भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन

22

🔹जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.१६जुलै):-जिल्ह्यात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस एनएबीएलचे (NABL:National Accridation Board For Testing And Calibaration Of Labrotory) राष्ट्रीय प्रयोगशाळा चाचणी व क्षमता मूल्यमापन संस्थेचे अधिस्विकृती प्रमाणपत्र मिळाले. तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा या विभागाचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन या निमित्त जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज या प्रयोगशाळेस भेट दिली. प्रयोगशाळेला मिळालेल्या मिळालेल्या प्रमाणपत्राचे त्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापीठाचे कृषी अभियांत्रीकी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सुधीर वडतकर, वनविद्या विभागाचे सहयोगी अधिष्ठाता अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, वरिष्ठ भू वैज्ञानिक प्रवीण बरडे, शिवाजी महाविद्यालय भूशास्त्र विभाग प्रमुख गणेश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक तिडके आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या प्रयोगशाळेची पाहणी करुन कामकाजाविषयी माहिती करुन घेतली. त्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रयोगशाळेस प्राप्त झालेले राष्ट्रीय प्रयोगशाळा चाचणी व क्षमता मूल्यमापन संस्थेचे अधिस्विकृती प्रमाणपत्राचे विमोचन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळांची उभारणी करुन जिल्ह्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करुन रासायनिक व जीवाणू विषयक तपासण्या या प्रयोगशाळेत केल्या जातात. त्यात रासायनिक पृथ्थकरण विषयक सात निकषांची पुर्तता केल्याने या प्रयोगशाळेस हे प्रमाण पत्र मिळाले आहे. या प्रयोगशाळेत पाण्याची विद्युत प्रवाहितता, फ्लोराईड, लोह, नायट्रेट, सामू, एकूण विरघळलेले घटक, एकूण काठीण्यता (चुनखडीचे प्रमाण) या सात घटकांची तपासणी केली जाते. त्यासाठी या प्रयोगशाळेस हे प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रयोगशाळेत ग्रामीण भागात जलसुरक्षक विविध ठिकाणच्या पाण्याचे स्त्रोतांमधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात व त्याचे रासायनिक व जीवाणू विषयक तपासण्या केल्या जातात.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ भूवैज्ञानिक निलेश इंगळे, महेंद्र गवळी,राजीव गवई, विजय सोळंके,तसेच प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रयोगशाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपणही करण्यात आले.