पुसद तालुक्यातील जमशेटपुर येथे 14 वर्षीय मुलीचा विज पडून मृत्यू

25

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9 जुन);-च्या रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती.तालुक्यात मृग नक्षत्रा नंतर पावसाने तुफान बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात वाऱ्यासह कडकड्याच्या वीजेत पाऊस पडल्याने शेतकऱयांची मात्र पुरती दाणादाण उडाली. तालुक्यातील जमशेटपूर येथे एका 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
समीक्षा पिंटू जाधव वय 14 रा. जमशेटपुर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. जाधव कुटुंबीयांचे जमशेटपुर येथे शेती असून नेहमीप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर मशागतीचे काम करीत होते. शेतामध्ये कापूस लावण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेल्या जाधव कुटुंबावर प्रकृतीने घाला घातला.

दिनांक 9 जून च्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.सोबतच विजेचा कडकडाट देखील पडू लागला होता.अशावेळी समीक्षा तिच्या आई-वडिलांसोबत कापूस पिकाच्या लागवड करण्यासाठी मदत करत होती. दरम्यानच्या वेळेला अचानक तिच्या अंगावर वीज कोसळून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत समीक्षाच्या आईवडिलांनी आरडाओरड केली असता शेत शिवारातील इतर शेतकरी जमा झाले. त्यानंतर याबाबत गावचे तलाठी यांना संपर्क साधून माहिती दिली असता घटनास्थळी दाखल झाले नाही. तलाठी वेळेवर हजर न झाल्यामुळे गावकऱ्यांनी त्यावेळेस रोष व्यक्त केला होता.त्यानंतर ग्रामीण पोलिस स्टेशनचे बीट जमादार दिपक रोडे यांना माहिती देण्यात आली.त्यांनी तात्काळ त्यांच्या टिम सोबत घटनास्थळ गाठले.

सोबतच पुसदचे तहसीलदार अशोक गिते यांना देखील वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.त्यानंतर तहसीलदार यांनी देखील घटनास्थळ गाठले व पोलिसांच्या मदतीने पंचनामा केला.त्यानंतर त्या मुलीचे शव तिच्या आई-वडिलांसोबत पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचे पार्थिव त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पिंटू जाधव व त्यांची पत्नी व त्यांचा आठ वर्षाचा मुलगा असून एकुलत्या एक मोठ्या मुलीला गमावल्यामुळे जाधव परिवार उपजिल्हा रुग्णालयात टाहो फोडत होते. पुसद तालुक्यात दोन दिवसांपूर्वीच लोभिवंत नगर येथे एका युवा शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यात पुसद तालुक्यात वीज पडून मृत्यू पडल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुसदचे तहसीलदार अशोक गिते यांनी पंचनामा करून पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.