सुनील पोटे यांच्या ‘आंबील” झाडी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

34

🔹स्वबोलीभाषा जगवणे प्रत्येकांचे कर्तव्य असावे – विजय वाकुलकर

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

राजुरा(दि.12जुलै): – बोलीभाषा संवादाचे माध्यम असून कोणतीही भाषा कमी किंवा जास्त दर्जाची असत नाही. स्वतःची बोलीभाषा जगवणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. आपली भाषा जगवणे म्हणजे ख-या अर्थाने आपली संस्कृती टिकवून ठेवणे आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण उपायुक्त विजय वाकुलकर यांनी राजुरा येथे केले.चंद्रपूर जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळ ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते.याप्रसंगी कवी सुनील पोटे यांच्या पहिल्या आंबील काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . संत नगाजी महाराज सभागृहात आयोजित ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे होते.

उदघाटन विजय वाकुलकर उपायुक्त समाज कल्याण यांचे हस्ते झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे ,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , झाडीपट्टीचे सुप्रसिद्ध कलावंत डाॕ. परशुराम खूणे, प्रमुख भाष्यकार म्हणून कवी अरूण झगडकर , प्रशांत भंडारे आदींची उपस्थिती होती .आंबीलचे रचयिते सुनील पोटे यांनी प्रास्तविक केले.त्यात त्यांंनी काव्यसंग्रह निर्मिती बाबतच्या प्रेरणा , झाडीबोलीबाबत असलेली आस्था व ती टिकविण्याची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. भाष्यकार अरूण झगडकर यांनी सुनील पोटे यांच्या आंबील ह्या काव्यसंग्रहातून घडणारे झाडीपट्टीतील समाजमनाचे अस्सल दर्शन आणि झाडीबोली शब्दांचे सौंदर्य यावर प्रकाश टाकला तर प्रशांत भंडारे यांनी आंबील मध्ये बोली शब्दभांडार कसे आहेत यावर चर्चा करत बोलीभाषेच्या संवर्धनासाठी नवसाहित्यिकांनी पुढे यावे असे आवाहन केले.

लखनसिंह कटरे यांनी झाडीपट्टीतील साहित्य बोन्साय नसून नैसर्गिक असल्याचे प्रतिपादन केले. आंबील काव्यसंग्रहातून आपल्या झाडीप्रदेशातील लोकतत्व ,व्यवहार आणि येथील कृषीसंस्कृतीचे अनेक पदर गुंफले गेले असल्याचे बंडोपंत बोढेकर यांनी प्रतिपादन केले. याच कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक झाडीबोली साहित्य विशेष पुरस्काराने मुर्लिधर खोटेले (झाडीकाव्य ), बन्सी कोठेवार (चित्रकला ), डाॕ.परशुराम खूणे( झाडीनाट्य सेवा ) ,लखनसिंह कटरे (वैचारिक लेखन), आनंदराव बावणे (कथालेखन) इत्यादींना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन रामकृष्ण चनकापुरे यांनी केलै तर डाॕ.सौ.अर्चना पोटे यांनी आभार मानले .दुसऱ्या सत्रात दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ॲड. सारिका जेनेकर यांच्या उपस्थितीत कवी संमेलन संपन्न झाले.

त्यात संतोष मेश्राम,भावना खोब्रागडे,नेताजी सोयाम,लक्ष्मण खोब्रागडे,नागेंद्र नेवारे ,अर्जुमन शेख,सुनील कोवे,दुशांत निमकर,शितल कर्णेवार,अरुण घोरपडे, नेतराम इंगळकर,संगीता बांबळे, संतोष कुमार उईके, डाॕ.किशोर कवठे,प्रविण तुराणकर,माधव कौरासे,हेमा लांजेवार ,विरेनकुमार खोब्रागडे ,प्रदीप मडावी आदींनी काव्यरचनांचे सादरीकरण केले. रामकृष्ण मांडवकर, प्रा.गणेश लोहे, प्रा. श्रावण बानासुरे ,ॲड. जेनेकर , विनोद ढोबे, रामरतन चाफले,राजेंद्र कुळमेथे आदींनी सहकार्य केले. कोरोना नियमांचे पालन करून अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.