ब्रम्हपुरी तालुक्यातील वन हक्क धारकांना तेंदूपाने संकलन प्रक्रियेतून मिळणार 1 करोड 18 लाख रुपयाचे रोजगार

35

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि.11 मे):- अक्षयसेवा बहूउद्देशीय सामाजिक संस्था मेंडकी मागील 10 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, चिमूर व नागभीड तालुक्यात वन संसाधनावर लोकांचे अधिकार व ग्रामसभा सक्षमीकरण करण्याचे काम करत आहे. त्यामध्ये वन संसाधन आधार लोकांचे व्यवसाय सुरु करणे, ग्रामसभेतील निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचे पुढाकार वाढविणे, वन व्यवस्थापन आराखडा तयार करणे, ग्रामसभेच्या पुढाकारातून वनाचे संवर्धन, संरक्षण व व्यवस्थापन करणे. याप्रकारे यशस्वीरित्या संस्थेचे काम सुरु आहे. सन 2021 या वर्षीत अक्षयसेवा संस्थेच्या प्रयत्नातून वन हक्क कायदा 2006 नुसार 17 ग्रामसभांना एकत्रित आणून ग्रामसभा महासंघ तालुका ब्रम्हपुरी नावाने ग्रामसभा महासंघ गठीत करण्याचे काम संस्थेने केले आहे. ग्रामसभा महासंघाच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्येक ग्रामसभेच्या वतीने 2 प्रतिनिधी सहभागी आहेत.

अक्षयसेवा संस्थेनी बैठका कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभा महासंघ, ग्रामसभा प्रतिनिधी व वन हक्क व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षित करून ग्रामसभा महासंघ सदस्य, ग्रामसभा प्रतिनिधी व सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांना सक्षम करण्याचे काम केले आहे. त्यामुळे तेंदूपत्ता प्रक्रियेत ग्रामसभा व सामुहिक वन हक्क व्यवस्थापन व ग्रामसभा महासंघ यांचे पुढाकार वाढले. त्यामुळे यापूर्वी दरवर्षी वनविभागामार्फत होणारी तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया यावर्षी ग्रामसभा व ग्रामसभा महासंघ मार्फत करण्याचे ठरले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी ( वन हक्क मान्यता ) अधिनियम 2006 व नियम-2008 व सुधारणा नियम 2012 च्या कलम 3 (1) नुसार वन जमीन धारण करण्याचा हक्क आणि अधिनियमातील 3(1) ग नुसार गौण उत्पादन (तेंदूपत्ता) गोळा करणे, त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे यासाठी मिळालेल्या स्वामित्व हक्क अन्वये तेंदूपत्ता संकलन, व्यवस्थापन व विक्री करण्याचे काम ग्रामसभा महासंघ तालुका ब्रम्हपुरी मार्फत सुरु करण्यात आले.

तेंदुपत्ता संकलन व विक्री प्रक्रियेत ब्रम्हपुरी तालूक्यातील वायगाव, गणेशपूर, जवराबोडी, काटलीचक, मालडोंगरी, अड्याळ, तुलानमाल, लाखापूर, सायगाटा, माहेर, दुधवाही, बेलदाटी, चिचगाव, तुलानमेंढा, चांदगाव, कळमगाव व धामणगाव या 17 ग्रामसभांचा सहभाग आहे. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे तेंदूपत्ता संकलनाचे कार्य प्रभावित होऊन अनेक गरीब व वन संसाधनावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची रोजीरोटी बुडण्याची भीती निर्माण झाली होती व त्याचा परिणाम ग्रामीण अर्थकारणावर दुरगामी होईल असे चित्र दिसत होते. याचे कारण सदर गावे जंगलागत असल्याने शेती इतकेच किंबहुना जास्ती महत्त्व या वनहक्क धारकाला वनउपज गोळा करून विकण्यास आहे. त्यामुळे कोविड संक्रमण काळात रोगाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेत लाडो इंटरप्रायजेस कंपनी, राजनांदगाव (छ.ग.) यांच्यासोबत लिलाव प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर करार केले आहे. व ग्रामसभा महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांनी 17 महसुली गावात तेंदूपत्ता संकलनाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तेंदूपत्ता हंगामातील वन विभागाला जाणारी रॉयल्टी आता थेट ग्रामसभांना मिळणार आहे. तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना यावर्षी दरवर्षीपेक्षा अधिक मजुरी मिळत असल्यामुळे मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व कोरोना काळात अनेकांच्या हाताला इतर ठिकाणी काम नसतांना या परिसरात तेंदूपत्ता संकलन प्रक्रियेतून लोकांना रोजगार मिळाले. तेंदूपत्ता संकलनातून प्राप्त रक्कमेचा वापर ग्रामीण नागरिक शेतीच्या हंगामात बी-बियाणे, खत, नांगरणी, तसेच शेतीच्या कामाकरिता लागणारी मजुरी व इतर कार्याकरिता दरवर्षीप्रमाणे उपयोगी पडेल हि प्रक्रिया लोकांच्या उपजीविकेसाठी संजविनी ठरली आहे.

पुढील काळात केंद्रीय वनधन योजनेतून वन संसाधन आधारित लोकांचे प्रक्रिया उद्योग सुरु करणे व ग्रामसभा महासंघामध्ये अजून 33 ग्रामसभा सहभागी करून चंद्रपूर जिल्ह्यातील 50 गावांमध्ये प्रक्रिया उभी करणे पुढील नियोजन आहे. असे सुधाकर महाडोरे, सचिव अक्षयसेवा बहूउद्देशीय सामाजिक संस्था यांनी सांगितले आहे.

हि प्रक्रिया उभी करण्यासाठी कोरी संघटना मुंबई, ग्रामसभा महासंघ अध्यक्ष सुषमा मोहुर्ले, ग्राम सचिव श्री. राजेश पारधी, ग्रा.म. कोशाध्यक्ष श्री तुळशीदास काटलाम, श्री. अतुल राऊत, श्री. रवी पवार, श्री. संजय मेश्राम, समस्त ग्रामसभा प्रतिनिधी व सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती यांनी सहकार्य केले आहे. तसेच याकरिता वन विभागाचे सहकार्य मिळाले.