जितेंद्र भावे यांच्या अटकेचा धिक्कार -जितेंद्र भावे आम्ही तुमच्या सोबत आहोत

54

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.26मे):-मधील लुटारू दवाखान्यात विरुद्ध सातत्याने आवाज उठवणाऱ्या जितेंद्र भावे यांना अखेर आज अटक करण्यात आली. शेकडो नाशिककर त्यांच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले आहेत. जितेंद्र भावे यांचा गुन्हा काय ? तर ओकार्ड या प्रसिद्ध दवाखान्यात त्यांनी एका पेशंटचे घेतलेले दीड लाख डिपॉझिट परत करावे म्हणून आग्रह धरला. त्या पेशंटने जवळपास घरातील चार मृत्यू झाले तरी दहा लाख रुपये बिल भरण्याचे ते सांगतात. शेवटी संतापून हे आमचे कपडे विकून आता उरलेले बिल भागवा अशी टोकाची भूमिका घेतली. हे कितपत सभ्य सुसंस्कृत अशी चर्चा ज्यांना करायची त्यांनी जरूर करावी परंतु हा संताप कशातून येतो हे समजून घेतले पाहिजे..

जितेंद्र भावे वर्षभर सातत्याने नाशिक मधील लूट करणाऱ्या दवाखान्याचे वास्तव फेसबुक लाईव्ह मधून समोर मांडत आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर असे शेकडो लाईव्ह आपल्याला दिसतात. रुग्णालयात झोपून असलेल्या रुग्णाच्या जेवणाचे बिल लावणे, नऊ रुपयाचे ग्लोव्हज 67 रुपयाला आणि अशा कितीतरी सुरस कथा जितेंद्र भावे यांनी पुढे आणल्या.. दवाखान्याची पुराव्यासह लूट शाबीत केली. त्याचबरोबर १०० पेक्षा जास्त पेशंटचे बिल प्रत्यक्ष यंत्रणेला तपासायला लावले आणि त्यातील विसंगती लक्षात आणून दिल्या. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत जावे तर ऑक्सिजनच्या लिकेज ने झालेले मृत्यू आपण नाशिकमध्ये बघितले आणि खाजगी दवाखान्यात जावे तर याची लूटमार अशा या लुटमारी विरुद्ध जितेंद्र भावे सारखा एक कार्यकर्ता उभा राहतो.

संपूर्ण वर्षभर जीवाची पर्वा न करता मोठ्या मोठ्या कार्पोरेट हॉस्पिटलला आव्हान देतो. गरीबातल्या गरीब पेशंटसाठी संघर्ष करतो आणि दवाखान्यात होणाऱ्या लुटमारीला कोणीच वाली नाही हे उघड सत्य आहे. डॉक्टरांनी जीव वाचवण्याची किंमत जरूर घेतली पाहिजे परंतु ती जीव जाईपर्यंत वसूल करायचे का ? असा नेमका आणि थेट प्रश्न जितेंद्र भावे विचारतात. जितेंद्र भावे हा समाजमनाचा दबलेला हुंकार आहे तुम्ही मी आणि प्रत्येक जण हिशोबीपणे गप्प बसलेला असताना सात्विक संतापातून गरीब माणसासाठी लढणारा कार्यकर्ता विझता कामा नये आणि म्हणून जितेंद्र भावे यांच्या अटकेचा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने धिक्कार करायला हवा आणि प्रत्येक शहरातील या लुटमारी विरुद्ध संघर्ष उभारायला हवा.. कोरोनात लोक घाबरले आहेत..त्याचा गैरफायदा घेऊन लूट करत दवाखान्यातून बचावलेले लोक कर्जबाजारी होऊन मरणार का?

जितेंद्र भावे यांच्या अटकेने हे वास्तव समोर आणले आहे. खऱ्या अर्थानं आम आदमी पक्षाचा हा राज्य प्रवक्ता आम आदमी आहे. नाशिक शहरात 10 पेक्षा जास्त प्लास्टिक ची दुकाने आहेत. उद्योजक असलेल्या जितेंद्र भावे यांना खरे तर असे उद्योग करण्याची काहीच गरज नाही पण पहाटे पेपर टाकण्यापासून तर रात्री प्लास्टिकच्या सगळ्या दुकानांचा हिशोब लावत लावत यांचे समाज कार्य सुरू असते. अशा प्रकारची ही दुर्मिळ नष्ट होणारी ही प्रजाती समाजाने जपायला हवी… जितेंद्र भावे आम्ही तुमच्या सोबत आहोत