जुही चावलाला न्यायालयाची फटकार

28

हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री जुही चावला हिने 5 जी तंत्रज्ञानाच्या विपरीत परिणामांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 5 जी तंत्रज्ञानाच्या उत्सर्जनापासून पशु, पक्षी, मानव, कीटक, वनस्पती या जीवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून हे तंत्रज्ञान कार्यन्वित झाल्यास वातावरणात सध्यापेक्षा १०० पटीने रेडिएशन होणार आहे त्यामुळे या 5 जी तंत्रज्ञानावर बंदी घालावी अशी मागणी जुही चावलाने याचिकेत केली होती. पण तिने या दाव्याच्या पुष्ट्यार्थ पूरक असे कोणतेच पुरावे तसेच शास्त्रीय कारणे दिली नाही त्यामुळे जुही चावला हिने केवळ प्रसिद्धीसाठी ही याचिका दाखल केली असून त्यामुळे न्यायालयाचा बहुमोल वेळ वाया गेला असे म्हणत न्यायालयाने तिची ही याचिका फेटाळून लावली इतकेच नाही तर तिला २० लाखांचा दंडही ठोठावला.

जुही चावला हिने केवळ ऐकीव गोष्टी व अंदाज यांच्या आधारे ही याचिका दाखल केली असून यामागे केवळ प्रसिद्धी मिळवणे हाच उद्देश दिसतोय असे म्हणत न्यायालयाने जुही चावलाला झापले आहे. खरेतर देशात मोबाईल तंत्रज्ञान, मोबाईल टॉवर, मोबाईल रेडिएशन यावरून लोकांमध्ये विविध प्रकारचे प्रवाद आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले होते तेंव्हा मरण पावणारे रुग्ण हे कोरोनामुळे नव्हे तर ५ जी तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगमुळेच मरत आहेत अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे 5 जी तंत्रज्ञानाच्या विरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत पण आजवर एकाही याचिककर्त्याला आपला दावा न्यायालयात सिद्ध करता आलेला नाही किंबहुना काही याचिकाकर्त्यांना न्यायालयाने फटकारलेही आहे यावेळी ही फटकार जुही चावलाचया वाट्याला आली.

जुही चावलाची याचिका निकालात काढल्यानंतर आता यासंदर्भात दाखल केलेल्या अन्य याचिकाही निकालात निघाल्यात जमा आहे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईलचा शोध हा माहिती तंत्रज्ञानासाठी वरदान ठरला आहे. मोबाईलचा शोध लागल्यानंतर सुरवातीला मोबाईल वापरणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी होते. मात्र हळूहळू ते वाढत गेले. मोबाईलवर इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्यावर मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली. त्यात २००७ साली 4 जी नेटवर्कने दरवाजा ठोठावला आणि नव्या युगाला प्रारंभ झाला मात्र भारतात 4 जी अगमनाला त्यामानाने खूपच उशीर झाला. रिलायन्स जिओने २०१६ मध्ये 4 जी तंत्रदान भारतात प्रथम सुरु केले. पुढे सर्वच कंपन्यांनी हे तंत्रज्ञान अवगत केले. त्यामुळे वापरकर्त्यांना वेगवान इंटरनेटची सुविधा मिळू लागली. 4 जी तंत्रज्ञानानंतर 5 जी तंत्रज्ञानाच्या हालचाली सुरू झाल्या.

व्हेरिझॉन ही 5 जी तंत्रदान देणारी जगातील पहिली कंपनी ठरली. या कंपनीने २०१८ साली अमेरिकेत 5 जी सेवा सुरु केली. आता जगभर 5 जी तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. भारतातही 5 जी तंत्रज्ञानाची चाचणी सुरू झाली असून लवकरच भारतातही 5 जी इंटरनेटची सेवा उपलब्ध होईल. या तंत्रज्ञानाला अनेकजण विरोध करत आहेत पण त्यांच्याकडे सबळ पुरावे नाहीत म्हणूनच न्यायालयात या याचिका टिकत नाही.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५