भरजरी शब्दांच्या भाषाशैलीचा धनी

24

[साहित्यिक- आनंद साधले जयंती विशेष]

आनंद साधले यांचे मूळनाव आत्माराम नीलकंठ साधले असे होते. ते मराठीतील एक विद्वान लेखक होते. ‘हा जय नावाचा इतिहास’ या युधिष्ठीराला महाभारताचा खलनायक ठरवणाऱ्या कादंबरीमुळे त्यांना सुरुवातीला कुप्रसिद्धीने डागाळले. परंतु नंतर मिळालेल्या अमाप प्रसिद्धीने त्यांचे जीवन लख्ख उजळून निघाले. या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले होते. शेवटी दीपावलीने त्यांच्या मासिक अंकांत ती भागरूपाने प्रसिद्ध करायला सुरुवात केली. महाभारताच्या अनेक अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, पण सामान्य वाचक तिला डोक्यावर घेऊन नाचले. कादंबरी जसजशी पुढॆ सरकत गेली तसतसे तिचे विरोधक हळूहळू थंड होत गेले. आनंद साधले उर्फ आत्माराम नीलकंठ साधले हे संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे महान साहित्यिक ठरले, हे विशेष!

जीवन दर्शन : आनंद साधले यांचा जन्म दि.५ जुलै १९२० रोजी झाला. त्यांचे वास्तव्य तेलंगणातील हैदराबाद येथे होते. नंदिनी साधले हे त्यांच्या धर्मपत्नीचे नाव होय. त्यांनी आपल्या जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात साठ पुस्तके लिहिली. ‘आनंदध्वजाच्या कथा’मधून त्यांनी धीट भाषेत, पण प्रांजळपणे आणि शृंगाररसपूर्ण लिखाण केले. महाभारताचा एका वेगळ्या पद्धतीने परामर्श घेणारे ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ ही त्यांची साहित्यकृती खुपच गाजली. सौतीने व्यासमुनींच्या जय नावाच्या इतिहासाचे ‘महाभारत’ बनविले. तेव्हा त्यात अनेक भारूडांची भर घातली गेली. त्यांच्याच शब्दांत या ग्रंथाचे स्वरूप ‘यात सर्व काही आहे आणि यात जे नाही ते कुठेही नाही’ अशा प्रकारचे मांडले आहे. “सौतीचा हा प्रयत्न महाभारत पूर्वकालीन ज्ञानसंग्रह या दृष्टीने इष्ट असला, तरी व्यासांचा मूळ हेतू लुप्त होऊन त्याचा अजबखाना झाला, हे खास!” अशी अत्यंत परखड टीका साधले यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केली आहे. आपल्या रोखठोक शैलीत त्यांनी महाभारतातल्या प्रमुख घटनांचे विश्लेषण केले आहे.दमयंती सरपटवार या अधिकच्या टोपण नावाने त्यांनी काहीसे चावट वाटणारे लेखनही केले आहे.

साहित्याविषयी : आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांचं इंग्रजी साहित्यात ‘चावट‘ या सदरात मोडणारं साहित्यप्रकार बऱ्यापैकी रुजलेलं आहे. अर्थात त्याला पाश्च्यात मुक्त वातावरण आणि मुक्त विचारधारा कारणीभूत असतील. एकदम नागव लिखाण नसेलही परंतु बरचसं कमरे खालचं असते. तसला प्रकार मराठी साहित्यात दुर्मिळच आहे. तरी या प्रकारातला एक कथासंग्रह आनंदध्वजाच्या कथा वाचण्यायोग्य आहे. त्यांच्या कथांचा तो संग्रह, त्यांची ‘मातीच्या चुली‘ हे आत्मचरित्र आणि ‘हा जय नावाचा इतिहास आहे‘ ही संस्कृत महाभारतावरील टीका आदी पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणारी नाहीत. आपणही ती अवश्य वाचली असतीलच. वाचलं नसाल तर नक्कीच वाचायला हवीत. त्यांच्या लेखनाबद्दल लेखक व वाचक मंडळीत खुप प्रवाद आहेत. आपण त्या प्रवादांत न पडता फक्त त्यांच्या ‘हटके‘ कथांचा आश्वाद घ्यावा. त्या कथांची काही वैशिष्ट्ये अविस्मरणीय आहेत. त्यातील कथा श्रुंगारिक, मिश्कील आणि काहीशा उत्तान स्वरूपाच्या आहेत. बहुतेक कथांचा केंद्रबिंदू अनैतिक संबंध हाच दिसतो. या चावट विषयाला यांनी भरजरी शब्दांच्या भाषाशैलीत लपेटून वाचकांसमोर पेश केले आहे. पौराणिक किवा ऐतिहासिक काळातील भाषाशैलीशी कथेतील भाषा सलगी करते. त्यामुळे श्रुंगारिक दाहकता कमी होऊन लेखनाचा खरा उद्देश सफल झालेला आढळतो. कथाबीजे मात्र अस्सल भारतीयच वापरली आहेत. काही बीजे काल्पनिक असली तरी बरीचशी आपणास नीतिकथा व पौराणिक आदी कथांतून घेतलेली आढळतात

प्रसिद्ध साहित्य संपदा : १) आनंदध्वजाच्या कथा- कथासंग्रह, २) इसापनीती भाग १ व २- कादंबरी- बालसाहित्य, ३) गीतगोविंद, ४) दहा उपनिषदे भाग १ व २, ५) नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर- हा ज्ञानेश्वरांचे समकालीन असलेल्या व राजा रामदेवराव यादवच्या दरबारात बसत असलेला कवी नरेंद्रपंडित याने लिहिलेल्या रुक्मिणीस्वयंवर या काव्याचा रसाळ भावानुवाद आहे, ६) महाराष्ट्र रामायण- वाल्मीकी रामायणाचा महाराष्ट्राशी संबंधित असा कथाभाग, ७) हा जय नावाचा इतिहास आहे- कादंबरी, ८) हितोपदेश भाग १ व २ इत्यादी. त्यांचं मातीची चूल हे आत्मचरित्रही स्पष्ट आणि रोखठोक विवेचनामुळे चर्चिलं गेलं. लहान मुलांसाठी त्यांनी इसापनीती आणि हितोपदेशसारखी पुस्तकं लिहिली. नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर हे नाटकही त्यांच्या नावावर आहे. आनंद साधले यांचे निधन दि.४ एप्रिल १९९६ रोजी झाले.

!! जयंती निमित्त्याने पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला विनम्र अभिवादन !!

✒️ संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.(लेखविभाग प्रमुख व जिल्हा प्रतिनिधी – महा.डि.शै.दै.रयतेचा वाली तथा साहित्यकार.)मु. पिसेवडधा, जि. गडचिरोली.व्हा. नं. ९४२३७१४८८३.