गुरू पौर्णिमा, वर्षावास म्हणजे काय?

35

आषाढ पौर्णिमा पाऊस जोरात पडण्याचे दिवस,निसर्गाचा नियम आहे,जे पेराल तेच उगवेल.जमीन तयार करून तुम्ही जर कोणतेही बी टाकले नाही तरी त्यात अनेक प्रकार चे गवत आल्या शिवाय राहणार नाही, डोंगरावर कोणी बी टाकत नाही तरी डोंगर संपूर्ण हिरवागार होतो.त्याच निसर्गाच्या नियमा नुसार माणसाच्या डोक्यात सकारात्मक चांगले विचार भरले तर नकारात्मक विचार आपोआप आपली जागा खाली करून देतात.हा निसर्गाचा पहिला नियम आहे.दुसरा नियम ज्याचा कडे जे निसर्गाने दिले आहे तो तेच वाटणार?.सुखी माणूस सुखच वाटणार.दुःखी माणूस दुःखच वाटणार.ज्ञानी माणूस ज्ञानच वाटणार.भर्मित माणूस भ्रमच वाटणार,भयभीत माणूस भयच वाटणार. निसर्गाचा तिसरा नियम आहे.जीवनात जे मिळते त्यात समाधान,आनंद माना तो यशस्वी पणे पचविणे शिका.भोजन जेवढे लागेल तेवढेच खा आणि पचवा,नाही पचल तर आरोग्य धोक्यात येईल बिमारी मागे लागेल.

भरपूर पैसे मिळत असतील तर ते योग्य ठिकाणी गुंतवणूक करा,ते न केल्यास दिखावा वाढत जाईल, त्याचा छगन भुजबळ होईल.कोणा बदल वाईट ऐकले तर स्वतः जवळ ठेवा,इतरांना सांगु नका ती सांगितली म्हणजे चुगली केल्या सारखे होईल. कोणाची प्रशंसा ऐकली तर आनंद व्यक्त करा,नाही केला तर अहंकार वाढत जाईल. कोणाची निंदा नालस्ती करून नका,त्यामुळे दुष्मनी वाढेल. कोणाचे गुपित माहीत झाले तर गप्प बसा, नाही तर जीवाला धोका निर्माण होईल.दुःख पचविले नाही तर निराशा वाढत जाणार.आणि सुख नाही पचविले तर पाप वाढत जाणार.शब्द कडू वाटत असले तरी सत्य असतात,ते सर्वांनाच पचविणे शक्य होत नाही.बुद्धाचा धम्म म्हणजे निसर्गाचे नियम पाळणे होय,विज्ञान कधीच अज्ञान स्वीकारत नाही तसेच बुद्धाचा धम्म आहे.नियम पाळले तर यम कधीच समोर उभा राहू शकत नाही. त्रिसरण,पंचशील पाळणे म्हणजेच बुद्धाचा धम्म आचरणात आणणे होय.तो फक्त भिक्खु संघा पुरता नाही. तर तो सर्व मानवासाठी आहे.गुरू पौर्णिमा ही त्याला मानणाऱ्या साठीच आहे कारण हा त्यांचा गुरू सर्वांचे कल्याण हो असे कधीच म्हणत नाही.

जो त्यांच्या जवळ आला त्याला आपलं मानतो,जी रंजला, गांजला, दुःखी कष्टी आहे,जो आर्थिक दृष्ट्या कमी आहे असा लोकांना किंवा त्या समाजाला असे गुरू कधीच आपले मानत नाही. ते दुखमुक्तीचा कोणताही मार्ग दाखवीत नाही. तरी त्या गुरूचा खुप गवगवा केला जातो. तसे बुद्ध धम्माचे नाही तो सर्वाना समान न्याय,हक्क प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सतत मार्ग दाखवीत जातो.गुरू पौर्णिमा,वर्षावास म्हणजे काय?.हे समजून घेतले पाहिजे.बौद्ध भिक्खु हे धम्माचा प्रचार व प्रसारासाठी बारा महीने फिरत असतात.(तेव्हा फिरत होते.आज फिरतात का?.) वर्षा म्हणजे पाऊस,वास म्हणजे निवास.या कालावधी मध्ये भिक्खुंचे चिवर हे पावसा मुळे भिजत असे या मुळे ते आजारी पडत या वर उपाय म्हणुन भगवान बुद्धांनी पावसाळ्या मध्ये भिक्खु संघास सुचना केली की आपण ज्या ज्या ठिकाणी धम्म प्रचार केला असेल त्या ठिकाणच्या विहारात मुक्काम करावा आणि आपण केलेला धम्माचा प्रचार व प्रसार किती फलदायी ठरला त्यांचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करावे.आषाढ पोर्णिमा ते पुढील तीन महीने हे दिवस पावसाचे असतात.

भाद्रपद महिन्यातील पौर्णिमाला सांगता होते.तथागत भगवान बुद्ध हयात असताना याची सूरवात झाली होती.यावर्षी २४ जुलै पासुन वर्षावासाची सुरवात होणार झाली आहे.म्हणुन आपण स्वता सह परिसरातील लोकांनी दररोज दोनतास विहारात एकत्र बसुन बुद्धाच्या धम्माचा,संघाचा अभ्यास करावा.विचार किती ही शुद्ध असले तरी ते आचरणात येत नसतील तर ते काहीच कामाचे नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या दिक्षाभूमीवर पाच कोटी जनतेला बौद्ध धम्माची दिक्षा दिली त्याला २०२१ ला ६५ वर्ष पूर्ण होत आहेत.त्यांचे आत्मचिंतन परीक्षण झाले पाहिजे. आम्ही आमचा देश बुद्धाच्या विचाराने धम्माचे पालन करून पुढे गेला की मागे चालला?.महापुरुषांची संयुक्तपणे जयंती साजरी करणारे मित्र मंडळ वर्षावासा निमित्ताने एकत्र का येत नाही?. प्रत्येक विहारात वर्षावासाचे आयोजन झालेच पाहीजे असे तरुण मुलामुलींना का वाटत नाही.

कारण विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कसे येणार?. आई वडील विहारात गेले नाहीत तर मुले कशी जातील.आजकाल सर्व लहानमोठे कार्यकर्ते,नेते बुद्ध आंबेडकर सांगत राहतात. पण आचरणात कुठेच आणीत नाही.मग आपल्या घरात,नगरात,वार्डात, तालुख्यात,जिल्ह्यात संघ नाही.तर संघटना कशी असेल. कसे आपण बुद्धाचे अनुयायी असू शकतो.आजूबाजूला इतर समाजाचे लोक असतात.ते आपण बौध्द आहोत हेच मान्य करीत नाही.कारण आपले घर आणि परिसर हा बुद्धाच्या विचाराने स्वच्छ,शुद्ध आणि सुंदर असला पाहिजे.मग तो आहे काय?. आपणच एकत्र बसून यावर चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा. वर्षावास म्हणजे तीन महिने पाऊसाळ्यात एकत्र बसून बुद्धाने दिलेल्या धम्माचा जीवनमार्ग आठवून अनुसरावा आचरणात आणावा यासाठी वर्षावास असतो.पण वर्षावास म्हणजे काय?.हेच माहिती नसेल तर?.

बौद्ध धम्मात पौर्णिमानां खूप महत्व आहे कारण राजपुत्र सिद्धार्थ यांची आई महामाया यांना गर्भधारणा,राजपुत्र सिध्दार्थ गृहत्याग करुन परिव्रज्या,पहिले धम्म प्रवचन आणि वर्षावास प्रारंभ याच पौर्णिमे पासून सुरु झाला. वर्षावास मुख्यत्वे भिक्खूंच्या जीवनाशी निगडीत असून तत्कालीन वेळी पाचशेच्या पाचशे भिक्खूंचा संघ एका गावातून दुसर्‍या गावात जात असतं, पावसाळ्यात शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्याची सुरुवात बुध्दांनी केली होती. उपासक म्हणून वर्षावास काळात सर्वांनी उपोसथ पालन केले पाहिजे. जमेल तसे आठ शीलांचे पालन केले पाहिजे.सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यानंतर भगवान बुध्दांनी आषाढी पौर्णिमेला कौण्डिण्य, भद्दीम, महानाम, वप्प व अश्वजीत या पंचवर्गीय भिक्खूसह ऋषीपतन हरणाच्या बागेत सारनाथ येथे पहिला उपदेश दिला; यालाच पहिले धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. पहिला उपदेश देताना सम्यक बुध्द म्हणाले, ‘इदं खो भिक्खवे, जाती पी दुखं, जरा पी दुखं, व्याधी पी दुखं, मरणं पी दुखं!’ अर्थात हे भिक्षू, जन्म दुखःद आहे, जगणे दुखःद आहे, आजार दुखःद आहे आणि मरणे दुखःद आहे. पुढे म्हणातात, ‘संक्खीतेणं पंचुपादन खंदा दुखा’ अर्थात सक्षिप्त मध्ये पाहिलं गेल तर पंचस्कंद दुखःद आहे. (पाच स्कंदः रुप, वेदना, संज्ञा, विज्ञान, संस्कार) पुढे ते म्हणतात, काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा या दुखःचे मुळ आहे.

या तृष्णांचा अंत करण्यासाठी आर्यसत्याची जाणीव करुन घ्यायला पाहिजे. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात (सुत्तपिठक, विनयपिठक आणि अभिधम्मपिठक) चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य धम्माचा पाया आहे. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला. भगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही.
माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत.

हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे. दु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किंवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेही दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासून ही दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे. दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते? त्याला दु:ख कां भोगावे लागते? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे.

ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो. परंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्माच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही. तृष्णा तीन प्रकारची आहे.

कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा. कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधीही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसऱ्या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो. जेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहीसे करतो ते सांगा?. तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल. हा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो.भगवान बुध्दांनी अष्ठांग मार्गाचा अवलंब करावा, असा उपदेश दिला.

सम्यक दृष्टी, सम्यम संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक कर्म, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हे आठ मार्ग आहेत, ज्याच्या माध्यमातून दुखःतून मुक्ती मिळू शकते. रुप अनित्य आहे, वेदना अनित्य आहे, संज्ञा अनित्य आहे, विज्ञान अनित्य आहे आणि संस्कारही अनित्य आहे. सर्व संस्कार हे अनित्य आहेत, असा उपदेश धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात दिला आहे.जगात आषाढी पौर्णिमा सर्वात मोठा सण व आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुध्दांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधःकरातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान उपदेशिले.प्रथमच मानवाला दुःख मुक्तीचे ज्ञान धम्मचक्क पवत्तन सुत्ताच्या द्वारा अर्पण केले. त्यामुळे मनुष्य मात्राने आषाढी पौर्णिमेला हा उपदेश केल्यामुळे या घटनेला पहिले धम्मचक्रप्रवर्तन म्हणून सार्‍या जगाने मानले आहे. भगवान बुध्दांनी याच दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेला इ.स.पूर्व ५२८ ला भिक्खुसंघाची स्थापना केली आणि भिक्षूंना आदेश केला, ‘चरथ भिक्खवे चारीकं बहुजन हिताय बहुजन सुखायं! लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुस्सानं!

देसेथ भिक्खवे, धम्मं आदी कल्याण मज्झे कल्याण परियोसान कल्याणं! सात्थं सव्यज्जनं केवल परिपून्न परीसुद्ध ब्रम्हचरियं पकासेथ!’ अर्थात हे भिक्षुंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही चालत रहा, लोकांवर अनुकंपा करीत देव (देव म्हणजे इश्‍वर नव्हे, दानशुर व्यक्तीच्या अर्थाने अर्थ घ्यावा) आणि मनुष्याच्या सुख आणि हितासाठी प्रयत्नशील रहा, हा मी धम्म जो देत आहे, तो सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्यम कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारी आहे, अशा धम्माचा उपदेश करुन त्यांनी धम्माच्या मार्गावर आरुढ होण्याची प्रेरणा भिक्खूंना दिली. त्याचप्रमाणे बौध्द धम्मामध्ये वर्षावासाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. संघाची स्थापना झाल्यानंतर महिन्याचे तीसही दिवस संघ गावोगावी जाऊन धम्माचे प्रचार व प्रसार कार्य करु लागला. पूर्वीच्या काळात अनेक ठिकाणी वर्षावास होत असत व सारे वातावरण धम्ममय होऊन जात असे. आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरु होतो व अश्विनी पौर्णिमे पर्यंत चालतो.मग आताचे मिलिंद नगर,सिद्धार्थ नगर,गौतम नगर,नागसेन नगर,आंबेडकर नगर, भिमनगर, रमाबाई नगर, बुद्ध नगर,महामाया नगर असे क्रांतिकारी नांवे असलेले नगर वर्षावासाने कसे गजबजून गेले पाहिजे.आहेत का असे आपले नगर,विभाग?. म्हणजेच आपल्याला ६५ वर्षात वर्षावास समजला असे म्हणता येईल काय?.

रमजान मध्ये कधी मुस्लीम वस्तीत आपण गेला का?. २४ जुलै गुरुपौर्णिमा. हिंदू धर्मातील लोक जे बहुसंख्येनेे ओबीसी आहेत ते म्हणतात मला घडवलं या जीवनात मला जगायला शिकवलं,लढायला शिकवलं,अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे.असेच माझ्या पाठीशी उभे रहा,माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद!.खेड्या पाड्यात आठ दिवस,पंधरा दिवस मंदिरात हरी भक्त पारायण चालते.आपण त्यांना विज्ञान कडून अज्ञाना,अंधश्रद्धाकडे जाताना पाहतो.मग त्यांचे व आपले आत्मपरीक्षण करा कोण कुठे चालले?. वर्षावासा निमित्य सर्व मानवास घरात,विहारात आत्मचिंतन करण्यासाठी हार्दिक मंगल कामना.मी दरवर्षी वर्षावासात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म घरात वाचतो.कारण लॉकडाऊन मुळे एकत्र बसण्यावर निर्बंध असलेल्या कारणाने विहारात जास्त संख्येने बसने शक्य नाही.म्हणूनच वर्षावासात चिंतन परीक्षण झालेच पाहिजे.

✒️धम्म उपासक:-सागर रामभाऊ तायडे(भांडूप, मुंबई)मो:-९९२०४०३८५९