जलप्रदूषण : एक गंभीर समस्या

27

देशातील अनेक शहरांना प्रदूषणाने विळखा घातला आहे. दिल्लीसारख्या देशाची राजधानी असलेल्या शहराची प्रदूषणाने काय अवस्था झाली हे आपण पाहतच आहोत. औद्योगिकीकरण व वाढत्या प्रदूषणामुळे हवेत विषारी वायू मिसळला जात आहे त्यामुळे अनेक आजरांना निमंत्रण मिळत आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले. हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे पण मानवाने मात्र या देणगीचा आदर करण्याऐवजी त्यात ढवळाढवळ करायला सुरुवात केली. वायू प्रदूषणाप्रमाणे जलप्रदूषण ही देखील आज गंभीर समस्या बनली आहे. जगात सर्वात जास्त मृत्यू हे दूषित पाण्यामुळे होत आहे. संपूर्ण जगात १८० कोटी लोक दूषित पाणी पितात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात ९ कोटींहून अधिक लोक दूषित पाणी पिल्याने आजारी पडतात.

ग्रामीण भागातील सत्तर टक्के लोक आजही दूषित पाणी पितात त्यामुळे ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे होणारे आजार जास्त आहेत. दूषित पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मणक्याचे आजार होतात, हाडे ठिसूळ होतात, दात पिवळे पडतात, गॅस्ट्रो, हगवण, टायफॉईड, कावीळ यासारखे आजार उदभवतात. जलप्रदूषणाचा धोका फक्त मानवलाच आहे असे नाही; ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जलचरांना देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. एकूणच जलप्रदूषणामुळे जीवसृष्टीच धोक्यात आली आहे. असे असतानाही जलप्रदूषण कमी करण्याबाबत आपण गंभीर नाही असेच म्हणावे लागेल कारण राज्यातील एकूण ५३ नद्या प्रदूषित असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार मुंबईतील मिठी आणि उल्हास या सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून गणल्या गेल्या आहेत. विदर्भातील वैनगंगा, वर्धा या मोठ्या नद्यांसह कन्हान, वेण्णा या नद्यांचाही प्रदूषित नद्यांत समावेश आहे. मध्यप्रदेशात उगम पावलेल्या वैनगंगा नदीचा तुमसर ते आष्टी पर्यंतच्या ७०७ किलोमीटरचा विस्तार अतिप्रदूषित म्हणून गणला गेला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या किनाऱ्याचाही समावेश आहे. वर्धा नदीचा धुधुस ते राजुरापर्यंतचा ५१ किलोमीटरचा विस्तार प्रदूषणाच्या उच्च श्रेणीत आहे. कन्हान नदीचा नागपूर ते भंडारा ( कामठी, कन्हान, पिंपरी, मौदा ) पर्यंतचा १०० किलोमीटरचा विस्तार अतिप्रदूषणाच्या श्रेणीत असल्याचे नमूद आहे.

वेण्णा नदी ही कवडघाट ते हिंगणघाटच्या किनारी प्रदूषित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रदूषणामुळे या नद्यांमधील पाणी पिण्यालायक राहिले नाही असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या नद्यांतील पाणी प्रदूषित असल्याने त्या नद्यांमध्ये असणाऱ्या जलचरांच्या आस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या शहरातील केरकचरा, सांडपाणी, कारखान्यातील दूषित पाणी, सतत होणारा वाळू उपसा यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नद्यांचे हे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. कारखान्यांमधून नद्यांमध्ये सोडले जाणारे दूषित पाणी थांबवायला हवे. जे कारखाने नद्यांमध्ये दूषित पाणी सोडत असतील त्यांचे परवाने रद्द हवेत. वाळू उपसा थांबवायला हवा. जनतेनेही सांडपाणी नद्यांमध्ये सोडू नये. जलप्रदूषण रोखायची जबाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच ती जनतेचीही आहे. जल है तो कल है…. या उक्तीप्रमाणे येणाऱ्या पिढीचे व जीवसृष्टीचे रक्षण करायचे असेल तर जलप्रदूषण रोखायलाच हवे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)