आपण कोणत्या देशात राहतो..! नव्या क्रांतीचा उद्घोष करणारी कविता

30

कवी प्रब्रम्हानंद मडावी यांचा नुकताच प्रकाशित झालेला “आपण कोणत्या देशात राहतो..!” हा कवितासंग्रह वाचण्यात आला . अतिशय नाविण्यपुर्ण व आशय गंभीर स्वरूपाचा कवितासंग्रह आदिवासी जीवनशैलीचे भावचित्र रेखाटणारा आहे.आदिवासी कविता ही नव्या क्रांतित्वाचे ऊर्जायन घेऊन मराठी साहित्यात नवे सृजनत्व साकार करत आहे.आदिवासी कविता दलित (आंबेडकरवादी )कवितेला आपला आदर्श मानते .या देशातील वंचित,शोषित,पिडीत,आदिवासी,मागासवर्गीय ,स्त्रीया यांच्यात आत्मभानाची जाणीवऊर्जा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी दिली आहे.या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता नव्या मूल्यपरिवर्तनासाठी धडपडणारी कविता आहे.

मराठी कवितेत आदिवासी कविता नवे क्रियान्वयन करत स्वतःचा मार्ग प्रस्थ करीत आहे.गोविंद गोरे,नेताजी राजगडकर,भुजंग मेश्राम,मारोती कुळमेथे या सारखे वैचारिक लेखक व डॉ.विनायक तुमराम,बाबाराव मडावी,प्रभू राजगडकर,उषाकिरण आत्राम,ए .के.मडावी,डॉ.पुष्पा गावित ,प्रा.माधव सुरकुंडे,यासारखे लेखक व कवी आदिवासी समाजाला नवे विचारशिल्प देत आहेत.नवे दृष्टीसामर्थ देत आहेत.त्याच पंक्तीत प्रब्रम्हानंद मडावी आपली धारधार कविता घेऊन प्रस्थापित मुजोर समाजकारण,राजकारण,व धर्मकारण या विषमतामूलक कौर्यभरी व्यवस्थेवर शब्दअस्त्राचे सर्जिकल स्ट्राईक करत आहे.या कवितेतून नव्या आयुधाचा वापर करत परिवर्तनवादी समाजनिर्मितीचा ध्यास कविने घेतलेला दिसतो.वास्तववादी घटनाचा ही कविता जसा वेध घेते तसाच एेतिहासिक विचाराचा आढावा घेऊन आदिवासी समाजाचे शोषण कसे झाले यांचे मूल्यमंथन करते.

आदिवासी म्हणजे नांगर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहवासी म्हणजे आदिवासी होय.आदिवासीला अनेक नावाने ओळखले जाते.या शब्दाचे अर्थ दस्यू ,निषाद,अबोरिजियन,इंडिजिन्स ,मुलनिवासी,फिरस्ता,पर्यावरक,अशा नावाने कालखंडात आदिवासी समाज आेळखला जात होता.काही अभ्यासकाच्या मते आदिवासी हे मुक्त व स्वतंत्र समाजघटक आहेत .त्यांच्यावर कोणत्याही व्यवस्थेचे बंधन राहत नाही.तो दरी डोंगर कपारीत स्वतःच आयुष्य घालवतो व निसर्गला सर्वस्व मानतो.प्राचीन काळातील दाखल्यानुसार हा समाज लढवय्य व क्रांतिकारी आहे.तो कधीही गुलाम होत नाही. पण ब्राम्हणी कपटग्रंथानी या समाजाचे जीवन अंधकारमय केले होते.जंगलाच्या सानिध्यातच तुमचे जीवन आहे ही विचारसरणी त्यांच्या मनावर बिंबवल्या गेली .त्याचे मानवीय हक्क नाकारले गेले.अशा कठीण काळात जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांत नवे क्रांतीन्वय पेरले.इंग्रज व ब्राम्हणी सभ्यतेविरूध्द उलगुलान केले.त्यांची क्रांती आदिवासी , शेतकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार होता.

उलगुलान म्हणजे प्रस्थापितविरूध्द बंड,एल्गार,महासंग्राम किंवा उठाव होय.१८६९ मध्ये वनसंरक्षण कायदा लागू केला.त्यामुळे आदिवासी समाजाचे जल ,जंगल व जमीन हे अधिकार नाकारले गेले.जंगलावर होणारी उपजीविका बंद करण्यात आली.त्यासाठी १८९० ला बिरसा मुंडा यांनी उलगुलानची घोषणा केली.आदिवासी समाजात नवी चेतना दिली.
आजही संविधान लागून सत्तर वर्षे होऊनही आदिवासीचे अधिकार मिळत नाही . सातत्याने शोषण केले जाते.या होणाऱ्या अन्यायामुळे कवी प्रब्रम्हानंद मडावी यांना जबरदस्त चीड येत आहे.म्हणून ते आपल्या भावना शब्दांतून व्यक्त करताना उपरोधात्मक प्रश्न देशाला विचारतो,आपण कोणत्या देशात राहतो..!कवी हा विविध समाजघटकांच्या सानिध्यात वावरत असतो.त्या वावरण्यातून त्याला आपल्या समाजबांधवाच्या दैनावस्थेची कारणे लक्षात येतात.फुले- शाहू- आंबेडकर यांच्या ग्रंथ वाचनातून कवीला नवी दृष्टी मिळते.त्याच्या कवितेत डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचार गर्भजाणिवांचे प्रतिबिंबि पडलेले पदोपदी दिसून येते.ते आपल्या मनोगतात म्हणतात की,”सामाजिक व्यवस्थेविरोधातील विद्रोह आणि समतामूलक समाजाची निर्मिती दलित (आंबेडकरवादी) कवितेमधून प्रभावीपणे मांडल्या गेली.

फुले ,शाहू,आंबेडकर यांचा वैचारिक संघर्ष आणि वर्ण जातीव्यवस्थेविरोधात केलेले बंड समजावून घेतल्याशिवाय आपल्याला सामाजिक संघर्षाचा लढा लढता येणार नाही हे समजू लागले.”ही भूमिका नक्कीच स्वागताहार्य आहे.या देशाला उन्नत व विकासभिमुख करायचे असेत तर फुले -शाहू-आंबेडकर यांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही.हा आशावाद आदिवासी कवितेच्या विद्रोहासाठी लाख मोलाचा आहे.भुजंग मेश्राम आदिवासी कवितेविषयी म्हणतात की,”आदिवासी लेखकासमोर प्रेरणेचे निमित्य म्हणून दलित (आंबेडकरवादी )लेखक डोळ्यासमोर होते त्यामुळे आदिवासी लेखक लिहू लागला.डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या शक्तिस्थळांमुळे आदिवासी साहित्याला दिशादिग्दर्शक मिळाल्याने आदिवासी साहित्याची मुलभूत प्रेरणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत”.हे वैचारिक अधिष्ठान आदिवासी कविने समजून घ्यावे.प्रस्थापित समाजाला मदत करणाऱ्या आदिवासी लेखक , कविने व नेत्यांनी अंतर्मुख होऊन नवे प्रबोधनसुत्र बांधून काम करावे.कारण आजही काही आदिवासी लेखक व विचारवंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्तृत्वाला मानायला तयार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचे कृतज्ञता न मानता . आदिवासी समाजाला जे अधिकार मिळाले ते फक्त जयपालसिंह मुंडा यांच्या कार्याने मिळाले अशी नवी मांडणी करतांना दिसतात .काही पुरोगामी विचारवंत व लेखक स्वतःला आदिवासीचे तारणहार मानतात.पण तेच महाभाग अलोकतांत्रिक विषमता पेरणाऱ्या संघटनेला मदत करतात .त्याचे पुरस्कार स्वीकारतात.ही दोबली नीती आदिवासी समाजाच्या हिताची नसून आदिवासी समाजाला मागे नेणारी आहे.

देशातील समाजशास्त्री आदिवासीला मागासलेले हिंदू ,वनवासी,अशा शब्दातून आदिवासीचा मुळअर्थ समाप्त करतात. भारतातील धार्मिक संघ आदिवासी पाड्यावर जाऊन कट्टर धार्मिक शिकवण देतात.वनवासी आश्रम , ख्रिस्ती सेवा संघ आदिवासी समाजाला धार्मिकतेच्या नशेत गुंग ठेवतात.आज नक्षलवादी म्हणून आदिवासी माणूस आदिवासी पोलीसाकडून मारला जातो.आता आदिवासी समाजाने कोणत्याही फसव्या पक्षाच्या मागे न जाता आंबेडकरवादी विचाराची प्रखरता लक्षात घेऊन नवे राजकिय समीकरण तयार करावे.अनुसूचित जाती व जमातीचे मानसे हे समदूःखी आहेत हे जाणून ऐकमेंकाना सहकार्य करावे.नक्षलवादी म्हणून आपल्यावर लागलेला डाग आपण दूर केला पाहिजे.कवी “हेडलाईन “या कवितेत लिहितो की,

दुसऱ्या दिवशी
वर्तमान पत्राची हेडलाईन
शेकडो नक्षलवादी पोलीसाच्या जाळ्यात
पंडित इन्स्पेक्टरची
राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारश ..!

वर्तमान राजसत्ता आदिवासी बांधवाना नक्षलवादी म्हणून शोषण करत आहे.पायवाटेनं जाणारा ,भुकेसाठी मोहफुल शोधणारा, आपल्या हक्कासाठी आंदोलन मोर्चा काढतो तेव्हा सरकार अतिशय दुःखदायक त्याचे बिमोड करतो.मायचे जीवन अंधकारमय झालेले आहे.ती कष्ट झेलून आपल्या मूलाला शिक्षणासाठी प्रेरित करते .क्रांती करण्याची ऊर्जा देते .कवीची आई मँक्झिम गौर्कीच्या आईसारखी आहे.जगातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायावर ,जुलमावर प्रहार करण्याची शक्ती देणारी आई साऱ्या कामगाराची आई होते .तशीच कवीची माय साऱ्या वंचित आदिवासी समाजाची दिशादर्शक होते.मायच्या जीवनातील संघर्ष रेखाटतांना कवी म्हणतो की,

दूर होईल काळोख
थांबेल मायेचा आक्रोश
तिच्या लेकराचा लढा
आता देईल प्रकाश….१७

कवी देशात आरक्षणावरून होणाऱ्या संघर्षाविषय दुःखी आहे.आम्हाला मिळालेले आरक्षण उच्चवर्णीय समाजाने भ्रम निर्माण करून देशात भेदाभेभावाची दिवार उभी केली आहे.हजारोवर्षापासून पिळलेल्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळावे .त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा ही भूमिका आरक्षणाची असतांना . राजकारणी लोकांनी आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर केला आहे.कवीने ब्राम्हणी समाजाचा अनिकेत जोशी जेव्हा आरक्षणाला विरोध करतो तेव्हा कवी पेटून उठतो .तो” मेरीट” या कवितेत लिहितो की,

हवे तर
गरीबीत जन्मलेली माणसे
मरण शोधतात आयुष्यभर
हे आधी शिक..
मग विचार..
“आरक्षण कशाला हवे ?”
“तुमचं मेरिट काय ? ” ४६

आदिवासी समाज हा जगापासून दूर राहणारा ,जंगालात निवास करणारा ,पण त्याला जंगलात निवास करायला लावणारी व्यवस्था खरचं मानवतावादी आहे का ? आदिवासी समाज हा समतावादी मातृसत्ताक पध्दतीने जीवनयापन करणारा समाजात अनेक पोटभेद निर्माण झाले आहेत.आज संविधानाच्या माध्यमातून सारे वर्ग एक होत असतांना आपल्या मनातील जातश्रेष्ठत्व जात नाही.याविषयी कवी “याला काय म्हणायचे ” या कवितेत लिहितो की,

जाती व्यवस्थेच्या विरोधात
महापूरुषांनी
केलेला संघर्ष
माहित असतांना आम्ही
अजूनही
भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या
जातीची
जाणिवपूर्वक विचारपुस करतो
याला काय म्हणायचे.. ७२

जोपर्यंत येथिल सर्व बहुजन बांधव एकत्र येत नाही तोपर्यंत आपली सत्ता आपण मिळवू शकत नाही.तसेच आदिवासी मधील पोटजातीची उतरंड समाप्त केल्याशिवाय आदिवासी समाजाचा आवाज संसदेपर्यंत पोहचत नाही .यासाठी कवी” दिशा ” या कवितेत लिहितात की,

गोंड -परधान
एकाच मायेची
दोन लेकरं
चिखल -पाण्यासारखा संबंध.
……………
आता
आपण
सर्वांनी
आपलेच डोके
तपासले पाहिजे
अन्
नव्या आंदोलनाची
एकच दिशा
ठरवली पाहिजे..४७

या देशातील चौदा वर्ष वनवास करणाऱ्या राजाला मोठा मान आहे.त्याचे महाकाय मंदिर बांधले जात आहे.बांधकामासाठी मोठमोठ्या रक्कमा उखळल्या जात आहेत.देशाचा राष्ट्रपती मंदीराकरीता चंदा देतो .मिडियाची मोठी हेडलाईन होते.जर राष्ट्रपतीने एखाद्या मशिद व आदिवासी स्मारकासाठी चंदा दिला असता तर ती हेडलाईन कशी बनली असती हे सांगण्याची गरज नाही.ज्या राजाने शम्बूक,शुर्पणखा,एकलव्य,आणि शेकडो पिढ्यांची कत्तल केली त्यांना आदर्श म्हणून भारतीय जनतेच्या मेंदूत कोंबल्या जात आहे.म्हणून कवी त्याचे अस्तित्व धिक्कारतांना “जनतेच्या दुःखाबद्दल “या कवितेत लिहितो की,
तुझे अस्तित्व म्हणजे
आमच्या मृत्यूचा आलेख
वंशविच्छेद काळ
प्रदेशाची लूट
गुलामीची सुरुवात
आणि
आमच्या अस्तित्वाचा शेवट
म्हणूनच
धिक्कार करतो
तुझ्या नावाचा!! ८५

ही कविता सर्वंच भारतीयांना विचार करायला भाग पाडणारी आहे.आम्ही जेव्हा आमचे मोर्चे काढतो तेव्हा आम्हाला तुरूंगात डाबंल्या जाते .नेते मंडळी राजकारणासाठी आदिवासी समाजाचा उपयोग करतात.आदिवासी काही नेते समाजहीत सोडून पक्षहीत जोपासतात.पायल तडवी सारख्या डॉक्टरला स्वतःचा जीव गमवावा वागतो.हे विदारक वास्तव आदिवासी नेते कधी समजणार.आमच्या माणसाचे जीवन मातीमोल होत आहे.आमच्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होत आहेत.अरे मित्रा हा आपला देश आहे का? असा प्रश्न कविसमोर उभा आहे.कवी “आपण कोणत्या देशात राहतो..!”या कवितेत लिहितो की,

लोकशाहीत हुकूमशाही की
हुकूमशाहीत लोकशाही
यार एडका,
आपण कोणत्या देशात राहतो..!५३
देशाचा स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो.असं वाटतं साऱ्या भारतीयांना त्यांचे हक्क मिळाले .पण आदिवासी समाजाला अजूनही संविधानातील अमृतफळे चाखता आली नाही.आदिवासी मुलींची विटंबना थांबली नाही.तर तीला नेत्याच्या स्वागतासाठी रेऱला रेऱला नृत्य सादर करण्यासाठी तयार केले जाते.साऱ्या पाहणाऱ्या माणसाच्या नजरा वखवखल्यावानी आमच्या मुलींच्या शरीराचा वेध घेतात यावर कवी आक्रमक झाला आहे.तो ” बोला…काय म्हणनं आहे तुमचं..!” या कवितेत लिहितात की,

मी म्हणतो
त्या हिजड्यांच्या पुढे
नाचण्याची काय गरज ?
त्यांना बायका पोरी नाहीत ?
आवश्यक असेलच
तर
त्यांनीच आपल्या बायका पोरींना आणून
खुशाल नाचवावं
अगदी उघड्या फेंडा करुन
आमची त्याला ना नाही. २३

ही ज्वालाग्राही कविता समाजव्यवस्थेतील विकृत मानसिकतेचे पदर उलघडून दाखविते.हा विद्रोह आदिवासी कवी मध्ये फार कमी पाहायला मिळतो.या कवितेतून” मी चिन्ना बोलतोय “या नरेशकुमार बोरीकर यांच्या कवितेतील आवाज प्रखर करणारा वाटतो .बोरीकर आपल्या कवितेत लिहितो की,

असे कित्येक निरपराध आदिवासी
सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन
आधी ताडा
मग बलात्कार अन् शेवटी हत्या करण्यात
आलेल्या
आमच्या त्या चार बहिणी नंतर एडका आत्राम
आणि आता मी…

ही कविता भारतीय समाजातील मग्रुरवृत्तीचा पट उलघडून दाखविते.कवीची नजर येथिल अत्याचार पाहून अद्दिग्ध झाली आहे.जननायक बिरसा मुंडा यांचा क्रांतीबाणा या कवितेला लाभला आहे.ते” बिरसा “या कवितेतून व्यक्त होतांना लिहितात की,

जन्माला कमरीच्या पोटी
ठरला दीनांचा बिरसा
तुझ्याच संघर्ष क्रांतीचा
घेतला आम्ही वसा..६९

कवीची बांधिलकी परिवर्तनवादी संघटने सोबत आहे.तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आपला महानायक मानतो.ते “महानायक “या कवितेत लिहितात की,
महामानवा

तू चेतवलेले
समग्र क्रांतीचे वादळ
आता बनले आहे
जगातील दुःखीतांचा जाहिरणामा…४५

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सर्वच मानवाला नवी महाऊर्जा दिली आहे.संविधानिक लोकशाहीतून कल्याणकारी समाजाची निर्मिती व्हावी ही आशा असतांना आज सरकार भांडवलशाहीचा उदोउदो करत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासातील खोट्या मिथकाला आग लावून नवे तत्वज्ञान आपल्या दिले आहे.कवीने आंबेडकरवादी विचाराची निष्टा घेऊन आदिवासी समाजाच्या क्रांतीत्वासाठी आपली लेखनी पाजवली आहे.आदिवासी कविता ही आंबेडकरवादी कविताच आहे.कारण आदिवासी कवीची प्रेरणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे .

आपण कोणत्या देशात राहतो..!या कवितासंग्रहातील अनेक कविता नव्या मूल्यपरिवर्तनाचा परिघ विस्तारणाऱ्या आहेत.निवडणूक,मास्तर,शोध,
प्रोफेसर,जाहिरात,वादळे ,
कुपोषण ,डॉ.सुनिल टेकाम या कवितातून आदिवासी जीवनाचे भावचित्र अत्यंत क्रांतीदर्शी रेखाटले आहे.साक्षी नाकारल्या तरी ..या कवितेतून उद्याच्या सूर्य आपलाच आहे हा आशावाद प्रगट केला आहे .कवी म्हणतो की,

रानगर्भाच्या काळोखात विखुरलेल्या
अस्मितेचा संदर्भ
वर्तमान इतिहासाच्या पानापानातून
नोंदविणार आहे.
साऱ्यांनी जरी साक्षी नाकारल्या तरी
उद्याच्या सूर्य आपलाच आहे..!५९
आजचे आदिवासी नवे कवी नव्या मूल्यमंथनाचा आवेग प्रगट करीत आहेत.प्रभु राजगडकर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की,”प्रब्रम्हानंदची कविता विविध पातळ्यावर आपल्याशी संवाद करते.ती आदिवासींच्या इतिहासाची जशी झाडाझडती घेते तसे विद्यमान व्यवस्थेतील दुभंगलेपण ही आपल्यासमोर मांडते.त्यांची कविता व्यवस्थेला प्रश्न विचारते ” ही मिमांसा सत्यशोधकी आहे.आज आदिवासी कवी नव्या लढाईसाठी स्वतःला तयार करत आहे.हा कवीचा पहिलाच संग्रह असल्याने काही मर्यादा जानवतात.कविने आपल्या भावनेला क्रांतीकारी पंख लावून न भिता रेखांखित करावे.पुढील कवितासंग्रहात परिपक्वतेचा नवा आविष्कार पाहायला मिळेल यात शंका नाही. आपण कोणत्या देशात राहतो हा कवितासंग्रह नव्या क्रांतीचा उद्घोष आहे.आदिवासी समाजाने आता एक होऊन संविधानिक हक्क हिसकावून घ्यावे.आता आम्ही नव्या क्रांतीसाठी सज्ज झालो पाहिजे हा आशावाद या कवितेतून दिसून येतो. याकरीता कविला पुढील काव्यप्रवासाला मंगलकामना चिंतितो..!

✒️लेेेखक:-प्रा. संदिप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००