श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक वासुदेवजी पत्रे – राष्ट्रसंताचे निष्ठावंत अनुयायी

29

आरमोरी तालुका (जि.गडचिरोली ) सेवाधिकारी आद.वासुदेवराव पांडुरंग पत्रे यांचे दि. ५/६/२०२१ रोजी शिवणी (वघाळा ) या त्यांच्या जन्मगावी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते.ब्रम्हपुरी -आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीपुलाजवळून ४ किलोमीटर आत आडवळणावर शिवणी हे गाव आहे. सन नोव्हेंबर २०१० मध्ये पत्रेजींच्या गावी जाण्याचा मला योग आला. त्याप्रसंगी श्रीगुरूदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी चे अध्यक्ष डाॕ. नवलाजी मुळे माझेसोबत होते. शिवणी ला पोहचताच वासुदेवजींनी उत्स्फुर्त स्वागत केले होते.सुमारे २२०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचा सुंदर पुतळा स्थानापन्न आहे. दररोज येथे सामुदायिक प्रार्थना चालते. तालुकाप्रमुख या नात्याने वासुदेवजींनी आरमोरी भागात राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार प्रसार केला.

अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या आॕगष्ट क्रांतीज्योत यात्रेत ते सहभागी होत असे.गडचिरोली शहरात होणाऱ्या दरवर्षीच्या राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज स्मृतीदिन कार्यक्रमात ते येत असे. आपल्या शिवणी गावात सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून बाल मनावर उत्तम संस्कार देण्याचे कार्य त्यांंनी केले. वास्तविक शिवणी वघाळा हे पुर्नवसित गाव आहे . वैनगंगा नदीपुरांमुळे हे गाव नेहमी प्रभावीत होत असे.त्यामुळे या गावाचे भविष्यात पुर्नवसन होईल आणि नव्याने गाव वसवावे लागेल असे एकदा वघाळा भेटीत वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी सन १९६६मध्ये सूचक विधान केले होते.पुढे सन १९८०-८१ च्या काळात शिवणीचे नव्याने पुर्नवसन झाले . ही माहिती वासुदेवजींनी त्यांच्या त्या भेटीत मला दिली होतीतसेच वं.महाराजांनी वैनगंगा नदीत जेथे पोहण्याचा आनंद घेतला होता. त्या नदी डोहाचे दर्शन मला वासुदेवजींनी घडविले. त्यांचा पारंपरिक मुख्य व्यवसाय धानशेतीचा. त्यांचा साधेपणा, मितभाषी आणि काटकसरी स्वभाव असल्याने ते कुठेही मिसळत. सहज संवाद साधत. ग्रामगीतेत सांगीतलेल्याप्रमाणे कधी न करी चिडचीड ! कोसळे का आपत्तीचे पहाड !श्रम करोनी जिवापाड ! लोक लावी सन्मार्गी !! अ.८!!या पध्दतीची त्यांची एकंदर जीवनावस्था होती . त्यांच्या रूपात आम्ही एक निष्ठावंत श्रीगुरूदेव प्रचारक आम्ही हरवून बसलो आहे.त्यांच्या कार्यस्मृतींना विनम्र अभिवादन ……..

✒️बंडोपंत बोढेकर(गडचिरोली,महाराष्ट्र)मो:- 9975321682