मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना तलाव लीजवर दिलेल्या कालावधीत एक वर्षाची मुदतवाढ तसेच लिज माफ

34

🔸काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार मा. नानाभाऊ पटोले यांनी केली होती मागणी

🔹भंडारा जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आदेश

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.31मे):-जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत येणारे तलाव मत्स्य व्यवसायाकरिता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना तलाव लीजवर दिलेल्या कालावधीत एक वर्षाची मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ करण्यात यावी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार मा. नानाभाऊ पटोले यांनी सातत्याने प्रयत्न केले. गेल्या दोन वर्षांपासून मत्स्य उत्पादक बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तसेच गेल्या वर्षी पासून कोरोना महामारी मुळे सर्वत्र लॉकडाउन होते, त्याचबरोबर अतिवृष्टी देखील झाली होती, त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन आणि नुकसान देखील त्यांना सहन करावे लागले. यामुळे आर्थिक संकटांना देखील मत्स्य उत्पादक संस्थांना सामोरे जावे लागले. या गोष्टीची दखल घेत मा. नानाभाऊ पटोले यांनी जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भाने कळविले होते. त्यावर जिल्हा परिषदच्या वतीने आदेश काढण्यात आले आहेत.

यामुळे मत्स्य उत्पादन करणारे बांधव व मत्स्यव्यवसाय संस्था यांना याचा मोठा फायदा होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक लोकांच्या उपजिविकेचे साधन म्हणजे मत्स्योत्पादन आहे. आणि हे मत्स्य उत्पादन करणारे बांधव वेगवेगळ्या मत्स्यव्यवसाय संस्थांच्या अंतर्गत आपला व्यवसाय करत असतात, त्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळणार आहे.