आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा बिरसा क्रांती दल कडून सत्कार

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.15मार्च):-राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासींची घटनात्मक राखीव १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती मोहीम. व गेल्या १४ वर्षापासून रखडलेल्या चार विभागातील १७२ इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेच्या आँडीटचा प्रश्न आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार डाँ. संदीप धुर्वे यांनी लावून धरल्यामुळे बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला.

अनुसूचित जमातीच्या १२ हजार ५०० राखीव जागेवर बिगर आदिवासींनी, आदिवासी असल्याचे खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविली आहे.न्यायालयाच्या निर्णयानुसार ही पदे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त करुन जातवैधता प्रमाणपत्र धारकामधून विशेष भरती मोहीम राबवून भरणे अपेक्षित होते.यासाठी शासनाने २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णयही काढला आहे.परंतू वर्ष लोटून गेली तरी रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. केवळ वर्षभरात राज्यात ६१ पदेच भरण्यात आली असून या चालू वर्षात पदे भरण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विधानसभेत हमी दिली आहे.

याशिवाय राज्यात अत्यंत उद्दात हेतूने आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देण्यासाठी राज्यशासनाने सन २००६ पासून योजना सुरु केली.यात नाशिक विभागात ५१ शाळा,अमरावती विभागात ४५ शाळा, ठाणे विभागात ३१ शाळा, नागपूर विभागातील ४५ शाळा. असे एकूण १७२ शाळांमध्ये सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ५३ हजार २७५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सदर विद्यार्थ्यांच्या देय असलेल्या शिक्षण शुल्कापोटी नामांकित निवासी शाळांना आतापर्यंत एकूण रु.१०७१,९५,६६,५२२ एवढे अदा करण्यात आले.१७२ शाळांपैकी ८३ शाळांचे आँडीट झाले परंतू ८९ शाळांचे अद्यापही आँडीट करण्यात आलेलेच नाही.त्यामुळे ही रक्कम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी वापरली गेली किंवा नाही.याचा अजूनही शोध लागलेला नाही.

बिरसा क्रांती दलच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचेशी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर तब्बल अडीच तास सखोल चर्चा केली. या प्रसंगी बिरसा क्रांती दलाचे यावेळी महासचिव प्रमोद घोडाम, प्रफुल कोवे, अजय घोडाम ,संजय मडावी, गणेश फुपरे ,संतोष कनाके , सौरभ पारधी, शिवनारायण भोरकडे आदि उपस्थित होते.