रेल्वे गाड्यांची थांबे रद्द केल्याने नांदगाव रेल्वे स्टेशन बनले शोभेची वस्तू

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नांदगाव(दि.9जून):- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे हे रेल्वे स्टेशन आर्थिक निकष पूर्ण करत नाही,यासह अनेक कारणांचा आधार घेत रेल्वे प्रशासनाने १३ रेल्वे गाडयांपैकी तब्बल ११ गाड्यांचा थांबा रद्द केल्याने रेल्वे स्थानक केवळ शोभेची वस्तू बनले आहे.आणि थांबे नसल्याने स्थानिक प्रवासी वर्गासह ड्युटीसाठी बाहेरून येथे येणाऱ्या अनेक रेल्वे कर्मचारी वर्गाला ड्युटी संपल्यानंतर येथेच खोळंबून रहावे लागत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल सर्वांचाच संताप होत असल्याचे दिसून येत आहे.

         फारसे उत्पन्न मिळत नसल्याच्या कारणास्तव नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसचा नांदगाव थांबा रद्द करण्यात आला.आणि कोव्हीड-१९ चे निमित्त पुढे करून उर्वरीत गाड्या यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत.सेवाग्राम एक्सप्रेसचा थांबा पूर्वतत करण्याबाबत शहरातून आग्रही भूमिका संतोष गुप्ता,सुमित सोनवणे,मुन्ना शर्मा यांनी नांदगावकरांच्या वतीने मांडली आहे.

        रेल्वे प्रशासनाच्या या तुघलकी कारभारासंदर्भात सुमित सोनवणे म्हणाले की, इंग्रज काळात या रेल्वे स्टेशनला अमर्याद महत्व होते.भारतीय क्रांतिकारक व इंग्रज प्रशासन या दोघांसाठी ही नांदगाव रेल्वे स्टेशन एक महत्वाचे केंद्र होते.आणि नंतरच्या काळात म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतर या रेल्वे स्थानकाला काहीच महत्व उरले नाही.

        तर शिवसेनेचे नेते संतोष गुप्ता म्हणाले की, कोव्हीड-१९ च्या अगोदर ज्या काही गाड्यांना थांबा होता,ती प्रत्येक गाडी मोठे आंदोलन करून मिळवावी लागली.या स्थानकावर नियमित १३ प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबे होते.त्यात दोन गाड्या पॅसेंजर आहेत.आणि सध्या त्याही बंद आहेत.कोव्हीड-१९ चा उपद्रव कमी झाला म्हणून २१ जानेवारी-२०२१ पासून सुरू करण्यात आलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेस चा थांबा नांदगाव रेल्वे स्टेशन आर्थिक निकष पूर्ण करत नाही,म्हणून बंद करण्यात आली आहे.तर उर्वरीत प्रवासी गाड्या नियमित सुरू आहेत,मात्र ह्या गाड्यांचा थांबा कोव्हीड-१९ स्पेशल ट्रेन च्या नावाखाली सध्या बंद आहे.

     तर मुन्ना शर्मा यांनी याच पद्धतीची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.रेल्वेच्या या कारभाराविरोधात विद्यमान आमदार सुहास कांदे यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारण्याचा मनोदय संतोष गुप्ता, मुन्ना शर्मा,सुमित सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.