गगनभरारी:स्त्री सामर्थ्याची अनुभूती

  51

  आजही ह्या एकविसाव्या शतकात स्त्रियांची दखल घेणारे , त्यांचे मोलाचे कार्य जगासमोर आणणारे फारच कमी आहेत .अनेक वेळा स्त्रीचं कर्तृत्व दुर्लक्षित केले जाते.

  बिकट परिस्थितीशी दोन हात करून त्यावर विजय मिळवणाऱ्या स्त्रियांना सलाम. जिद्द, चिकाटी व कष्ट अशा त्रिवेणी गुणांमुळे अशक्य गोष्टी ही शक्य करणाऱ्या महिला व मुलींच्या सत्यकथा लेखक देवेंद्र भुजबळ यांनी ‘ गगनभरारी ‘ या पुस्तकाद्वारे जगासमोर आणून महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे.
  स्त्रीरुपी शक्तीचं दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाद्वारे लेखकाचा स्त्री विषयी असलेला आदर स्पष्ट दिसून येतो. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे स्त्रीने आपले नाव कोरले नाही. लेखकाने अशा अनेक महिलांचा जीवन प्रवास त्यांच्या संघर्षमय कहाणीतुन ह्या पुस्तकातून उत्कृष्टपणे सादर केला आहे. महिलांचा सकारात्मक दृष्टीकोन, त्यांचा खडतर प्रवास व त्यातून शोधुन काढलेली विजयाची वाट आपल्या सर्वानाच प्रेरणा देणारी आहे.
  यात प्रथम सुशिलाबाई साबळे यांचे नाव आवर्जून घ्यावे वाटते. कचरा वेचणाऱ्या सुशिलाबाई त्यांच्या जिद्द व चिकाटीद्वारे फक्त देशातच नव्हे तर विदेशांत आपले नाव कोरून कशा आल्या , ही त्यांची कहाणी वाचल्यावर त्यांच्या विजयाचे रहस्य आपल्याला कळेल.

  भाग्यश्री पांचाळेने कशा पद्धतीने संगीतालाच आपले ध्येय बनवले व पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे ती कशी यशस्वी होऊ शकली हे सांगितले आहे. इंग्लंड मधील जेन व तिचे चिंपाझी विषयी असलेले प्रेम, तिचे संशोधन, तिचा तो जंगलातील अनोखा प्रवास अचंबित करणारा व अंगावर शहारे आणणारा आहे. अनुवादासारखे आगळेवेगळे करियर निवडणाऱ्या विद्याताईंची यशाची कहाणी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. डॉ किरण चित्रे ह्यांचा दूरदर्शन मधील प्रवास , ‘मूलखावेगळी माणसं ‘ ह्या कार्यक्रमाने त्यांना दिलेली प्रसिद्धी, ह्यामुळे त्यांच्यातील निर्मात्याला कसा जन्म दिला व पुढे त्यांनी अनेक दर्जेदार कार्यक्रमाची निर्मिती करून सिद्ध केले की महिला कोठे ही कमी नाही. डॉ रेखा डावर ह्यांना देशप्रेमाने अमेरिकेतून भारतात आणले व एच. आय.व्ही. ग्रस्त महिलांच्या त्या मैत्रीण झाल्या.

  त्यांनी गर्भवती महिलांना केलेले समुपदेशन , त्यांच्या प्रयत्नामुळे नवजात बालकांना जीवदान मिळून ती ह्या रोगापासून बचावलीत.डॉक्टरांना देव मानणाऱ्या आपल्या संस्कृतीच्या त्या जणू प्रतीक आहेत.संवेदनशील कवियत्री, प्रसिद्ध लेखिका,संपादिका व प्रकाशिका अशा अष्टपैलू व धाडसी व्यक्तिमत्व लाभलेल्या लताताई गुठे ह्या महिलेचा जीवन प्रवास हेच सिद्ध करतो की महिला ह्या सर्व जबाबदाऱ्या उत्कृष्ठपणे सांभाळू शकतात, कुटुंब व करिअरचा समतोल साधू शकतात. आधुनिक विचारांची ज्योत मनामनात रुजवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड यांनी वीरपत्नी व विधवांना सुवासिनींचे लेने देऊन ,त्यांची ओटी भरून नव्या क्रांतीची ज्योत रुजवून अनेक विधवांचे पुनर्विवाह करून त्यांना जणू एक नवा जन्म दिला आहे. लेखकाने अंध सुजाताची डोळस कहाणी लिहून जणू अनेक अपंगांना नवी दिशा दाखवली आहे की , अपंगावर मात करून सुद्धा यश प्राप्ती होऊ शकते.

  फक्त आपल्यातील आत्मविश्वास जागरूक असला पाहिजे. उत्तम विचारसरणी, सकारात्मक दृष्टीकोण व त्याचा आपल्या जीवनावर होणारा चांगला परिणाम ह्याचे महत्व डॉ नीलम मुळे ह्या मानसरोगतज्ञ आपल्या लेखणीद्वारे,पालकसभेद्वारे सांगून अमूल्य कार्य करत असतात. संपादक वैशाली आहेर ह्यांना मुलांच्या प्रेमाने मरणाच्या दारातून परत कसे आणले , त्यांच्या लढाईला कसे बळ मिळाले ही कथा वाचताना तर आपल्या पायाखालची जमीनच सरकते .
  शून्यातून देखील जग निर्माण करता येते मात्र कधीही खचू नये हा त्यांचा धडा आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे.लग्नानंतर जर जोडीदाराची साथ लाभली तर महिला नक्किच यशाचे शिखर गाठू शकतात ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गीता माळी ह्यांचे होय.त्यांनी मुलाचे संगोपन करून गायनाचे धडे घेतले . त्यांचे देश विदेशात गायनाचे हजारो कार्यक्रम झाले .अशा एकापेक्षा एक मुलींच्या व महिलांच्या कथा ह्या पुस्तकात आहेत.हे पुस्तक वाचकांना एक सुवर्णमय पर्वणीच आहे.हे पुस्तक वाचून निश्चितच त्या स्त्रीरुपी शक्तीच्या पंखांना उडण्याचे बळ मिळेल व तिच्या सामर्थ्याला भरारी मिळेल. वरील सर्वच महिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी पुरस्कृत असून जणू स्त्री शक्तीच्या अभिमानाचा तूरा आहेत. पुस्तकाचे पान जसे उलटत जाऊ तसे प्रत्येक स्त्री अथवा मुलगी नवीन काही तरी शिकवत जाते. प्रत्येकीची गोष्ट ही वेगळी असली तरी तिच्या जिद्दरुपी प्रकाशाची ज्योत मनात आशेची पालवी जागृत करते.तिची कहाणी वाचून आपण देखील जीवनात काही करू शकतो हा आत्मविश्वास जागृत होतो, आपला स्वप्नपुर्तीचा विश्वास मनात दाटून येतो . आशेचे किरण स्पष्ट दिसू लागतात . हेच तर लेखकाचे खरे उद्दिष्ट असावे . हीच तर त्यांच्या लिखाणाची पोच पावती ठरू शकते. हे पुस्तक वाचकांना नक्कीच नवी दिशा दाखवेल व त्यांच्या मनात आशेचे किरण जागवेल ह्यात तिळमात्र शंका नाही.

  ✒️लेखिका:-रश्मी हेडे