरोहित बामनांनी ‘शिवराय’ यांना शूद्र ठरवून राज्याभिषेक नाकारला,त्यावेळी शिवबानं काशीहून गागाभट याला पाचारण केले.भरपूर संपत्ती देवून राज्याभिषेक करवून घेतला. तसेच राजव्यवहार भाषकोश बनवला.तसेच इतिहास लेखनाची जबाबदारी परमानंद यांस सांगून ‘शिवभारत’ लिहून घेतले.संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवराय येत,सल्ला, मार्गदर्शन घेत.सैनिकांना मार्गदर्शनासाठी संत तुकाराम महाराज यांनी गाथेत पाईकांचे अभंग लिहिले. तसेच भेटीप्रसंगीचा अभंग,

“आम्ही तेणे सुखी।
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी।
कंठी मिरवा तुळशी।
व्रत करा एकादशी।।
तुमचे येर वित्त धन।
ते मज मृत्तिकेसमान।।
म्हणवा हरीचे दास।
तुका म्हणे मज हे आस।।

अशा कर्तृत्ववान महान रयतेच्या राजाचे 3 एप्रिल 1680 ला रायगडावर निर्वाण झाले.

अशा महान शिवबांचा इतिहास जो पेशवाईत बंदी घातला.ते शिवराय आम्हांला फक्त आणि फक्त महात्मा जोतीराव फुले यांच्यामूळे माहीत झाले.कारण रायगडावरील समाधी शोधून, तिची दुरुस्ती करून पुणे येथे 19 फेब्रुवारी 1870 ला 10 दिवसांचा शिवजयंती उत्सव सुरू केला.त्याची नोंद पुणे पोलीस स्टेशन मध्ये आहे,बरं! राष्ट्रपिता, शिवशाहीर महात्मा फुले यांनी शिवचरित्रपर 900 ओळीचा पहिला पोवाडा लिहिला.त्यांना भारतरत्न नाही,मात्र शिवराय जिजाऊ यांची बदनामी करणारे ब मो पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण, पद्मश्री.करोडोची मदत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना,बाळ ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात,”33 कोटी देवाची फौज शिवबांचे नाव घेतले की गारद होते.” तर क्युबा चा राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो हा माझी अमेरिका सोबत स्वातंत्र्य युद्धाची प्रेरणा ही शिवाजी महाराज आहेत,असे लिहितो.

जैन असणारे कर्मवीर भाऊराव पाटील एका उत्तरात म्हणतात,की एकवेळ बापाचे नाव बदलीन पण शाळेला दिलेले शिवछत्रपतीचे नाव बदलणार नाही.अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात “शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू’ हा विषय शिकवतात.विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,आपल्या अनेक पत्राच्या सुरुवातील जय शिवराय लिहीत असत.ज्या मनुस्मृतीच्यामुळे शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला होता, ती मनुस्मृति रायगडाच्या पायथ्याला दहन करून बदला घेतात.
आम्ही काय आणि कधी प्रेरणा घेणार आहोत.की सरळ ‘देव’ बनवून जबाबदारी आणि कर्तृत्व झिडकरणार आहोत! तसे तर तिथीचा आग्रह,आशीर्वाद पोझ मधील फोटो,किंवा त्यांची मंदिरे बांधणे यातून हे चालू दिसते आहे.ज्या मातीला स्पर्श झाला,पराक्रम केला ते किल्ले संवर्धन करणेचं गरजेचे आहे.शिवराय आणि त्यांचे सत्यइतिहास ,चरित्र गावागावात आणि घराघरात घेवून जावू ही आशा आणि विश्वास बाळगून थांबतो.

जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती!

✒️लेखक:-मा.रामेश्वर तिरमुखे,जालना.(व्याख्याते तथा प्रबोधनकार.)मो:-9420705653