धारखेड ग्रामपंचायत कार्यालयास बनवले गाढवांचा ‘कोंडवाडा

28

🔸 शिवसेना नेते वसंत चोरघडे यांची तक्रार

✒️अनिल साळवे(गंगाखेड,प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.6मार्च):- शहरानजीकच्या भांबरवाडी वाळू धक्का पुन्हा एकदा वादातीत ठरत आहे. भांबरवाडी- धारखेड गोदापात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या गाढवांना तहसील प्रशासनाने थेट धारखेडच्या ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याने व असा प्रकार मागील वर्षभरापासून वारंवार होत असल्याने धारखेड ग्रामस्थांत महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल चीड निर्माण होत आहे. धारखेडचे रहिवाशी, गंगाखेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक तथा शिवसेना नेते वसंत चोरघडे यांनी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना याप्रश्‍नी जाब विचारून ग्रामपंचायत कार्यालय हा कोंडवाडा वाटला का असे सुनावत तहसीलदार यांच्या कार्यपद्धती विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

दरम्यान गंगाखेड – धारखेड लगतच्या भांबरवाडी वाळू धक्क्यावरून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सर्रास वाळू चोरी होत असून मोठ्या वाळूचोरांना अभय देत तहसीलदार गाढवावरुन होत असलेल्या वाळू चोरी रोखण्यात कोणती ‘कामगिरी’ दाखवत आहेत असा खोचक सवाल धारखेडचे ग्रामस्थ विनोद खरात यांनी एसडीएम यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

       याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरालगतच्या भांबरवाडी वाळू धक्का कंत्राटदारांना सुलभ व्हावा यासाठी गंगाखेड – धारखेड गोदापात्रातील माती बंधारा फोडल्याचे उदाहरण ताजे असताना व याप्रकरणात अद्याप कुठलीही कारवाई झालेली नसताना तहसील प्रशासनाने भांबरवाडी वाळू धक्क्यातुन मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध वाळू चोरी रोखण्यात अपयश येत असतानाच गाढवावरून छोट्या प्रमाणात होत असलेली वाळूचोरी पकडून वरिष्ठ प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा धारखेडचे रहिवासी वसंत चोरघडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

      या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी दि.०३ मार्च रोजी मध्यरात्री तहसील प्रशासनाने वाळूचे तीन पकडलेले ट्रॅक्टर सोडून देत वाळू चोरी करणाऱ्या गाढवांना पकडून धारखेडच्या ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले आहे. वास्तविक ग्रामपंचायत ही ग्रामपातळीवरील न्याय संस्था आहे अशा संस्थेत गाढवांना कोंडून ग्रामपंचात कार्यालयास कोंडवाड्याचे स्वरूप आणल्याचे वसंत चोरघडे यांनी तक्रारीत नमूद करत तहसीलदारांच्या एकूण कार्यपद्धतीची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

         त्याचप्रमाणे धारखेडचे ग्रामस्थ विनोद खरात यांनीही गंगाखेड एसडीएम यांचेकडे तक्रार करत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयास कोंडवाड्याचे स्वरूप आणल्याची तक्रार करत मोठ्या वाळूचोरांना तहसिल प्रशासन अभय देत असल्याचे म्हटले आहे. धारखेड वासियांच्या या दोन्ही तक्रारीवरुन तहसील प्रशासन धारखेड ग्रामपंचायत कार्यालयाचा वापर गाढवांच्या कोंडवाड्यासाठी मागील वर्षभरापासून करीत असल्याने धारखेड ग्रामस्थांत महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात संतप्त नाराजीचा सूर असल्याचे स्पष्ट होत आहे.