पावसाच्या धारा

28

नभामध्ये काळे काळे ढग जमा झाले होते .मृगाच्या पहिल्या सरीच्या गंधासाठी धरती आसूरलेली होती.कृषिवलाने आपली सारी तयारी करून ठेवली होती.नुकतचं निसर्ग वादळ महाराष्ट्रात येऊन गेलं होतं .काही ठिकाणी या वादळाने होत्याचं नव्हतं केलं होतं.कोविड-१९ च्या महामारीतून महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे.शासन आपल्या परीने त्यावर मात करत आहे पण त्यावर अजूनपर्यत यश आले नाही.तीन महिण्यापासून लॉकडाऊनने साऱ्याची अवस्था केविलवाणी केली आहे.मनातील सारी उमेद बंदिस्त झाली होती पण मानवीय मनातील आंदोलित करणारे ऊर्जास्वल स्वस्थ बसू देेत नाही.

अचानक पावसाच्या धाराला सुरूवात झाली.मनातील सारी मळभ झटकून गँलरीत उभा राहून मी पाहात होतो . सूर्याच्या लपाछपीत मृगाच्या धारा बरसू लागल्या होत्या .जीवनाचे
नवचैतन्य बहरून आले होते.मातीच्या कणाकणात थेंब थेंब शोषला जातो.धरतीला नवा शालू परिधान करतो.चरावयास गेलेले खग ,कळप घराच्या ओढीने लगबगीत होते .झाडावरच्या खगाची संख्या वाढली होती .सारी कडे त्याच्या रवाने नवीन संगीत निनादत होते.पाऊस मनाला गारवा देत होता .ज्या पाण्यासाठी महाड संग्राम लढल्या गेला .ते पाणी मनमुरादपणे कोसळत होते.विजाचा चमचमाट,ढगांचा गडगडाटाने सारा आसमंत उल्हासित झाला होता.

कोसळणाऱ्या धारातून खगाच्या रवाचे लहरी तरंग उमटले होते.झाडावर त्यांनी पाणी सभा आयोजीत केली होती पावसाळ्यातील नियोजनाचे गणित जुळवत होते.इकडे माणूस लॉकडाऊनने पुर्णपणे उध्दवस्त झाला होता.सरकारच्या फतव्याने त्याचे सुंदर जीवन दुःखमय झाले होते.नव्या उमेदीच्या ओढीने तो आकाशाकडे पाहत होता.हे दिवस कधी जातील या विचारशीलतने तो चिंतातूर होता.पावसाच्या धारेणं रस्त्यावर नदीचे रूप धारण केले होते.सारेच रस्ते जलमय झाले होते.पावसाच्या धारेनं मनातील तगमगतेला नवीन तजेली दिली होती.

“पाऊस मनाला पाऊस तनाचा
पाऊस कोसळणाऱ्या सरीता
पाऊस नभाचा पाऊस हृदयाचा
पाऊस भूगर्भतेच्या मिलनाचा..

पावसाच्या या धारेनं दुःखावर मात केली होती.नव्या जीवनाच्या ओनामासाठी कृषिवल तयार झाला होता.शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती.पण काही ठिकाणी बनावट बीयांने शेतकऱ्याला उध्दवस्त केलं होतं .पेरलेले बीया नकली निघाल्या. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा कंपण्यांनी आपले कुटील डाव खेळले आणि शेतकरी हवालदीर झाला.सरकारचे व कंपण्याचे साटेलोटे संविधानीक व्यवस्था समाप्त करीत आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे.

परंतु शेतकरी हा उमेद न हारणारा क्रांतीनायक आहे.जगाचा खरा पोशिंदा आहे.जीवनाच्या पथातील सारे दुःख विसरून पावसाच्या धारेतील सृजनत्वाने आनंदमय आहे.आपल्या श्रमावर साऱ्या जगाला जिंकण्याची ईच्छा त्यांच्यात उधानत आहे.बरसणाऱ्या धारातून नव्या मिलनाचे गीत गाणार आहे.डोंगरांच्या कमानीतून सूर्याची चार किरणं तेजोमय झाली असून पहिल्या पावसाच्या धाराने धरत्रीला नवा सुवास सुटला आहे.त्याने माझे मन हर्षुन गेले . पावसाच्या धाराने ओठावर कवितेचे शब्द तरळू लागले.

“नभ भरून मेघानं आलं
पाऊस धारेणं भूचिंब झालं
तप्त धरत्रीला उधान आलं
नवं सृजनत्वाच लेणं आलं ….”

✒️लेेेकख:-संदीप गायकवाड(नागपूर)९६३७३५७४००