आष्टीच्या कन्या शाळेच्या उत्तुंग यशाची परंपरा कायम एस.एस.सी.चा १०० टक्के निकाल

26

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.19जुलै):-जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी,जि.बीड या शाळेने आत्तापर्यंत जिल्हाभरात सर्वच परीक्षा,सहशालेय उपक्रम इत्यादींमध्ये आपली गुणवत्ता नेहमीच सिद्ध केली असून याहीवर्षी प्रशालेचा इयत्ता दहावी वर्गाचा १०० टक्के निकाल लागला आहे.मार्च २०२१ मध्ये कोरोना आणि लाँकडाऊन परिस्थितीमुळे माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन निकषांप्रमाणे सराव परीक्षा,इयत्ता नववीचे गुणांकन आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत कामाचे मूल्यमापन,तोंडी परीक्षा इत्यादी निकषांवर आधारित एसएससी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला.

यामध्ये जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी या शाळेच्या एकूण ११४ विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या होत्या.त्यापैकी ९७ विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्या असून १७ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून बीड जिल्हा परिषदेच्या आष्टी कन्या प्रशालेने नेहमीप्रमाणेच आपला गुणवत्तापूर्ण आलेख कायम राखला आहे.कु.प्रतिक्षा तवले ९९.४० टक्के आणि कु.भाग्यश्री झाडे ९९.४० टक्के मिळवून प्रशालेमधून सर्वप्रथम आल्या आहेत.कु.प्रतिक्षा गिते ९८.८० टक्के तर कु.सृष्टी गिते ९८.४० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय आल्या आहेत.कु.साक्षी केरूळकर आणि सेजल वराट ह्या दोघींनाही ९७.६० टक्के तर ऋतुजा माने हिला ९६.४० टक्के गुण मिळाले आहेत.

विशेष गुणवत्तेसह कु.प्रियंका जंपलवार,प्रियंका रेडेकर,आनम शेख,कार्तिकी जाधव,साक्षी फड,रोहिणी पवळ,पुनम सानप,वैष्णवी पोकळे,साक्षी बळे,श्रुती जाधव,श्रुती पोकळे,वैष्णवी धनवडे,ऋतुजा भोगाडे,स्नेहल डिसले,दीक्षा कदम इत्यादी विद्यार्थिनींनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेतले आहेत.एकूण २५ विद्यार्थिनींनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले असून एसएससी परीक्षेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेने बाजी मारली आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी,मजूर,कामगार यांच्या मुलींसाठी अनेक वर्षांपासून मोठ्या पदावरील अधिकारी,डॉक्टर,वकील,व्यावसायीक,राष्ट्रीय महिला खेळाडू निर्माण करून,शिक्षणाची ज्ञानगंगा ठरलेली आष्टीच्या कन्याप्रशालेत अनेक गावातील मुली मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत.

कोरोनाच्या कठीण काळातही या प्रशालेतील पहिली ते दहावीच्या सर्वच शिक्षकांनी झूम,गुगल मीट,वोपा लर्निंग,शैक्षणिक व्हिडीओ ऑनलाईन च्या माध्यमातून अध्यापन सुरू ठेवले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना आबासाहेब खताळ,श्रीम.सुरेखा कुटे,श्रीम.संगीता दहिफळे,सुरेश नरोड,सतीश दळवी,स्वाती टेकाडे,संजय भोकरे,नाजीया बागवान,सुनीता खेडकर या शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन केले असून शैक्षणिक तसेच सहशालेय गुणवत्तावाढीसाठीही प्रयत्न केले आहेत.

या यशाबद्दल प्रशालेतील इ.१० वी तील सर्व गुणवंत विद्यार्थींनींचे शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,सर्व लोकप्रतिनिधी,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ.रिजवाना नदीम शेख,शा.व्य.सदस्य प्रा.लक्ष्मण रेडेकर तसेच समितीचे सर्व सदस्य,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव,मुख्याध्यापक आबासाहेब खताळ,मुख्याध्यापक सुरेश पवार,केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे,संदीप सुंबरे,नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,परिसरातील गावचे सरपंच,शिक्षणप्रेमी नागरिक,पालक,पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे