सुशिक्षितांची बेरोजगारी : नेई व्यसनांच्या आहारी !

27

(विश्व युवा कौशल्य दिन)

आज तरुणवर्ग विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसत आहे. कारण बहुसंख्य युवक-युवती उच्चविद्या विभूषित सुशिक्षित असूनही त्यांना नोकरी मिळत नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल व आर्थिक पाठबळ जुळून येत नाही. त्यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्या सुखस्वप्नांच्या अक्षरशः ढलप्या पाडत आहे. यावर धरधराव्याचे उपाय म्हणून जागतिक स्तरावर प्रयत्न चालवले जात आहेत. तरुणांतील सुप्त कला, गुण व कौशल्यांचा विकास साधण्याच्या उद्देशाने स्वावलंबनाचे धडे दिले जाऊ लागलेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नोव्हेंबर २०१४मध्ये १५ जुलै हा दिवस वर्ल्ड युथ स्किल्स डे अर्थात जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला.

आपल्या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी सन २०१५साली स्किल इंडिया अर्थात कौशल्य भारत योजनेची घोषणा केली. मात्र अर्थसहाय्याविना कौशल्यांचा विकास करायचा तरी कसा? असा सवाल अशासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. मुद्रा बँकेमार्फत केंद्र शासनाने राज्यातील आयटीआय उत्तीर्ण तरुणाईला कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यात अनुभवी प्रशिक्षणार्थींना १० लाख तर नवोदित प्रशिक्षणार्थींना ५ लाख रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा करण्याचे निश्चित झाले. मात्र केंद्र शासनाकडे राज्यातून या कर्जपुरवठ्यासाठी केवळ शासकीय आयटीआयची यादी देण्यात आली. परिणामी अशासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. राज्यात कौशल्य विकास साधण्याचे काम आयटीआयमार्फत सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत तंत्रनिकेतन शाखांकडे पाठ फिरवलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने आयटीआयकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे आयटीआयमधील सुमारे ७७ ट्रेडसाठी सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले. राज्यात ३९८ शासकीय तर ४५४ अशासकीय आयटीआय आहेत. त्यांमधून लाखावर प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र घेऊन आयटीआय बाहेर पडतात. त्यांतील शासकीयमधून उत्तीर्ण होणाऱ्या ५०-५५ हजार तरुणाईला बँकेमधून कर्ज पुरवठा झाल्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल. मात्र उरलेल्या सुमारे ५० हजार प्रशिक्षितांना अशासकीय मधून उत्तीर्ण झाल्याने कर्ज पुरवठ्याची सोय होत नाही. त्यामुळे तुटपूंज्या पगारावर नोकरी करणे किंवा बेरोजगार ठरण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नसते. एकंदरीत कला, गुण वा कौशल्य अंगी असतानाही केवळ आर्थिक मदतीविना त्यांना व्यवसायापासून वंचित राहावे लागत असते, हे एकदम शुभ्र स्फटिकासमान स्पष्ट दिसून येत आहे. राज्य शासनाने अशासकीय आयटीआयची यादीच केंद्राकडे पाठवली नाही, ही फारच मोठी निंदनीय बाब म्हणावी लागेल. परिणामी आपोआपच अशासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना योनजेतून वगळले गेले.

अशाप्रकारे शासनाचे दुटप्पी धोरणच सुशिक्षित बेरोजगारांची फळी उभारणीस कारणीभूत ठरत आहे. मग समतोल राखला जाईल कसा? असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून शासनाने या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरणे साहजिकच आहे.
महाराष्ट्रात जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन होऊ लागले आहे. त्यात विविध ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवसाचे औचित्य साधून सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना मोबाईल टॅबलेट वाटपाचे कार्यक्रमही ऑनलाईन होत असतात. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने ऑनलाईन वेबिनार तसेच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत फेसबूक आणि युट्यूब लाईव्हद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येतो. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची प्रशिक्षणे ऑनलाईन साधनांद्वारे देण्याचा मानस असतो.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत गरीब विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांसाठी ब्युटी आणि वेलनेस, विविध घरगुती उपयोगाच्या वस्तुंची दुरुस्ती, मोबाईल रिपेरिंग, बेकरी उत्पादने, ज्वेलरी डिझाईन, माध्यमे, करमणूक आणि क्रीडाविषयक अशी विविध प्रशिक्षणे दिली जातात. सद्या विद्यार्थ्यांना ही प्रशिक्षणे ऑनलाईन दिली जातात. या प्रशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाही, अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेमार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले जातात. सांगली येथील स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशनमार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनार घेतले जाते. त्यात कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन तर उद्योजकता विभागामार्फत फेसबूक आणि युट्यूब लाईव्हमध्ये प्रशिक्षणार्थी व संस्थांचा ऑनलाईन गौरव करण्यात येतो. हे सर्व प्रयत्न तरुणाईतील कुशलता वाढविण्यात लाभदायक आहेत.

परंतु सद्या शासकीय क्षेत्रातील नोकर कपात, नोकरी गोठविणे, जुनी पेन्शन योजना रद्दबातल ठरविणे, शासकीय विभागांचे खाजगीकरण आदी शासनाच्या ध्येय-धोरणाने तरुणाई व्यसाने व वाममार्ग स्वीकारत आहे. शासनातर्फे अतिमागास क्षेत्रात उद्योगधंदे सुरू न केल्यामुळे किंवा सुरू करण्यास प्रोत्साहन मिळत नसल्याने तेथील तरुणाई निष्क्रिय-निष्प्रभ होत चालली आहे. याचे भान शासनासही ठेवणे तितकेच यथोचित ठरेल, यात शंकाच नाही!

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे विश्व युवा कौशल्य दिवसाच्या तरुणाईस प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व लेखन:-‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी.(मराठी व हिंदी सारस्वत विदर्भ प्रदेश)मु.रामनगर वॉर्ड क्र.२०,गडचिरोली.पो.ता.जि.गडचिरोली.व्हा.नं.९४२३७१४८८३.