नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा;आ.शिवेंद्रसिंहराजे; कास, बामणोली भागात केली पाहणी

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

जावली(दि.26जुलै):- तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या दुर्गम, डोंगराळ कास बामणोली भागात अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, रस्ते खचले, भूस्खलन असे प्रकार घडले असून लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

जावली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आ. शिवेंद्रसिंहराजे स्वतः घटनास्थळी जाऊन करत आहेत. नुकतीच त्यांनी कास, बामणोली भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना केल्या. ज्या पुलांचे नुकसान झाले आहे त्या पुलांना पूर्वी पाईप टाकलेल्या आहेत. त्या बदलून त्या ठिकाणी स्लॅबचा काँक्रीट मधील नवीन पूल तयार करण्यासाठी बांधकाम विभागाने तात्काळ प्रस्ताव तयार करावेत.शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून भरीव मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करावा.

ओढ्याच्या कडेला असणाऱ्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी ताली घालण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. बऱ्याच गावच्या पिण्याच्या पाईपलाईन तुटल्या आहेत त्या ठिकाणी नवीन पाईपलाईनचा ग्रामपंचायतनी तसे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांचेकडे पाठवावेत व ज्या गावच्या पाईपलाईन तुटून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्या ठिकाणी गटविकास अधिकारी यांनी तातडीची उपाययोजना करावी, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी जावलीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, सागर धनावडे, नाना जांभळे, यशवंत आगुंडे, राम पवार, धनाजी संकपाळ, सदाभाऊ शिंदकर, राजेंद्र संकपाळ, निलेश शिंदे, अरुण निपाणे, आर.डी. भोसले, किसन भोसले, प्रकाश सुतार, एकनाथ मालुसरे, आनंद जाधव, विजय पवार, सुभाष पवार, किशोर शिंदे, यशवंत शिंदे, चंद्रकांत भोसले, संजय आटाळे गुरुजी, यांचेसह कृषी विभागाचे मिलिंद बर्गे, विशाल डंगारे, ग्रामसेवक राजेंद्र राऊत, पोतदार यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.