दिव्यांग शासकीय कर्मचाऱ्यांना वर्ग एक व वर्ग दोन च्या पदोन्नतीसाठी आरक्षणाची दारे खुली – राजेंद्र लाड

32

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.6जुलै):-राज्य शासनाच्या वर्ग एक व वर्ग दोन च्या गटातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरिता आरक्षण द्यावे,असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिल्याने दिव्यांग कर्मचाऱ्यांना केंद्रीय शासन सेवेत संधी,तर राज्य शासन सेवेत आरक्षणाची दारे खुली झाली आहेत.दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे,याकरिता घटनेतील कलम १६ (१) अन्वये आरक्षण दिलेले आहे.राज्य शासनाने त्यानुसार आरक्षण दिलेले आहे.मात्र वर्ग १ व २ पदाकरिता आरक्षण व पदोन्नती दिली जात नव्हती.या अनुषंगाने राज्यातील काही दिव्यांग शासकीय कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या होत्या.या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय देऊन महाराष्ट्र शासनास दिव्यांग कर्मचाऱ्यांना घटनात्मक तरतुदीप्रमाणे आरक्षण देण्याबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार महाराष्ट्र शासनाने दि.५ जुलै २०२१ रोजी आदेश निर्गमित करुन दिव्यांग शासकीय कर्मचाऱ्यांना वर्ग एक व वर्ग दोन मधील आरक्षणाची दारे खुली करुन दिलेली आहेत.अशी माहिती दिव्यांग शासकीय कर्मचारी हितार्थ शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.दिव्यांग शासकीय कर्मचारी यांच्या याचिका सुनावणीवेळी सामान्य प्रशासन विभागाने युक्तिवाद करताना केंद्र शासनाने दिव्यांग कर्मचारी वर्ग एक व दोन यांना पदोन्नती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या नसल्याने राज्य शासनाने याप्रकरणी निर्णय घेतलेला नाही,असे सांगितले होते.मात्र,उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ९३७ वर्ग एक व दोन च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

दिव्यांग कर्मचाऱ्यांना वर्ग एक व दोन मध्ये घटनात्मक तरतुदीनुसार नियुक्ती व पदोन्नती मिळावी,याकरिता सुमारे १४ याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.उच्च न्यायालयाने ७ मे २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या सुनावणी दरम्यान हा निर्णय दिलेला आहे.३० जूनपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी,असे आदेशात स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांचा कॅडर लाभ होऊ शकणार आहे.दिव्यांग कर्मचाऱ्यांना आजपर्यंत केवळ वर्ग तीन व वर्ग चार या संवर्गाकरीताच पदोन्नतीची संधी दि.५ मार्च २००२ च्या शासन निर्णयास अनुसरून उपलब्ध होती.सर्व पदांकरीता पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिर्घ कालावधीपासून याचिका दाखल केलेली होत्या.

या याचिकेवर अनेक सुनावण्या व युक्तीवाद केल्याने वर्ग तीन व चार संवर्गाप्रमाणे वर्ग एक व वर्ग दोनच्या संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी या स्वरूपाचा शासन निर्णय तात्काळ महाराष्ट्र शासनाने निर्गमित करावा ही मुख्य मागणी अनेक महिन्यापासून शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई ३२ ची होती.संघटनेने वेळोवेळी केलेल्या मंत्रालयीन बैठका व निवेदने यांची दखल घेवून व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे गांभीर्य विचारात घेऊन महाराष्ट्र शासनास वर्ग एक व वर्ग दोनच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश दिले होते.हा न्यायालयीन आदेश व संघटनेने वेळोवेळी केलेल्या मुख्य मागणीचा विचार करुन दिनांक ५ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग एक व वर्ग दोनच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देणारा शासन निर्णय निर्गमित करुन शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शासकीय प्राधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

यामुळे असंख्य असणाऱ्या पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ प्राप्त होणार असल्याची माहिती दिव्यांग शासकीय कर्मचारी हितार्थ संघटनेचे राज्याध्यक्ष रविंद्र पाटील,राज्यसचिव परमेश्वर बाबर,प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे,बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड जिल्हा सचिव इंद्रजित डांगे,जिल्हा कोषाध्यक्ष अर्जुन बडे,जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार मोरे,मधूकर अंबाड,रघुनाथ शिंदे,सौदागर कुर्हे,बाळासाहेब सोनसळे,अतुल मिटकरी,युवराज हिरवे,फुलचंद खाडे,बाळासाहेब कांबळे,दत्तात्रय गाडेकर,कचरु चांभारे,गणेश बहिर,प्रा.सतिष बिडवे,मच्छिंद्र राख,दिनकर खोमणे,गहिनीनाथ गिते,शेषराव सानप,महिला प्रतिनिधी श्रीम.संजिवनी गायकवाड,श्रीम.वैशाली कुलकर्णी,श्रीम.आशा बारगजे,श्रीम.शिल्पा वाघमारे,सविता ढाकणे,श्रीम,सुनिता जगताप इत्यादी पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे तसेच उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सर्व दिव्यांग कर्मचारी याचिकाकर्त्यांचे व महाराष्ट्र शासनाचे शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई ३२ यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.